पावसातल्या सुटीचा हाही एक असा दिवस, ज्या दिवशी पाऊस त्रासदायक वाटत नाही. पावसाळ्याच्या मध्यावर कदाचित त्याची सवय झालेली आहे आणि पाऊसही सुरुवातीच्या धसमुसळेपणाने दमून आता शांत होऊन एका लयीत बरसत आहे. रस्ता अंगावर थेंबाचा मारा झेलीत गपगार होऊन पडलेला दिसतोय, त्याच्यावरून नेहमीची वाहनांची धावाधाव नाही. झाडे, भिजत उभी जणू त्यांचीही निवांत अंघोळ चाललेली आहे. सगळं भिजून चिंब चिंब झालंय पण चिकचिक नाही. पावसाच्या आवाजातही रिपरिप नाही तर संथ सरसर आहे जी निरंतर चालू आहे. शेजारच्या घराच्या बाजूला रस्त्याच्या कडेला एरवी धूळ खात उभा असलेली गाडी धुवून स्वच्छ निघाली आहे आणि तिच्याकडे कधी मनापासून बघितलं गेलं नसल्याने आज ती जणू नवीन असल्यासारखी भासत आहे. वेळ दुपारची आहे पण जरासे फिकट राखाडी आकाश आणि वातावरणातला गारवा यामुळे सकाळ अजून लांबली आहे आणि आता दुपार रद्द होऊन थेट चिमूटभर संध्याकाळ आणि मग परातभर रात्र होईल असं वाटतंय. गरम वाफाळत्या चहाचे घोट आणि सोबत चमचमीत भजी असा पूर्वापार परंपरेने चालत आलेला बेत किती समर्पक आहे आणि ज्याने कुणी ही परंपरा सुरु केली त्याला चहाच्या कपातून चहाचे दोन थेंब अर्पण करावे असं वाटतंय. आता काहीतरी सुरेख संगीत लावून त्या प्राचीन परंपरेचा पाईक होऊन ते कर्मकांड आटोपून अंगावर चादर घेऊन खिडकीच्या कडेला बाहेर बघत शांत पडून राहायचं डोळे मिटून झोप येईपर्यंत. वा! सुखाची सुरेख सुटी!
संदीप भानुदास चांदणे (सोमवार, ७/७/२०२५)
No comments:
Post a Comment