Monday, December 27, 2021

नाही सोसत चांदवा

तुझे हसणे असते

सये, खडीसाखरेचे

माझे झुरते पाहून

पोट, बिन भाकरीचे


तुझ्या केसात गजरा

मोगर्‍याचा फुलतो ग

माझ्या अंगणी बहर

रानफुलांचा येतो ग


तुझ्या डोळ्यांचे काजळ

रात सांडूनिया जाते

माझे पोखरले स्वप्न 

त्यात हेलकावे खाते


तुझ्या मोकळ्या आभाळी

मी बिनपावसाचा मेघ

तुझे विस्तीर्ण क्षितीज

माझी इवलीशी रेघ


किती किती मी सावरू

माझ्या मनाला आवरू

तुझ्या हिरव्या शिवारी

अळू मोती कसे पेरू?


होतो पुनवेच्या राती

चांदण्यांचा शिडकावा

माझे पोळते ग मन

त्याला सोसेना चांदवा


- संदीप भानुदास चांदणे (सोमवार, २७/१२/२०२१)

No comments:

Post a Comment

पापणी

लवलवती पापणी... अश्रूंना घेऊन लपली, मिटल्याने झाली ओली आतल्या अंधारात तरी, पहा चमचमली ...लवलवती पापणी थरथरती पापणी... अश्रूंच्या लाटांनी, ब...