Friday, April 28, 2017

फरक

जागत्या वैराण राती
देह माझा थरथरे
मन होई सैरभैर
मुके होऊनि झुरे

अबोल श्रांत डोळ्यांचे
अश्रू बोलके वाहती
प्रश्न तुझ्या लोचनांत
मला काही विचारती
सांडतो मी शब्द शब्द 
वेच तू तुझी उत्तरे

स्वप्नही तुला कधी
दु:खाचे पडत नाही
दु:ख रोज पांघरतो
त्याशिवाय झोप नाही
कसे ऐकवू तुला मी
अंगाईगीत कण्हणारे?

माळू कशा, खोट्या आशा
सावरलेल्या तुझ्या केसात?
कष्टाची काजळी ल्यालो मी
सुवर्णअंजन तुझ्या डोळ्यांत
जखडून मी गेलेला
जग तुझे स्वैर फिरे

काळोखाचे गाणे माझ्या
उद्याच्या निवाऱ्याचे
तुझी खुलती दालने
गीत गात प्रकाशाचे
पहाट तुझी गुलाबी
गहरी माझी सांज रे

होईल का भेट कधी
चंद्र-सूर्याची आकाशी?
तुझी आस मखमली
माझी कुवत जराशी
साद तुझी दबकते
पाय माझेही बहिरे!

- संदीप भानुदास चांदणे (६/४/२०११)

No comments:

Post a Comment

पापणी

लवलवती पापणी... अश्रूंना घेऊन लपली, मिटल्याने झाली ओली आतल्या अंधारात तरी, पहा चमचमली ...लवलवती पापणी थरथरती पापणी... अश्रूंच्या लाटांनी, ब...