Wednesday, October 21, 2015

कंट्रोल रूम

(या लेखातील घटना जरी खरया असल्या तरी पात्रांची नावे बदलली आहेत आणि विनोदनिर्मितीसाठी काही प्रसंगांना तिखटमीठ लावण्यात आलेले आहे!)

०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०

"नमस्कार, कंट्रोल रूम, काय मदत करू शकते आपली?"
"हॅलो, पुलिस, अहो आमच्या हिथे बाहेरच्या नळावर, त्या परजापतीबाई आणि सराटेबाई ह्यांच्यात जोरात भांडण चालूयेत, लवकर पुलिस पाठवा नाहीतर आता त्यांच्यात बादली, हंडं-कळशांनी मारामारी सुरू हुयल, अजून थोड्या वेळाने माहित नाही कशानं मारामारी करतेल!"
"कुठून बोलताय तुम्ही"
"घरात्न... आपलं ते... विशालनगर, राहुलनगर आणि मिलींदनगरच्या मधी हाये ते."
"ठीक आहे, आमचे पेट्रोलिंग ड्यूटीवाले लोक पाठवते, जवळच्याच एरियात आहेत ते, येतील लगेच."
"ऑक्के, थॅंक्यू बरंका म्याडम!"

अशा एका कॉलने कंट्रोल रूमच्या आजच्या दिवसाची सुरूवात झालेली आहे. आज ह्या कॉल ड्युटीवर आलेल्या म्याडम पो.शि. सौं. स्वाती चाबळे ह्या आहेत. त्यांच शिक्षण खूप असल्याने आणि शॉर्टहॅंड वगैरे केलेले असल्याने आणि खात्यात त्यांचे वडीलही असल्याने, जवळपास अशाच प्रकारच्या ड्युट्यांमध्ये त्यांची वारंवार वर्णी लागते. शिवाय कंट्रोल रूम हाही जवळपास कस्टमर केअर सारखाच प्रकार असल्याने इतर कुणी फारसे इथे ड्युटी करायला उत्सुकही नसते.

"हॅलो, कंट्रोल रूम टू ईगल, ओव्हर."
"हा ईगल १२३२ वाघमारे बोल्तो, ओव्हर."
"वाघमारे, विशालनगरात दोन बायकांची भांडणे सुरू असल्याचा कॉल आलेला आहे. लवकरात लवकर घटनास्थळी जाऊन रिपोर्ट करणे, ओव्हर."
"ओके म्याडम, ओव्हर."
ही एक नॉर्मल प्रोजिसर आहे. कुठूनतरी कसल्यातरी तक्रारीचा फोन येणे आणि पोलींसांकडून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे. पण हे असं वाटत एवढ पीस ऑफ केक टाईप नसतं!
हा पुढचा कॉल दर काही आठवडे किंवा महिन्यांनी रिपीट होतच असतो वेगवेगळ्या ठिकाणांहून!

"नमस्कार, कंट्रोल रूम, काय मदत करू शकते आपली?"
"खी:खी:खी:"
"हॅलो, काय पाहिजे?"
"काय नाय हो, ह्यो शांत्या म्हणत होता. फोन लागत नस्तो….लागला का नाय रे शांत्या?"
"मार पाहिजे का रे, ठेव फोन!"

लगेचच पुढचा…
"नमस्कार, कंट्रोल रूम, बोला."
"हॅलो, मी विशालनगरातून बोलतोय, मघाशी कॉल केलेला."
"पोलीस पाठवलेत तिकडं, पोहोचतीलच!"
"अहो म्याड्म, दुसरे पोलीस पाठवा. हिथ त्या बायका आणि पोलीस यांच्यातच जोरदार भांडणं सुरू झालीयेत!"
"- - - - - - - - - -"

तर, दिवस हळूहळू पुढे सरकतो. अजून एक कॉल रांगेत असतो.
"नमस्कार, कंट्रोल रूम, काय मदत करू शकते आपली?"
"हॅलो मॅडम, मी आत्ता ऑफिसला चाललो होतो ना, तर अचानक दचकून थांबलोच आणि रस्त्याच्या कडेच्या एका झाडापाठीमागे लपून फोन करतोय. मी आत्ता इथे काय पाहिलय माहितीये का?"
"- - - - - - - - - -" ('नाही माहिती' असं म्हणायचा मोह म्याडमच्या जोरात चाललेल्या श्वासातून जाणवतोय!)
"हां...मी पाहिल की दिवसाढवळ्या काही तरूण हातात कोयते, सत्तूर आणि आणखी काही लोखंडाची लांबच लांब हत्यारे घेऊन कुठेतरी दंगल करायला बिनधास्तपणे रस्त्यावरून चाललेत."
"कुठून बोलताय तुम्ही, पत्ता सांगा."
"धोका कॉलनी, समर्थनगर."
"ठीक आहे, मार्शल पाठवते लगेच"

"हॅलो, कंट्रोल रूम टू मार्शल, लोकेशन सांगा, ओव्हर."
"मार्शल टू कंट्रोल रूम, आता सोमनाथ नगर, विचार कॉलनीच्या गेटसमोर आहोत, ओव्हर."
"धोका कॉलनी, समर्थनगर मधून कॉल आलेला आहे. काही घातक शस्त्रे घेऊन तरूणांचा एक गट रस्त्यावरून फिरतानाचे समजले आहे. ताबडतोब साईटवर जाऊन रिपोर्ट करणे! ओव्हर."
पंधराएक मिनीटांनी मार्शल्शचा संदेश येतो.
"हॅलो, मार्शल टू कंट्रोल रूम, मार्शल ढवळे रिपोर्टींग, ओव्हर."
"कंट्रोल रूम टू मार्शल, रिपोर्ट, ओव्हर."
"म्याडम, आपण कळवलेल्या साईटवर गेलो होतो. म्याडम, सदर ठिकाणी ते तरूण गवत कापणारे माथाडी कामगार आहेत असे आढळून आले आहे. इथे आजूवाजूच्या सोसायट्यांच्या भवताली वाटलेले गवत काढण्याच्या कामाकरिता सदर कामगार आले आहेत, ओव्हर."
"- - - - - - - - - -"

हा एक अजून नमुनेदार कॉल.
"नमस्कार…." पुढचा म्याडमला पुढे बोलूच देत नाही.
"नमस्ते मैडम! हमे एको गाना सुनना था, राजा हिन्दुस्तानी फिलम का…"
"हॅलो, फोन कहा लगा है पता है क्या?"
"हां…विविधभारती इस्टेशन पे लगाहे ना, क्या रे ज्याधव? ई कहा मिलाईके दिये फोन? हॅलो, मैडम कहा लगा है फोन?"
"पुलीस स्टेशन मे लगा है? और अगर इसके बाद फोन आया ना तो जेलमे डाल देंगे तुमको सीधा!"
पलीकडच्याची जाम टरकलेली असते. तरीही फोन ठेवायच्या जागी तो बोलतच राहतो.
"हमने कुछ नही किया मैडम. हम बहुत गरीब आदमी हू. पान का ठेला है हमारा. उ बाजूका सायकिलवाला ज्याधव बोला की, विविधभारती मे ज्यो है…फोन मिला दिया हू…लो…अपनी पसंद का गाना लगावो! हम सच कह रहा हू मैडम…हमने नाही लगाया इ काल!"
"- - - - - - - - - -"

जसे तक्रारदात्यांचे फोन येतात तसेच ऑफिशियल फोनही येतच असतात कंट्रोल रूमला. अशाच एका कॉलमध्ये म्याडमना एका वरिष्ठ आधिकारयाने एका हवालदाराला रिपोर्ट करण्यासाठी कंट्रोल रूमला कळविले. तो हवालदार अमुक कुठल्यातरी सभेच्या बंदोबस्ताच्या नेमणुकीवर होता. मग तिथल्या ड्युटी इनचार्जला म्याडमने अधिकारयांचा निरोप कळवला.

थोड्याच वेळाने त्या ड्युटी इनचार्जचा रिप्लाय आला.
"ए.एस.आय. सोनावणे रिपोर्टींग कंट्रोल रूम. म्याडम अहो इथे बारा-तेरा वाघ फिरताहेत… स…त….द…"
सभेच्या गोंगाटात म्याडमना पुढचे काहीच ऐकू आले नाही. पण "बारा-तेरा वाघ फिरताहेत" म्हटल्यावर त्यांना कंट्रोल रूमच्या खुर्चीवर पंख्याखाली बसलेल्या असतानाही घाम फुटला! पटापट त्यांनी नंबर फिरविले…वनविभाग, फायर-ब्रिगेड, प्राणी संग्रहालय, प्राणीमित्र संघटना, तात्काळ मदत देणारी पोलीस यंत्रणा "क्यूआरटी", एक-ना-दोन. सगळीकडे कळवायचा सपाटाच लावला. वीसेक मिनिटांनी ज्या ड्युटी इनचार्जनी हवालदारासंबधीचा कॉल घेतला होता. ते ठणाणा बोंबलतच पोलीस स्टेशन/कंट्रोल रूममध्ये शिरले. म्याडमना कळेना काय झालय!
ड्युटी इनचार्ज : चाबळेबाई! काय चाललंय?? वाघ आडनावाचे बारा-तेरा हवालदार तिथे बंदोबस्तासाठी आहेत असे सांगितलेले, तुम्ही सारी सभाच उधळून लावलीत, वर सारया यंत्रणा कामाला लावल्यात!! मलाही जबाब मागितला आहे कमिशनर साहेबांनी!!!
म्याडम : "- - - - - - - - - -"

अशा काही गमतीशीर तर काही अतिसिरियस फोन कॉल्सने कंट्रोल रूमचा आजचा दिनक्रम उरकतो. पो.शि. सौं. स्वाती चाबळे ड्युटी संपवून घरी जायला निघतात आणि पुढील काही वेळासाठी कंट्रोल रूमचा ताबा पो.शि. श्री लोखंडे घेतात!

०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०

- संदीप भानुदास चांदणे

No comments:

Post a Comment

Man and book

Man slowly was becoming man Once alone then part of a clan He learned to speak, he carved the wheel, Left the cave, built home, found the fe...