Tuesday, June 10, 2025

कोमलांगिनी चित्तहरिणी

कुठून हा येई समीर गंधीत तू नसताना
गंधातून दिसे साक्षात मज तू हसताना
काज कुठले कसे करू कळेना काही
हरवते माझे चित्त नित्य तुला स्मरताना

रोमांचित, अवचित तव दर्शने मी फार
मन्मनी घातला तव बाहूचा रेशीम हार
व्यर्थ घटिका नको आता हो जरा उदार
हे पळ पळ करती मनावर निर्दयी वार

पाहूनि तुज कोमलांगिनी चित्तहरिणी
शब्द हे आले नकळत मम अधरावरी
अंतिम बहुधा आज दिन हा या भूवरी
मना धीर धरी, करी अनुकंपा मजवरी

हे यौवन तव नवचैत्रासम साकार
घटासम वाढता दिसे कटी आकार
ते नयन नितळ गहिरे सरोवर फार
मी अति आतुर पोहून कराया पार

पुरे हे मौन मनोरथ माझे मनीचे जाण
ह्रदयी रुतला खोल तव प्रीतीचा बाण
करी त्वरा जरा करण्या अंत वेदनेचा
दुःखे त्यागीन विव्हळ व्याकूळ प्राण


- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १०/०६/२०२५)

No comments:

Post a Comment

आनंदोत्सव

निळापांढरा उडवीत पदर राधा होऊन धरती नाचे हिरवाईचा हर्षवायू बळीराजाच्या उरात साचे शिवारात वाऱ्याचा पिंगा पिकांचे तालात डोलणे थव्याथव्यांनी नभ...