Tuesday, December 20, 2022

एकटेच सारे तारे

कधी कधी खूप एकटं वाटायला लागलं ना की मी रात्रीच्या आकाशात ताऱ्यांकडे बघतो. मग एकटेपणा जातो असं नाही पण त्याची जाणीव बोथट होते. ती बोचत नाही.

याचं कारण म्हणजे, आकाशाच्या अंगणात जितक्या ताऱ्यांची गर्दी तुम्हांला दिसेल त्यांना नीट निरखून पाहिल्यावर लक्षात येतं, हे सारे तारे एकेकटे राहतात अवकाशाच्या निर्वात पोकळीत.

अनंतकाळापासून ते तसेच आहेत आणि पुढेही अनंतकाळ ते तसेच 'एकटेच' राहणार आहेत.

कधीतरी त्यातला एखादा बंडखोर तारा दुसऱ्या कोणालातरी आपल्याकडे खेचून घेत असेल किंवा कुणाकडे तरी आकर्षिला जात असेल. आणि मग त्याची परिणती म्हणजे त्या दोघांची आयुष्याखेर. म्हणजे, एकटेच रहा नाहीतर विनाश हा ठरलेला आहे असं काहीसं.

त्यामुळेच, कधीकधी जेव्हा मला खूप एकटं वाटायला लागतं तेव्हा मी रात्रीच्या आकाशात तिथे खूप साऱ्या एकेकट्यांची गर्दी बघतो.

- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १७/०५/२०२२)

No comments:

Post a Comment

आनंदोत्सव

निळापांढरा उडवीत पदर राधा होऊन धरती नाचे हिरवाईचा हर्षवायू बळीराजाच्या उरात साचे शिवारात वाऱ्याचा पिंगा पिकांचे तालात डोलणे थव्याथव्यांनी नभ...