Tuesday, May 11, 2021

मखमली तम

मखमली तम सांडले
ओंजळीत आभाळाने 
आणि शोभा आणली
अतिशीत चांदव्याने

छेडी राग प्रणयाचा
धीट चांदणी नभात
आळविते तेच पुन्हा
कापऱ्या मऊ स्वरात

रानामध्ये पानाआड
कधी अवचित कोकिळ
जाणे कुठे नीज ठेवून
गातो विरहगीत मंजुळ

वाटा रस्ते निपचित
कोणी बोलेनासे झाले
अंधाराच्या डोहामध्ये
एकेक घर बुडून गेले

- संदीप चांदणे (रविवार, ९ मार्च २०२१)

Sunday, May 2, 2021

पुस्तक परिचय - फुले आणि मुले

लॉकडाऊनसारख्या नीरस काळात घरात बसून काय करावे हा प्रश्न दर दोन दिवसांनी वळवाच्या पावसासारखा गडगडत धावत येतो. घरातली कामे, पाककृतींचे प्रयोग, मुलांसोबत खेळ-मनोरंजन, चित्रपट या सगळ्यांचाही काही काळानंतर तिटकारा येतो. घरातली पुस्तकेही परत परत वाचून झालेली असल्यामुळे ती हातातही धरवत नाहीत. काय नवीन करायचं हा प्रश्न सतत छळत असतो. माझंही आजच्या रविवारी असंच झालं. अशातच एक पुस्तक हाती आले. आचार्य अत्रे यांचे "फुले आणि मुले." नावावरूनच लक्षात येतं की हे पुस्तक लहान मुलांसाठी आहे.

आधी कित्येक वेळा वाचलं असलं तरी आता मुलांना वाचून दाखवायच ह्या हेतूने वाचायला घेतलं तर शेवटचं पान वाचूनच खाली ठेवलं. अर्थात, पुस्तक काही मोठं नाही. अगदी लहान-लहान, फाफटपसारा न करता लिहिलेल्या अठरा कथांचा यात समावेश आहे. आचार्य अत्रे यांच्या समर्थ लेखणीचा हा वेगळा पैलू आपल्याला थक्क करून सोडतो.

अतिशय बोलक्या, नेमक्या आणि साध्यासोप्या शब्दांत, मुलांचे भावविश्व उलगडून आपल्या काळजाला हात घालणाऱ्या या सगळ्या कथा आहेत. काही काही कथा वाचताना टचकन डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. वैयक्तिक माझ्याबाबत बोलायचं झालं तर, 'ए, बाबा रडतोय बघ!' अशा बोलण्यांनी मी भानावर येऊन पुन्हा वाचायला सुरूवात करीत होतो. असं बऱ्याच वेळेस झालं. 

नंतर माझ्या लहान मुलींना ह्यातल्या काही कथा वाचून दाखवल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी वगैरे आलं नाही पण वाचून झाल्यावर, मधमाशांचं पोळं सुटून माशा सैरभैर व्हाव्यात तसे प्रश्न माझ्यावर कोसळले. त्यांना सांगितलेल्या प्रत्येक कथेतली पात्रं त्यांना खूप आवडली, पुन्हापुन्हा आठवत राहिली. अजून काही दिवस अजून खूप प्रश्न येणार आहेतच.

प्रस्तावनेत पुस्तकातल्या कथांचं, त्यांच्या विषयांचं समर्पक शब्दांत जणू निरूपण केलेलं आहे. आचार्य अत्रेंनी थोडक्यात आपली हे पुस्तक लिहितेवेळीची मनोभूमिका स्पष्ट केली आहे. मुलांविषयी त्यांचा असलेला जिव्हाळा, आपल्या शिक्षकी पेशामुळे मुलांसोबत आलेले अनुभव त्यांबी खुबीने या पुस्तकात वापरले आहेत. सर्व वाचून झाल्यावर नेहमीप्रमाणे आचार्य अत्रेंना मी मनोमन वंदन केले. असे मुलांसाठीचे निर्भेळ लेखन मराठीत पुन्हा आले नाही अशी बोचरी जाणीवही लगेचच झाली.

हे पुस्तक बाळगोपाळांसाठी असले तरी मोठ्यांनी मुलांचा निरागसपणा पुन्हा अनुभवताना आनंद मिळेल यात शंका नाही. मुलांचे निरागस भावविश्व तितक्याच निरागसतेने दाखावणारं हे एक दुर्मिळ पुस्तक आहे. अवश्य मिळवून वाचा. इतके वाचल्याबद्दल धन्यवाद.






- संदीप चांदणे (रविवार, २/५/२०२१)

रोशनदान

कभी हुआ करता था जो एक शानदार मेहराबदार रोशनदान आज उसकी शान-ओ-शौकत एक पान की दुकान नोचती हैं उस ठेलेपर तो जमघट लगताही होगा बेकदरदान जमाने का ...