Monday, April 14, 2014

व्यथा

चिमुकले घरटे
पाखरे चिमुकलीच!
चिमुकल्या घरात
स्वप्ने चिमुकलीच!

झाल्या खोल्या
घरट्यात साऱ्या
खोल्यात विसरलात
नात्यांची खोलीच!

जमवूनी कळप
केलीत शिकार
शब्दांनी तोडलीत
लचकी आपलीच!

तुझे माझे
नसावे जिथे
हक्क सांगून
जागा दाखवलीच!

नव्हती अपेक्षा
पानाचीही कधी
हिरावलीत तरी
मायेची सावलीच!

तोडण्या साऱ्यांचे
हात लागती
जोडण्या पुकारा
पाठ फिरवलीच!

डोळेही नाही
पित्याचे सोडले
भागीरथी प्रयत्ने
गंगा आणलीच!

मनाच्या आत
शिरून पहा
मीपणा सोडून
पहा लागलीच!

सुख

हरवलेले ते सापडले
सापडले हरवल्यानंतर
हरवले सापडण्याआधी
कळाले सापडल्यानंतर!

तेच होते ते जरी
ते न राहिले तसे तरी
हवे होते ते तसेच तेव्हा
कळाले सापडल्यानंतर!

भाव पुसा बाजाराला
दाम जरी ना लाविला
अनमोल ते आहे खरे
कळाले सापडल्यानंतर!

शब्दांचा ना लागे ठाव
जरी दोन अक्षरांचा गाव
'सुख' म्हणती सारे त्याला
कळाले सापडल्यानंतर!

- संदीप चांदणे (13/4/14)

Sunday, April 13, 2014

वाट पाहणारा बाबा

येशील तू, पाहशील तू
गाली खुदकन हसशील तू
वाट पाहत्या या डोळ्यांना
थेंब मोत्याचे देशील तू!

मुठीहून मोठी खेळणी
दारावरचे झुलते माकड
कितीतरी हसून-नाचून
पुन्हा-पुन्हा धरशील तू!

न कळो तुला आतुरता
न दिसो तुला भावुकता
गालावरती गोड पापी
पहिल्यासारखीच ठेवशील तू!

ना ओठी बाबा तुझ्या
ना कुठली हाक अजून
कुणासही न कळणारे
बोल चिमखडे ऐकवशील तू!

तुझ्या आठवणीने व्याकूळ
क्षणाक्षणाला आधिक हळवा
कसा दिसतो बाबा तुझा
येशील तू, पाहशील तू!

- संदीप चांदणे (13/4/14)

Monday, April 7, 2014

गोष्ट ही हळहळलेली!

त्याच्या स्वप्नांची ढलपी
खुशाल त्यांनी जाळलेली
त्यानेही विस्तव होउन
आग उरात पाळलेली

मागून काहीच न मिळाले
न मागता दु:खे मिळालेली
त्यानेही करून साज ती
स्वत:वर अलगद माळलेली

ना कथा, ना काव्य कुठले
शब्दांनीही जागा गाळलेली
त्यानेही भिरकावली वा-यावर
गोष्ट ही हळहळलेली!

- संदीप चांदणे (7/4/14)

वारा आणि दिवा

वाऱ्याच्या झुळूकी रात्रभर काहीतरी सांगून जात होत्या दिव्यातल्या दिव्यात वाती जोरात हेलकावे खात होत्या विझायचं की तेवत रहायचं दिव्यांचं नक्की...