Sunday, June 29, 2025

निळासावळा रेशीम पक्षी

हिरव्या ओल्या पाचूवरती
आभाळाची निळसर नक्षी 
असल्या चित्रामधुनी गातो 
निळासावळा रेशीम पक्षी

उद्याची न भ्रांत मनाशी
मिळेल तिथला दाणा टिपतो
उथळ संथ झऱ्यात जाऊन
पंख भिजवूनि न्हाऊन घेतो 

भिरभिर आपली थांबवून तो 
भवताली एक सखा शोधतो 
नाजूक रेखीव मान ताणूनि
मध्येच मंजुळ धून सोडतो

मावळतीच्या कुशीत जेव्हा
सूर्य जाऊनि डोळे मिटतो
निळ्यासावळ्या नभात तेव्हा
निळासावळा पक्षी उडतो

- संदीप भानुदास चांदणे (रविवार, २९/०६/२०२५)

No comments:

Post a Comment

आनंदोत्सव

निळापांढरा उडवीत पदर राधा होऊन धरती नाचे हिरवाईचा हर्षवायू बळीराजाच्या उरात साचे शिवारात वाऱ्याचा पिंगा पिकांचे तालात डोलणे थव्याथव्यांनी नभ...