Tuesday, May 24, 2016

हिरवीन

अरे हटाव बाजू हिमालया
आन फेअर ॲन्ड लवलीच्या
कापूसभरल्या भावल्यांना
तूच माझी हिरवीन खरी ग!
एकच बावनकशी ब्युटी ग!

झालो तर्राट आन लैच्च सैराट
खुळा झालोय, सकाळ संध्याकाळ
लोकं बघणार कायबाय बोलणार,
तरीबी, तुझच ध्यान काढीत बसणार ग!
आता ही येवढीच माझी ड्युटी ग!

काय सांगू, दिसते कशी तू
फुलावरली जणू पाकुळीच मऊ
ग्वाड गुलाबजाम पाकातला
आन रसमलाई सगळी फिकी ग!
तूच ग माझी, हायेस लै क्यूटी ग!

संदीप चांदणे (२४/५/२०१६)

Wednesday, May 11, 2016

मी मनातला...

मन खाई हेलकावे
खाली पिसापरि जाई
उतरे खोल खोल किती
पाय धरणीवर नाही

घेती कल्पना अफाट
रूप पाल्हाळ वेल्हाळ
व्हायचे ना त्यांचे काही
दोन घडीचाच खेळ

दोन घडीचा जरी तो
डाव भातुकलीचा रंगे
ना कुणी सोबती लागे
मन, मनाच्या जेव्हा संगे

मन तंद्रीत लागून
करे कसला विचार?
विचारता, गप्प गप्प
म्हणे विसरलो सारं!

जाई कालपरवाच्या गावा
हसण्या खेळण्या तिथे
कधी उद्यात डोकावी
आज विसरून मागे इथे

नाही मनाच्या पायाला
बेड्या कुणी बांधियेल्या
त्याच्या गावाला सीमाही
नाही कुणी रेखियेल्या

रे मना तू सांग इतकेच
आत राहून माझ्यात
का आहे ठाऊक तुज
मीच असतो तुझ्यात!

- संदीप चांदणे (७/५/२०१६)

समरस व्हावे ऐसे

थांबल्या पळी या प्रेमाच्या
क्षण एक तू डोळ्यांत पहा
कृत्रीमतेचा उतरवून साज
रेशमी मिठीत सजून पहा

दे शब्दांना आधार तुझ्या
गंधीत मौनाच्या साथीचा
दे स्पर्श पुन्हा हळुवारपणे
थरथरत्या हळव्या अधरांचा

शीतल छाया, मी घनदाट तरू
तू वळणारी खळखळ सरिता
मी एक डोलता प्राण अचल
तुज पाहून, अविचल वाहता

मी धागा अतूट प्रितीचा
तू फूल एक नाजूकसे
गुंफता प्रित, गुंतता हृदय
प्रेममाला सुरेख शोभतसे

परिणीती, धुंद श्वासांची
लयदार काव्यात व्हावी
सूर जुळता ही तमवसने
कोमल स्वरात न्हावी

मी स्वत:स विसरून जावे
तू असे मला निरखावे
डोळ्यांनी तन्मयतेने
मग युगल गीत गावे

संकोच मनी, भारल्या क्षणी
ना स्पर्शे उभय चित्तांशी
तू अवघी तुला, मीही मजला
जोडतो समर्पणभावाशी

वेडेपण अन् आंधळेपण
असेल उरात जे काही
निथळूदे सारे सारे उत्कट
न राहो मागे उरले जराही

थिजूदे भौतिकता भवती
वा, उधळूदे जीवन वाटांतून
देऊ झोकून दोघांना दोघे
निळ्या गगनाच्या काठांतून

- संदीप चांदणे (५/५/२०१६)

जिवनाचं प्रतिक!

शहरच आहे हे...
धावणारं...जिवंत...गतिमान!
जिवनाचं प्रतिक!
धावतच राहणारं, तुलाही पळवणार
पळशील तू... जोर लावून, यथाशक्ती…
पण परिघाबाहेर नाही जाऊ शकणार
परीघाबाहेर गेलासही कधी...
तर पाहशील...
विशाल राने,
गर्दी करून उभी ठाकलेली वने
उत्तुंग गिरीशिखरे
नद्यांची विस्मयचकित करून सोडणारी उगमे
किलबिलाट पशुपक्ष्यांचा
लांबच लाब पसरून ठेवलेल निळ आभाळ
त्यावर शिंपडलेले
ढगांचे रंगीतपानी सडे
वाऱ्याचे निर्भेळ गाणे
कुरणांची डोलती शिरे
राशी कातळाच्या ओळींत
पठारावरची अनामिक फुले…
…निळी-जांभळी, पिवळी
मोकळी विहरणारी पाखरे
छे! सारं कसं निरर्थक! शांत शांत...
ये परतून शहरात...पहा
शहरच आहे हे...
धावणारं...जिवंत...गतिमान!
….जिवनाचं प्रतिक!

- संदीप चांदणे (११/५/२०१६)

रोशनदान

कभी हुआ करता था जो एक शानदार मेहराबदार रोशनदान आज उसकी शान-ओ-शौकत एक पान की दुकान नोचती हैं उस ठेलेपर तो जमघट लगताही होगा बेकदरदान जमाने का ...