Saturday, January 1, 2022

ग चांदण्यांनो

नका ग चांदण्यांनो
नका येऊ खिडकीत
तिच्या मनाचा ठाव
सांगा येऊन पडवीत

सांगा तिच्या गाण्यात
का, आहे नाव माझे?
माझ्याविन विरहाचे
का, सोसते ती ओझे?

ठावे तिलाही आहे
का, रात्री कवितांचे
येती जथ्थे, जाती
स्वप्न गाऊन उद्याचे?

आतूर प्रीत आत
रोज झुरते उरात
सांगा तिला हे सारे
चमचमत्या सुरात

तिचे चालणे बोलणे
भास होऊन छळते
लय श्वासांची तेव्हा 
आठवांशी अडखळते

सारे आठव आठव
युगांच्या जणू फेऱ्या
रेखू पाहती नशीबाला
तळहातावर कोऱ्या

पसा पसा सुखाचा
तिला देईन मोजून
बघा चांदणझुल्याचे
झोके रितेच अजून

जा, जा ग चांदण्यांनो
जा करा काम थोडे
या माझ्या कवितांचे
पाडा तिच्यापाशी सडे

- संदीप भानुदास चांदणे (२४/०२/२०२०)

मोकळ्या करा पखाली

परिणती असो वा नियती
पानगळीत पाने गळती
पण, झाड उन्मळून पडता
हा दोष कुणाच्या माथी?

बहरून सळसळणारे
झाड आपुल्या ताली
जमिनीवर पडते तेव्हा
ना त्याला उरतो वाली

कोमेजून करपून जातील
कोवळी फुले त्यावरची
वेळीच छाटणी करवून
रूजवात करा फुटव्यांची

वादळ नवे येण्यापूर्वी
मोकळ्या करा पखाली
रूजणाऱ्या अंकुरांना
घ्या मायेच्या हाताखाली

- संदीप चांदणे (मंगळवार, ११/०५/२०२१)

रोशनदान

कभी हुआ करता था जो एक शानदार मेहराबदार रोशनदान आज उसकी शान-ओ-शौकत एक पान की दुकान नोचती हैं उस ठेलेपर तो जमघट लगताही होगा बेकदरदान जमाने का ...