Wednesday, May 11, 2016

मी मनातला...

मन खाई हेलकावे
खाली पिसापरि जाई
उतरे खोल खोल किती
पाय धरणीवर नाही

घेती कल्पना अफाट
रूप पाल्हाळ वेल्हाळ
व्हायचे ना त्यांचे काही
दोन घडीचाच खेळ

दोन घडीचा जरी तो
डाव भातुकलीचा रंगे
ना कुणी सोबती लागे
मन, मनाच्या जेव्हा संगे

मन तंद्रीत लागून
करे कसला विचार?
विचारता, गप्प गप्प
म्हणे विसरलो सारं!

जाई कालपरवाच्या गावा
हसण्या खेळण्या तिथे
कधी उद्यात डोकावी
आज विसरून मागे इथे

नाही मनाच्या पायाला
बेड्या कुणी बांधियेल्या
त्याच्या गावाला सीमाही
नाही कुणी रेखियेल्या

रे मना तू सांग इतकेच
आत राहून माझ्यात
का आहे ठाऊक तुज
मीच असतो तुझ्यात!

- संदीप चांदणे (७/५/२०१६)

No comments:

Post a Comment

धरती

उगता जीवन इस माटीसें उगकर फलफूलता यहाँ  कहते इस ग्रह को पृथ्वी  रहते जीवजंतू सारे जहाँ इस धरती पर हैं समंदर  और पर्वत अतिविशाल हरियाली तन पे...