Friday, July 25, 2025

आनंदोत्सव

निळापांढरा उडवीत पदर
राधा होऊन धरती नाचे
हिरवाईचा हर्षवायू
बळीराजाच्या उरात साचे

शिवारात वाऱ्याचा पिंगा
पिकांचे तालात डोलणे
थव्याथव्यांनी नभात घुमते
पक्ष्यांचेही मधुकर गाणे

दृश्य मनोहर मनी साधले
विसरून मी जगताला गेलो
आनंदोत्सव पाहून सारा
आज खरा मी भरून पावलो

- संदीप भानुदास चांदणे (शुक्रवार, २५/०७/२०२५)


Tuesday, July 15, 2025

सहा कोवळे पाय

नादमय सरसर

कोवळ्याशा वाटेवर

कोवळ्या सहा पायांची

चाल होई भरभर


एकामागे दुजा चाले

पुढचे पाहताना

पुढच्याचे ध्यान नाही

पुढे पुढे चालताना


कधीतरी भांबावून

पुढचा जागी थिजतो

हरवल्या मागच्याला

चार दिशां शोधतो


मागलाही नकळत

गेलेला पुढे जरासा

थबकून तोही टाके

पुढच्यासाठी उसासा


क्षणातच पुन्हा होई

नजरेत त्यांची भेट

हुश्श मनात करूनि

चालू पुढे त्यांची वाट


- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १५/०७/२०२५)

Monday, July 7, 2025

सुखाची सुरेख सुटी!

पावसातल्या सुटीचा हाही एक असा दिवस, ज्या दिवशी पाऊस त्रासदायक वाटत नाही. पावसाळ्याच्या मध्यावर कदाचित त्याची सवय झालेली आहे आणि पाऊसही सुरुवातीच्या धसमुसळेपणाने दमून आता शांत होऊन एका लयीत बरसत आहे. रस्ता अंगावर थेंबाचा मारा झेलीत गपगार होऊन पडलेला दिसतोय, त्याच्यावरून नेहमीची वाहनांची धावाधाव नाही. झाडे, भिजत उभी जणू त्यांचीही निवांत अंघोळ चाललेली आहे. सगळं भिजून चिंब चिंब झालंय पण चिकचिक नाही. पावसाच्या आवाजातही रिपरिप नाही तर संथ सरसर आहे जी निरंतर चालू आहे. शेजारच्या घराच्या बाजूला रस्त्याच्या कडेला एरवी धूळ खात उभा असलेली गाडी धुवून स्वच्छ निघाली आहे आणि तिच्याकडे कधी मनापासून बघितलं गेलं नसल्याने आज ती जणू नवीन असल्यासारखी भासत आहे. वेळ दुपारची आहे पण जरासे फिकट राखाडी आकाश आणि वातावरणातला गारवा यामुळे सकाळ अजून लांबली आहे आणि आता दुपार रद्द होऊन थेट चिमूटभर संध्याकाळ आणि मग परातभर रात्र होईल असं वाटतंय. गरम वाफाळत्या चहाचे घोट आणि सोबत चमचमीत भजी असा पूर्वापार परंपरेने चालत आलेला बेत किती समर्पक आहे आणि ज्याने कुणी ही परंपरा सुरु केली त्याला चहाच्या कपातून चहाचे दोन थेंब अर्पण करावे असं वाटतंय. आता काहीतरी सुरेख संगीत लावून त्या प्राचीन परंपरेचा पाईक होऊन ते कर्मकांड आटोपून अंगावर चादर घेऊन खिडकीच्या कडेला बाहेर बघत शांत पडून राहायचं डोळे मिटून झोप येईपर्यंत. वा! सुखाची सुरेख सुटी!


संदीप भानुदास चांदणे (सोमवार, ७/७/२०२५)

Wednesday, July 2, 2025

सुखनिद्रा

गारव्याची शाल मऊ अन
स्वच्छ निरभ्र नभ निळे
तृणपात्यांचा मऊ बिछाना
रोज न असले सुख मिळे

गंधाचा हलके शिडकावा
ताटव्यातली करती कुसुमे
मध्येच पिवळी सान पाकोळी
भवती येऊन स्वैर घुमे

दूर त्या क्षितिजापावेतो
नीरवतेचे गूढ धुके
लहरी वारा थबकून गातो
माझ्या मनीचे गीत मुके

माळावर बारीक झरा
एका लयीत खळबळ करतो 
असल्या अमोल क्षणात जाऊन
सुखनिद्रा मी चोरून घेतो

- संदीप भानुदास चांदणे (बुधवार, २/७/२०२५)

आनंदोत्सव

निळापांढरा उडवीत पदर राधा होऊन धरती नाचे हिरवाईचा हर्षवायू बळीराजाच्या उरात साचे शिवारात वाऱ्याचा पिंगा पिकांचे तालात डोलणे थव्याथव्यांनी नभ...