Saturday, May 3, 2025

माणूस आणि पुस्तक

माणूस हळूहळू माणूस होत होता
आधी एकटा, पुढे कळप होत होता

मग बोलायला शिकला, चाक बनवले
गुहा सोडून घरात आला, गाव बनवले

नंतर संवादासाठी भाषा विकसीत झाली
त्याच्याही पुढे जाऊन लेखनकला आली

हुशार माणसाने आधी लिहून काढला देव
त्यातून माणसालाच म्हणाला डोकं इथे ठेव

माणसाला डोकं म्हणजे मेंदूच वाटला
डोकं नि मेंदूत जरा गल्लत करून बसला

माणसाने माणसाला काही प्रश्न विचारले
माणसाने पुस्तकाकडे सरळ बोट दाखवले

माणसाने माणसाकडे दयेची भीक मागितली
माणसाने पुस्तकात कुठे सापडते का बघितली

माणसाने सगळं सोडून जगण्याचा प्रयत्न केला 
माणसाला हा पुस्तकाचा घोर अपमान वाटला

उठता-बसता, खाता-पिता, जागेपणी-झोपता
पुस्तकातून माणसाचा माणसावर पहारा जागता

पुस्तकापुढे ठेवलेला मेंदू परत मिळेल का?
माणसातला माणूस माणसाला दिसेल का?

- संदीप भानुदास चांदणे (शनिवार, ०३/०५/२०२५)

No comments:

Post a Comment

आनंदोत्सव

निळापांढरा उडवीत पदर राधा होऊन धरती नाचे हिरवाईचा हर्षवायू बळीराजाच्या उरात साचे शिवारात वाऱ्याचा पिंगा पिकांचे तालात डोलणे थव्याथव्यांनी नभ...