आता यात बरेच विभाग पडतील. जसे की पाकातले पदार्थ आणि बिनपाकातले पदार्थ. वर्ख चढवलेले आणि न चढवलेले. तळलेले आणि उकडलेले असेही प्रकार असू शकतील. पण जे काही होईल त्याने एक गोष्ट नक्की होईल ती म्हणजेच काही पदार्थ असे असतील की जे जास्तीत जास्त उचलले जातील. उदा. गुलाबजाम. हा कितीही तेलकट आणि हलकट असला तरी खूप लोकांची पहिली पसंती असतो. मग येतो मान पेढ्याचा. कारण प्रत्येक तोंड गोड व्हायच्या प्रसंगात याची गरज भासते. ढोकळा खाऊन तोंड गोड नाही होऊ शकत. ना शेव-चकली. म्हणजेच मान महत्वाचा. तर मुद्दा असा आहे की. ह्या सगळ्यात चांगले पदार्थ नजरेआड होतात म्हणजे अगदीच नाहीसे होतात असं नाही पण काहीसे दुर्लक्षित राहतात. काऊंटरवर गिऱ्हाईक शोधत राहतात. असे पदार्थ म्हणजेच बालुशाही, बदामी हलवा वगैरे. सोनपापडी वगैरे तरअगदीच तुम्ही सर्व पदार्थ खाऊन कंटाळला आहात आणि आता तुम्हांला बस करायला तोंड बंद करायचे आहे तर सोनपापडी खावी. असो, तर मुद्दा असा आहे की असे काही घटक असतात की टे जास्त लोकप्रिय असल्यामुळे त्यांच्याच इतर भाऊबंदावर उपासमारी वेळ येऊ शकते. ह्यात गुलाबजाम आणि पेढ्याचा पण काही दोष नसतो. ही लोकांची पसंती असते इतकेच.
फिल्मी दुनियेच्या बाबतीत बोलायचं झालं तर तर इथे दुर्लक्षित पदार्थच खूप. पण एखादाच चोखंदळ गिऱ्हाईक असतो तो जो असा एखादा पदार्थ टिपतो आणि त्याची लज्जत चाखतो. फिल्मी दुनियेतले असेच काही बालुशाही, म्हैसूरपाक पदार्थ म्हणजेच देवेन वर्मा, इब्राहिम चेऊलकर, जलाल आगा, सत्येन कप्पू, टिकू तलसानिया गुफी पेंटल , मॅक मोहन, ए. के. हंगल, इफ्तेखार, राजकिरण, ओमप्रकाश, केस्टो मुखर्जी, मुक्री, राजेंद्रनाथ, उत्पल दत्त, मुख्तार, दारा सिंग, असरानी, दिनेश हिंगू, दिलीप ताहील, रणजित, नाझिर हुसेन आणि मेहमूद. आता ही इतकी नावे घेतल्यावर तुम्हाला वाटेल की दुर्लक्षितच जास्त झालेत का? तर ते तसंही नाही. आता इथे एकदम ही नावे वाचताना त्यांची एकेक कामे आठवतील तर तुम्हांला जाणवेल की त्या त्या विशिष्ट भूमिकेत आणि काळात तुम्ही त्यांना विसरू शकत नाही किंबहुना त्यांच्याशिवाय त्या भूमिकेची कल्पनाही करू शकत नाही. म्हणजेच ही व्यक्तिमत्वे त्याअर्थाने अतिशय महत्वाची ठरतात.
'मुझमे कोई ऐब नहीं है सिवाय इसके की मैं कभी झूठ नहीं बोलता' म्हणणारा देवेन वर्मा असेल की टेलिफोनच्या घंटीबरोबर चेहऱ्याचे हावभाव जुळवणारा दिनेश हिंगू असेल तुम्ही त्याला विसरून नाही जाऊ शकत. ही नावे अशी आहेत की जी त्या चवीला समोर आणतात की जी एरवी दुर्लक्षित राहिली आहेत. मग आपण विचार करतो अरे, हे तर खरंचं चवदार आहे आपण हे नीट पाहिलंच नव्हतं. कित्येक चित्रपट असे आहेत की तुम्ही त्याची कथा-गाणी वगैरे सर्व विसरून गेलेले असता मात्र त्या चित्रपटातला ठराविक प्रसंग तुमच्या मनात ठसून बसलेला असतो. त्याचं कारण म्हणजेच ही दुर्लक्षित चवीची पदार्थ नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी चव देतात आणि आपल्याला लगेचच ते जाणवत आणि जाणवलं की ते भावत. या कलाकारांची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट असते ती म्हणजे त्यांचा प्रवेश. ही जी नावे मी लिहिली आहेत त्यातली जवळपास सर्वच नावे तुम्ही काढून बघा आणि त्यांचा पहिला फिल्मी अवतार आठवा. तुम्हाला दिसेल की त्यांच्या पहिल्या स्क्रीन अवतारातच ते अशा थाटात वावरले आहेत जणू काही मुरवलेलं चवदार लोणचं.उदा सांगायचं झाल्यास गुड्डी सिनेमा हा असरानीचा पहिला सिनेमा होता पण पुन्हा पुन्हा पाहून बघा आणि सांगा कुठे तुम्हाला असरानी नवखा वाटतोय ते. म्हणजे वयाने आणि अंगकाठीने दिसतोय पण व्यक्तीरेखा अशी काही त्याने साकारली आहे त्याने तुमच्यासमोर एक एक प्रौढ आणि संयत पात्र उभे राहते.
असे अनेक कलाकार होऊन गेले ज्यांच्या केवळ नावाने चित्रपट चालत.किंवा ते असले की लोक इतर काही न बघता तो चित्रपट बघायला जात. असा एक कलाकार म्हणजे मेहमूद. एक काळ असाही आला ज्यात हिरो कोणीअसला तरी चालत होता पण निर्मत्याला विनोदाची मदार मेहमूदवर सोडावी लागत होती.ओमप्रकाश उत्पल दत्त यांनी तर एक पिढीला चेहरा देण्याच काम केलं आहे. चांगला सासरा, किंवा वडीलधारं व्यक्तिमत्व या व्यक्तीरेखा करताना त्यांच्या अभिनयात कमालीची सहजता दिसून येते. भूमिका लहान असो वा मोठी. ह्या कलाकारांनी असं काही काम करून ठेवलेलं आहे नाव काढताक्षणी तुमच्यासमोर तो प्रसंग असा जिवंत होतो जणू तुम्ही स्वतः तिथे त्या क्षणी त्या प्रसंगाचे भाग असता.
- संदीप भानुदास चांदणे (गुरूवार, ५/११/२०२६)