Sunday, December 1, 2024

काळाच्या पाचोळ्यातलं पान

काळाच्या पाचोळ्यात
अजून एक,
देठापासून तुटलेलं, 
आधीच सुकलेलं
आणि आता
वाळून आक्रसलेलं पान
हळूच आवाज न करता
कुठूनतरी येऊन पडेल
आणि विसावेल
त्या जाळीदार पानावर
असतील खुणा माझ्या
तुझ्यावरच्या प्रेमाच्या
त्याला असेल गंध
तुझ्या स्पर्शाचा
एकेक रेघ जणू
एकेक गोष्ट असेल
तुझ्या माझ्या भेटीची
तुझ्या हुरहुरण्याची
माझ्या आतुरतेची
त्यातच जणू कोरले असेल शिल्पपट,
आपल्या न जगलेल्या आयुष्याचे
की, जगू पाहणार्‍या स्वप्नांचे
पुढे कधीतरी कुणीतरी
त्या पानाला हातात घेऊन
बोटांच्या चिमटीत धरून
हळूच उचलतील
इकडेतिकडे गोल फिरवीत
निरखून बघतील
आणि म्हणतील
काय वेडा माणूस होता तो
इतकं कुणी प्रेम करत का कुणावर?

- संदीप भानुदास चांदणे (शनिवार, ३०/११/२०२४)

No comments:

Post a Comment

एकली नाव

एकली नाव दूर सागरी  परतीचा रस्ता  लाटांना विचारी  ऐकेना समुद्र  काही करून  वल्हे थकले  पाण्याशी भांडून  झुले भयाण  हिंदोळ्यावरी  एकली नाव  द...