Wednesday, December 25, 2019

येतेस घरी तू जेव्हा

"नसतेस घरी तू जेव्हा" ह्या कवितेवरील हे विडंबन मराठीतील सुप्रसिद्ध कवी श्री संदीप खरे यांची माफी मागून रसिकांना अर्पण!


येतेस घरी तू जेव्हा
जीव कावरा-बावरा होतो
'बसण्याचे' होती वांधे
सगळा प्लॅनच चौपट होतो!

बेल वाजता वीज पडावी
शॉक तसा तो बसतो
कुठे पळू-लपू असे होते
कसेबसे ग्लास ते लपवतो!

जातात मित्र दाराशी
हिरमुसून बघती मागे
डोळ्यांनीच निरोप देऊन
मी स्फुंदून आतच रडतो!

तव बेडाखालच्या साऱ्या 
मज स्मरती ग त्या बाटल्या
धस्सकन मग हार्टात होते
मी मटकन खाली बसतो!

तू सांग सखे मज कसे
सांगू मित्रांना फुटाया
मित्रांचा जीव उदास
माझ्यासह तिळतिळ तुटतो!

ना अजून प्यालो होतो
ना भरलेले मी ग्लास
तुझ्यामुळेच ही गत होते
माझा असा ड्राय डे घडतो!

- संदीप भानुदास चांदणे (१०/३/२०१६)

दुप्पट खाशी

मिरची घालून अगदी ताजी
बटाट्याची खमंग भाजी
तळण कुरकुरीत तळलेले
रताळे एखादे उकडलेले
लाडू गोड राजगिऱ्याचे
पाकिट उपास चिवड्याचे
शाबूचा वडा अन् खिचडी
भगर आणि दाण्याची आमटी
नंतर शहाळे गारगार प्या
खजूरही जरा खाऊन घ्या
गूळ शेंगदाणे अधूनमधून
केळी चार-सहा मस्त सोलून
उपास कडक परत कधी 
बाकी फळांनाही द्या संधी 

- संदीप भानुदास चांदणे (गुरूवार, १७/८/२०१७)

Friday, December 20, 2019

एक पैंजणाचा पाय

रूणझुणती चांदणी
गुणगुणती पहाट
पुरवेच्या आभाळास
आता सुर्व्याचीच वाट

नीज सोडून चालली
रात घाबरीघुबरी
वळूनिया पाही मागे
जाग आली दारोदारी

जणू सूर सतारीचे
घुमती चारीठाय
पडे अंगणी सड्याच्या
एक पैंजणाचा पाय

- संदीप चांदणे (मंगळवार, १२/०२/१९)

नजर

नजर नजरेला मिळेना
तिच्या मनातले कळेना...||धृ||

लहरी वाऱ्यावर लहरे
आवरेना स्वतःला
कसे सावरावे कुणी
घोर इथे या जीवाला
घोर इथे या जीवाला
तिच्या पदराला कळेना...||१||


रेखीव, वळणदार, नाजूक
घोटीव, जीवघेणे झाले
रंगलो अंतरंगी पुरता
काळीज बरबटून गेले
काळीज बरबटून गेले
तिच्या काजळास कळेना...||२||


हरवली मखमालीची
चाहूल तिची मोरपिशी
वणवणता दिन गेला
रात्र ही जाईल कशी?
चित्त कानी साकळले
चित्त कानी साकळले
तिच्या पैंजणास कळेना...||३||

- संदीप चांदणे (१०/०९/२०१८)

ह्या असल्या पाऊसरात्री

ह्या असल्या पाऊसरात्री
मी नीज लोटूनी देतो
आठवांच्या मऊ उशीला
हलकेच कुशीत घेतो

रात्र कशी सरावी?
या अवघड प्रश्नामध्ये
नाव मनाची सोडून
हेलकावे बघत बसतो

प्रौढ जलधारांच्या
सुरात चालती गप्पा
मी त्यांच्या मैफिलीला
पहिल्या रांगेत बसतो

किती नाही म्हणावे
मी हळवा उगाच होतो
तुझे गाणे तुझ्यासाठी
माझ्याही नकळत गुणगुणतो

- संदीप चांदणे (शुक्रवार, २/८/१९)

तिची ओलेती केसं

तिच्या ओलेत्या केसांनो
माझं धडधडे काळीज
मन भुलूनिया गेलं
भल्या सकाळीच आज

नका करू शिडकावा
गार थेंबाचा निथळून
माझ्या अंगातून सारं 
अवसान गेलया गळून

कसं लावू लक्ष आता
दिवसभर मी कामात
बिन मोगऱ्याची वेणी
माझ्या गंधाळली मनात

सावरून बटा साऱ्या 
दिसतील छान खूप
पण मनी झिरपले
त्यांचे ओलेते स्वरूप


- संदीप चांदणे (२०/१२/२०१९ - २३/०५/२०२४)

प्रेम नव्हे

ते प्रेम नव्हे

येई अनुभवाते मिटून लोचनाते
पारखून घ्यावे ते प्रेम नव्हे!

मुकी साद देऊन, अंतरी डोकावते
पाहून तोंड फिरवावे ते प्रेम नव्हे!

फुलविते जिणे, कुणाचे असणे
खोटे हसू दाखवावे ते प्रेम नव्हे!

मुक्त उधळावे, रिते रिते व्हावे
रडून भांडून घ्यावे ते प्रेम नव्हे!

- संदीप भानुदास चांदणे (२०/१२/२०१९)

बहुतेक

रात्रभर पडत होता बहुतेक तो रडत होता आयुष्याच्या कढईमध्ये  बहुतेक तो कढत होता  शेवटी उकिरड्यावर दिसला बहुतेक तो सडत होता  अंगाअंगी वळ उठले  ब...