भलतेच करामती
कळतच त्यांना नाही
अति तेथे होते माती
विकासाच्या नावाखाली
दोन हजार चौदा साली
गांधी सांगून आण्णाच्या
आग लावली बुडाखाली
प्रधानसेवकाच्यानंतर
एक होई चौकीदार
दुजा घेई हाती आपल्या
बेदरकारपणे कारभार
सतत मुखात खोटे
घाली विदेशात खेटे
प्रचारकी बघून थाट
जनतेच्या तोंडी बोटे
हरभरा यांच्यामुळे
टरारून गच्च फुले
कुठे जरा खुट्ट होता
म्हणे हे तर नेहरूमुळे
आधी बोलती चिन्यांना
लाल लाल डोळे हाणा
पाकिस्तानला कळेल
अशी भाषा तुम्ही द्या ना
पाक सारखा घुसतो
चीन नकाशा पुसतो
व्यापाऱ्यांना सैन्यापेक्षा
एक साहसी म्हणतो
नोटबंदी, लॉकडाऊन
पाहिले सारे करून
हाती धुपाटणे आले
बघा हताश होऊन
विदेशनितीचा परिपाक
रुपयाचे गेले नाक
खोल गाळात रुतले
अर्थव्यवस्थेचे चाक
कोरोनात बळी गेले
सीमेवर कामी आले
अगणित देशबांधव
गर्दीत चेंगरून मेले
याआधी दुर्दैवी घटना
पाहिल्यात घडताना
गुजराती दोन दिसले
जबाबदारी झटकताना
सारे मणिपूर पेटले
उरी, पुलवामा घडले
मनाच्या बाता एकाच्या
ऐकूनी कान विटले
कितीतरी चरित्रहीन
बरळतात मंत्रीगण
यांच्या संगतीत स्वच्छ
माखलेले भ्रष्टाचारानं
आंधळा घेऊन द्वेष
धरून गोसावी वेष
निघालेत चोर दोन
विकायला सारा देश
पत्रकार येती कामे
नामजप ओठी घुमे
पैशासाठी सत्तेपुढे
लाचार सारी माध्यमे
सहिष्णुतेचा अंत पाही
ठाऊक हे त्यांना नाही
असल्या दडपशाहीला
लोकशाहीत थारा नाही
- संदीप भानुदास चांदणे (सोमवार, १६/०६/२०२५)
No comments:
Post a Comment