Wednesday, December 14, 2016

मुळांनी धरू नये अबोला

मुळांनी जमिनिशी अबोला धरून पानाफुलांना अडचणीत आणू नये
त्या बिचाऱ्यांच्या वाऱ्याशी बहराच्या गप्पा रंगलेल्या असतात

आपले अधाशी कोंब घेऊन वाट फुटेल तिकडे फुटू नये
जुन्या खंबीर इमारतीही मग भेगाळून ढासळू लागतात

घनघोर तूफान येतं चालून तेव्हा आपली जागा सोडू नये
मुळांवर विसंबूनच तर फांद्या तूफानाशी लढू शकतात

जावं खोल खोल रूजून, मातीवर उघडं पडू नये
वर कोरड्या उफाड्यात खाली झुळझुळ झरे असतात

इमान राखावं जमिनीशी, आभाळाकडे व्यर्थ पाहू नये
उन्मळून वर आलेल्या सांगा, मुळांना काय अर्थ आहे?

- संदीप चांदणे (बुधवार, १४ डिसेंबर २०१६)

No comments:

Post a Comment

पापणी

लवलवती पापणी... अश्रूंना घेऊन लपली, मिटल्याने झाली ओली आतल्या अंधारात तरी, पहा चमचमली ...लवलवती पापणी थरथरती पापणी... अश्रूंच्या लाटांनी, ब...