Monday, August 22, 2022

झोप येईनाच आज

झोप येईनाच आज
झोप हवी असताना
जांभयाच्या येती लाटा
वर तारे मोजताना

काय आणून वहावे
निद्रादेवीच्या चरणी
झोप येऊन निवांत
उद्या उजाडेल झणी

किती थकून भागून
देह दिला पसरून
डोळ्यात बाहुल्यांना
काय दिसते अजून?

दिसे कालचा प्रकाश
अन्, तम भेसूर उद्याचे
त्यांच्या मध्ये भांबावले
पाऊल हळव्या झोपेचे

एक मायेचा, माथ्याला
हवा सांगणारा हात
सोड उद्यावर, नीज
खूप झाली आहे रात

- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, २१/१२/२१)

No comments:

Post a Comment

आनंदोत्सव

निळापांढरा उडवीत पदर राधा होऊन धरती नाचे हिरवाईचा हर्षवायू बळीराजाच्या उरात साचे शिवारात वाऱ्याचा पिंगा पिकांचे तालात डोलणे थव्याथव्यांनी नभ...