Saturday, April 9, 2016

वाऱ्यावरचा माणूस!

तो आला…

फकीरच भासत होता
खांद्यावरच्या झोळीवरून
आणि उरलेल्या, पिकलेल्या केसांवरून
शरीरभर जीर्ण झालेल्या
आयुष्याच्या खुणा मिरवित…

तो बसला…

कुणालाही न विचारता
रस्त्याच्या कडेला असलेल्या
पडक्या मंदिरापुढच्या झाडाखाली
अंगावर भरभरून घेत त्याची सावली
निवांतपणे पाय पसरत…

त्याने पाहिले…

अनेक अनोळखी नजरांचे गुच्छ
अन कुजबुजणार्या ओठांचे थवे
कौन है बाबा? किदरसे आये?
कुणीतरी पुढं होऊन विचारलंच
प्रश्नांच्या मोहोळाला उठवत…

तो हसला…

उत्तर द्यायच्या आधी, शांत आणि धीरगंभीर,
नंतर, आपलेच, एक म्हातारे झालेले बोट
त्याने आलेल्या दिशेवर ठेवले
एक चित्कार शहारला त्या तिथे
फ़डफ़डला सार्यांच्या पापण्यांत

तो जिंकला होता…

कारण, तिकडून आजवर
फक्त वाराच वाहत आलेला!

- संदीप चांदणे (०५/०४/२०१६)

No comments:

Post a Comment

पापणी

लवलवती पापणी... अश्रूंना घेऊन लपली, मिटल्याने झाली ओली आतल्या अंधारात तरी, पहा चमचमली ...लवलवती पापणी थरथरती पापणी... अश्रूंच्या लाटांनी, ब...