वाऱ्याच्या झुळूकी रात्रभर
काहीतरी सांगून जात होत्या
दिव्यातल्या दिव्यात वाती
जोरात हेलकावे खात होत्या
विझायचं की तेवत रहायचं
दिव्यांचं नक्की ठरत नव्हतं
तेलातले जळते पाय काढून
त्यांना बाहेर जाता येत नव्हतं
कधी गार गार झुळूकी कधी
भिरभिरून येती पतंग वेडे
हात कुणा द्यावा दाह कुणा
भोळ्या दिव्यांना प्रश्न पडे
पतंगांच्या मनी असते काही
दिवे समजून घेत नाहीत
झूळूकींशी फेर धरून दिवे
जीवाची पर्वा करत नाहीत
पतंगांना जाळून मारण्यातच
दिव्यांची सगळी हयात सरते
वाऱ्याशी सलगीने तरी कुठे
त्यांचे आयुष्य वाढणार असते?
- संदीप चांदणॅ (मंगळवार, ८/४/२०२५)