Friday, January 8, 2016

अन् मलाही!

अन् मलाही!

एक सांगू? ऐकशील?
ते कंगव्यातून सुटणारे केस
राहूदे तसेच, भुरभुरूदे
तेवढाच त्यांना विरंगुळा
अन् मलाही!

तुळशीच्या ओल्या मंजिऱ्या
परसबागेत फुले सारी
फुलतात, खुलतात तुझ्यासवे
साऱ्यांना त्या खुलू दे
अन् मलाही!

वाराही कधी लाडात येतो
पदराशी सलगी करतो
तू तशीच राहा, मला सावरू दे
खेळू दे त्या दोघांना
अन् मलाही!

मोकळी छान हसताना
इकडे तिकडे पाहताना
वेडी डूलं झुलत राहतात
झुलू दे त्यांना मजेत
अन् मलाही!

गालावरच्या खळ्यांना
लाल ओठ नि चंद्रबिंदीला
न्याहाळत बसतो आरसा
पाहू दे ग निवांत त्याला
अन् मलाही!

- संदीप चांदणे (८/१/२०१६)

No comments:

Post a Comment

बहुतेक

रात्रभर पडत होता बहुतेक तो रडत होता आयुष्याच्या कढईमध्ये  बहुतेक तो कढत होता  शेवटी उकिरड्यावर दिसला बहुतेक तो सडत होता  पापण्या झुकल्या खाल...