काळ्याकुट्ट अंधारात
खोल पाण्याच्या डोहातकुठूनतरी अकस्मात
बिया पडलेल्या सात
बियांनी त्या सावकाश
गाव तिथे वसवला
लालचुटुक फुलांत
सरोवर हरवून गेला
कमळाचा देठ डोले
लहरी लाटेवर झुले
मीच कमळाचा धनी
येता जाता देठ बोले
कमळाची पाने मोठी
भलतीच झाली हट्टी
आपसात त्यांचा वाद
दिवसरात्र जागेसाठी
कुणाचेही ना ऐकून
निवांत अंग ताणून
सरोवर सारे आपल्या
अंगाने देती झाकून
लाल लाल पाकळ्यांचा
सुरू गलका जाहला
आमच्याविना सरोवर
कधी कुणी का पहिला?
देठ आणि पाने सारी
गेली मग कोमेजून
त्यांच्याविना कमळाचे
रूप येईना दिसून
पानपक्षी तिथलाच
पाण्यात बुडी मारून
रूजलेल्या बिया त्याने
काढल्या एकेक करून
बिया दाखवून पक्षी
करड्या सुरात बोले
ह्यांच्यातूनच निघून
ह्यांना विसरून गेले?
बियांनी आपल्याला
नसते इथे रूजवले
तुम्हा साऱ्या अंगांना
असते कोणी पाहिले?
- संदीप भानुदास चांदणे (शनिवार, १०/१०/२०२६)