Monday, June 30, 2025

अपनी तो हार है

सुनते थे हम, ये जिंदगी
गम और खुशी का मेल है
हमको मगर आया नजर
ये जिंदगी वो खेल है
कोई सब जीते, सब कोई हार दे
अपनी तो हार है, यार मेरे, हां यार मेरे


तुमच्या डोळ्यात पाणी आणणारं एखादं दृश्य चित्रपटात असेल तर साधारणपणे तो एक ट्रॅजेडी सीन असतो आणि तो सीन हळूहळू चढत जातो आणि मग त्या सिच्युएशनच्या हाय पॉईंटला डोळ्यात पाणी येतं. सोबतीला बॅकग्राउंड म्युजिक तर असतंच, त्याशिवाय आवश्यक तेवढी परिणामकारकता येत नाही. किंबहुना, बॅकग्राउंड म्युजिकमुळेच एखादं दृश्य 'टचिंग' बनत.

'सागर' चित्रपटातल्या 'सच मेरे यार है' या 'एस. पी.' ने गायलेल्या गाण्यात एका ओळीत 'कमल हसन'ने जो अभिनय केला आहे त्याला तोड नाही. आपल्याला काही कळायच्या आतच घात झालेला असतो. टचकन म्हणावं तर तेही मिळमिळीत वाटेल इतकी फास्ट रिएक्शन झालेली असते. डोळ्यांत पाणी उभा राहिलेलं असतं. ते जरा  तिथेच अडवून धरण्याचा प्रयत्न करावा म्हटलं तर कमल हसनच्या बाजूला उभा असलेला 'लिलिपुट' पापण्यांच्या कडांवर उभा असलेले पाण्याचे थेंब खाली ढकलून देतो आणि ते दोन थेंब गालावरून रेंगाळत खाली येतात. पुन्हा आपण अजून रडून शर्टाची बाही ओली करू नये म्हणून तेवढ्याच वेगात तो पुन्हा नॉर्मल होतो. पुढे पडद्यावर हिरोला काही कळू देत नाही आणि पडद्याबाहेर आपल्याला सर्व कळालेलं असूनही पुढे रडू देत नाही. 

तसं तर कमलने इतरही चित्रपटात सकस आणि वास्तवदर्शी अभिनयय करून आपल्याला रडवलंय. 'सदमा'मध्ये तर शेवटी खराखुरा सदमा बसलेला आहे. पण, या इथल्या प्रसंगात सेकंदांच्या एक शतांश इतक्या स्पीडने त्याने किंचित उसणा हसरा असणारा चेहरा कमाल दुःखी केला आहे की आपल्या मनात इतर काही भावना येणं केवळ अशक्य. या कमालीच्या कमलला फक्त सलाम आहे आणि वर म्हटल्याप्रमाणे लिलिपुटनेही खारीचा वाटा उचलत अतिशय महत्वाचं अस आपलं योगदान देऊन तो सीन अजरामर करून ठेवला आहे, त्यालाही सलाम

- संदीप भानुदास चांदणे (सोमवार, ३०/०६/२०२५)

Sunday, June 29, 2025

निळासावळा रेशीम पक्षी

हिरव्या ओल्या पाचूवरती
आभाळाची निळसर नक्षी 
असल्या चित्रामधुनी गातो 
निळासावळा रेशीम पक्षी

उद्याची न भ्रांत मनाशी
मिळेल तिथला दाणा टिपतो
उथळ संथ झऱ्यात जाऊन
पंख भिजवूनि न्हाऊन घेतो 

भिरभिर आपली थांबवून तो 
भवताली एक सखा शोधतो 
नाजूक रेखीव मान ताणूनि
मध्येच मंजुळ धून सोडतो

मावळतीच्या कुशीत जेव्हा
सूर्य जाऊनि डोळे मिटतो
निळ्यासावळ्या नभात तेव्हा
निळासावळा पक्षी उडतो

- संदीप भानुदास चांदणे (रविवार, २९/०६/२०२५)

Monday, June 16, 2025

दोन नेते गुजराती

दोन नेते गुजराती
भलतेच करामती
कळतच त्यांना नाही
अति तेथे होते माती

विकासाच्या नावाखाली
दोन हजार चौदा साली
गांधी सांगून आण्णाच्या 
आग लावली बुडाखाली

प्रधानसेवकाच्यानंतर
एक होई चौकीदार
दुजा घेई हाती आपल्या 
बेदरकारपणे कारभार

सतत मुखात खोटे
घाली विदेशात खेटे
प्रचारकी बघून थाट
जनतेच्या तोंडी बोटे

हरभरा यांच्यामुळे
टरारून गच्च फुले
कुठे जरा खुट्ट होता 
म्हणे हे तर नेहरूमुळे

आधी बोलती चिन्यांना
लाल लाल डोळे हाणा
पाकिस्तानला कळेल
अशी भाषा तुम्ही द्या ना

पाक सारखा घुसतो 
चीन नकाशा पुसतो
व्यापाऱ्यांना सैन्यापेक्षा
एक साहसी म्हणतो

नोटबंदी, लॉकडाऊन
पाहिले सारे करून
हाती धुपाटणे आले
बघा हताश होऊन

विदेशनितीचा परिपाक
रुपयाचे गेले नाक
खोल गाळात रुतले
अर्थव्यवस्थेचे चाक

कोरोनात बळी गेले
सीमेवर कामी आले
अगणित देशबांधव
गर्दीत चेंगरून मेले

याआधी दुर्दैवी घटना
पाहिल्यात घडताना
गुजराती दोन दिसले
जबाबदारी झटकताना

सारे मणिपूर पेटले
उरी, पुलवामा घडले
मनाच्या बाता एकाच्या
ऐकूनी कान विटले

कितीतरी चरित्रहीन
बरळतात मंत्रीगण
यांच्या संगतीत स्वच्छ
माखलेले भ्रष्टाचारानं

आंधळा घेऊन द्वेष
धरून गोसावी वेष
निघालेत चोर दोन
विकायला सारा देश

पत्रकार येती कामे 
नामजप ओठी घुमे
पैशासाठी सत्तेपुढे
लाचार सारी माध्यमे

सहिष्णुतेचा अंत पाही
ठाऊक हे त्यांना नाही
असल्या दडपशाहीला
लोकशाहीत थारा नाही

- संदीप भानुदास चांदणे (सोमवार, १६/०६/२०२५)

Tuesday, June 10, 2025

कोमलांगिनी चित्तहरिणी

कुठून हा येई समीर गंधीत तू नसताना
गंधातून दिसे साक्षात मज तू हसताना
काज कुठले कसे करू कळेना काही
हरवते माझे चित्त नित्य तुला स्मरताना

रोमांचित, अवचित तव दर्शने मी फार
मन्मनी घातला तव बाहूचा रेशीम हार
व्यर्थ घटिका नको आता हो जरा उदार
हे पळ पळ करती मनावर निर्दयी वार

पाहूनि तुज कोमलांगिनी चित्तहरिणी
शब्द हे आले नकळत मम अधरावरी
अंतिम बहुधा आज दिन हा या भूवरी
मना धीर धरी, करी अनुकंपा मजवरी

हे यौवन तव नवचैत्रासम साकार
घटासम वाढता दिसे कटी आकार
ते नयन नितळ गहिरे सरोवर फार
मी अति आतुर पोहून कराया पार

पुरे हे मौन मनोरथ माझे मनीचे जाण
ह्रदयी रुतला खोल तव प्रीतीचा बाण
करी त्वरा जरा करण्या अंत वेदनेचा
दुःखे त्यागीन विव्हळ व्याकूळ प्राण


- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १०/०६/२०२५)

सुखनिद्रा

गारव्याची शाल मऊ अन स्वच्छ निरभ्र नभ निळे तृणपात्यांचा मऊ बिछाना रोज न असले सुख मिळे गंधाचा हलके शिडकावा ताटव्यातली करती कुसुमे मध्येच पिवळी...