Sunday, April 20, 2025

प्रश्न अस्तित्वाचे

अथांग अफाट विश्वपसारा
त्यात यत्किंचित सूर्यमाला
आठ ग्रहांची जपमाळ ही
जाणे जपतो कोण कशाला

अवाढव्य आकार ग्रहांचे
परि जीवना थारा नाही
श्वासातून मनात रूजावा
असला तिथे वारा नाही

अबोध जीवा ओढ अनामिक
पृथ्वी नामक पाषाणाची
दीर्घिकेच्या कक्षेपल्याड
सर ना त्यास धूलिकणाची

मानव कधी पृथ्वीवर आला?
कशातून जन्म सूर्याचा झाला?
प्रश्नांतून नवे प्रश्न जन्मती
रोज मतिभंगुर प्रश्न उशाला

विज्ञानाची वीतभर दोरी
अध्यात्माचा कासरा हातभर
तरी न उमगले आजवर हे
जन्म मृत्यूचे गूढ अवडंबर

कितीक धर्म जगती आणि
प्रेषित पोथ्या घेऊन आले
काळाच्या महाकाळसर्पाने
सारे सहजी गिळून घेतले


काळ काळ हा असतो काय?
येतो कुठुनी जातो कोठे?
एक बाब आहे खचितच
काळाहून ना कोणी मोठे

निमित्त कसले? काय प्रयोजन?
भौतिकतेच्या भोवतालचे
मानवा छळतच राहतील हे
प्रश्न आपुल्या अस्तित्वाचे

- संदीप भानुदास चांदणे (सोमवार, २१/०४/२०२५)

No comments:

Post a Comment

आनंदोत्सव

निळापांढरा उडवीत पदर राधा होऊन धरती नाचे हिरवाईचा हर्षवायू बळीराजाच्या उरात साचे शिवारात वाऱ्याचा पिंगा पिकांचे तालात डोलणे थव्याथव्यांनी नभ...