Wednesday, July 2, 2025

सुखनिद्रा

गारव्याची शाल मऊ अन
स्वच्छ निरभ्र नभ निळे
तृणपात्यांचा मऊ बिछाना
रोज न असले सुख मिळे

गंधाचा हलके शिडकावा
ताटव्यातली करती कुसुमे
मध्येच पिवळी सान पाकोळी
भवती येऊन स्वैर घुमे

दूर त्या क्षितिजापावेतो
नीरवतेचे गूढ धुके
लहरी वारा थबकून गातो
माझ्या मनीचे गीत मुके

माळावर बारीक झरा
एका लयीत खळबळ करतो 
असल्या अमोल क्षणात जाऊन
सुखनिद्रा मी चोरून घेतो

- संदीप भानुदास चांदणे (बुधवार, २/७/२०२५)

No comments:

Post a Comment

बाकावरचे सरकणे

नको नको रे साजणा असा दूर दूर जाऊ तुझ्या बावऱ्या डोळ्यांनी नको बावरून पाहू कुठवर जाशील रे  दूरवर सरकून? घसरून पडशील बाक जाईल संपून  नको असता ...