Sunday, March 22, 2020

मास्कमधून

नाहीत तुला पाय तरी
देशोदेशी जाशील
गावागावा-वस्त्यांमधून
द्वाडासारखा फिरशील

तुझी असंख्य भावंडे
माजवतील हाहाकार
पण घे लक्षात, आमच्यात
आहे शिल्लक प्रतिकार

जितका झपाट्याने तू
पोखरत जाशील आत
तितकीच उसळून उठेल
अशी माणसाची जात

माणूस मारणं कदाचित
असेल सोपं काम रे
पण दाखव जिंकून त्याला
म्हणशील मनात 'राम रे!'

माहिती नसेलच तुला
जगणं-जगवणं कोरोना
बघ बापाला, मास्कमधून
पापी पोराला देताना

संदीप भानुदास चांदणे (२२/०३/२०२०)

No comments:

Post a Comment

आनंदोत्सव

निळापांढरा उडवीत पदर राधा होऊन धरती नाचे हिरवाईचा हर्षवायू बळीराजाच्या उरात साचे शिवारात वाऱ्याचा पिंगा पिकांचे तालात डोलणे थव्याथव्यांनी नभ...