Monday, March 21, 2016

दहशत - एका नव्या रूपात!

त्याने असं काय विचारल तिला की आतापावेतो गप्पांमध्ये सहभागी असणारी ऑफिसातली मंडळी अचानकपणे सुन्न झाली. आमावस्येच्या रात्री गावाबाहेरच्या जुन्या पडक्या देवळामागच्या काळोखात बुडून गेलेल्या झुडूपांमध्ये असते तशी भेदक कळा त्या झगमगत्या फॉल्स सिलींगमधल्या रोषणाईला आली होती. शांततेचा पारा तर उणे शेकड्यात जाऊन गुरफटून बसला. काहींच्या चेह-यावर अस्वस्थता इतकी दाटली की त्या ऑफिसातल प्रत्येक क्युबिकल आयसीयू वार्ड प्रमाणे भासू लागल. तिथल्याच एका क्युबिकलवर दोन्ही हातांनी रेलून उभा राहत ऑफिसमध्ये नव्यानेच जॉईन झालेल्या अंतराला दुपारच्या चहानंतरच्या एका निवांत वेळी, "कोण कोण असतं मग तुझ्या घरी?" असा साधासा वाटणारा पण ज्यायोगे तिथल्या वातावरणात नाट्यमय बदल व्हावा असा प्रश्न तिच्या सिनीयरने म्हणजे प्रशांतने विचारलेला. तंग झालेल वातावरण पाहून त्याच्या लक्षात आलं की, काहीतरी गडबड नक्की झालेली आहे. पण नेमकी काय? ते माहित नसल्याने तिच्या कसल्याही प्रकारच्या उत्तराला तो सज्ज झाला.
बऱ्याच जणांनी एव्हाना नाईलाजाने मॉनिटरमध्ये डोके खुपसले. काही जणांनी शेजाऱ्याकडे हॉरर चित्रपटातला प्रसंग समोर असल्यासारखा चेहरा करून आता काय? असे नजरेच्या आणि मानेच्या क्रिकेटमधल्या, हॅन्ड आय कॉर्डिनेशनप्रमाणे प्रावीण्य दाखवत विचारले. त्यावर तेवढ्याच सफाईने 'आता बस्सा!' असे उत्तरही येत होते. आणि आता तिला उत्तरासाठी सरसावून उभी राहिलेली पाहताना तर कित्येकांच्या काळजाचा ठोकाच चुकला! बऱ्याच कपाळांवर घामाचे थेंब जमा होऊ लागले!
आणि ती चेह-यावर आजच बीआरटी रस्त्याच उद्घाटन व्हावं आणि तो नवा रस्ता नव्या उत्साहाने भरून जावा तशी पूर्ण बहरात हसत बोलू लागली, "आम्ही ना सर दोघ बहीण-भाऊ आहोत! भाऊ इथेच आहे हिंजवडी आयटी पार्क मध्ये, आणि आईवडिल असतात घरी मिरजेला. तिथे माझे दोन मोठे काकाही राहतात. मी त्यांना बाबा१ आणि बाबा२ म्हणते. म्हणजे आमची एकत्र फॅमिली आहे. मोठे काका आहेत ना त्याना तीन मुलं आहेत. दोन मुलं- अमोलदादा आणि अशोकदादा आणि एक आमची अर्चनाताई. दोन नंबरचे काका आहेत ना त्यांना पण तीनच मुलं आहेत  म्हणूनच आमची आज्जी आमच्या बाबांना म्हणाली, 'सुधाकर' तू दोघांवरच बास कर.' सुधाकर म्हणजे माझे वडील! दोन नंबरच्या काकांच्या मुलांची नाव, अर्पिता, आरोह आणि अरूण अशी आहेत. कसल भारी ना?! (कसल? असं, प्रशांतच्या चेहऱ्यावर उमटल!) आमच्या सगळ्यांची नाव 'अ' वरून ठेवलीयेत! माझ्या लहान भावाचं नाव अर्णव आहे. आमच्या आजोबांना प्रणव ठेवायचं होतं. पण आमची आज्जी म्हटली, 'हॅट्ट! जमायच नाही! आता ह्या शेवट्ल्याचं तर 'अ' वरून ठेवलच पाहिजे.' आमची आज्जी खूप हुशार होती. सगळे तिला मानायचे. प्रणवशी कसं मिळतंजुळतं नाव ठेवल ना तिने?" प्रशांतला उत्तरासाठी वेळ न देता अंतरा पुढे बोलत राहिली, "आमचे आजोबा पण भारी होते. माझा खूपच लाड करायचे! माहितीये का? (इथे प्रशांतला फक्त मानेनेच 'नाही' म्हणता आले!) ते मला मुलगाच मानायचे, म्हणजे मी जरी मुलगी असले ना तरी पण त्यांनी माहितीये का मला मुलासारखंच वाढवल, माझे लाड केले. मी जोपर्यंत दहावीत होते ना, तोपर्यंत ते रोज मला शाळेत सोडायला यायचे! तशी माझी शाळा जवळच होती, दोन गल्या ओलांडून त्याच्या पुढच्या मैदानासमोर! आमच घर पण ना खूप मोठ्ठ आहे. म्हणजे पाहिजेच ना! एकत्र फॅमिली आहे ना आमची! आम्ही सगळे खूप धमाल करतो! अशोकदादा आणि अर्चनाताई एक नंबरचे हुशार आहेत माहितीये का? (इथे पुन्हा एक 'नाही' म्हणण्याचा प्रशांतने निष्फळ प्रयत्न केला!) माझी ट्यूशन तेच घ्यायचे. त्यांच्यामुळेच मी इंजीनियरींग करू शकले. माहितीये का? (आता प्रशांतची बॉडी दगडी पुतळ्यासारखी आखडून बसली होती!) ते दोघ शाळेत असल्यापासून ट्यूशन घ्यायचे आणि थोडेफार पैसे कमवून घरी द्यायचे. आमच्या घरातच नाही तर सगळ्या नातेवाईकांत त्या दोघांच कौतुक आहे! मला ते दोघ फार आवडतात. ते मोठे आहेत ना, ते पण माझा लाडच करतात. माहितीये का? (प्रशांत आता चक्क 'हो' म्हटला, तरी अंतराच चालूच!) ते पण ना मला मला मुलगाच समजतात आणि स्वत: एवढे हुशार असूनसुद्धा मलाच म्हणतात की तू खूप हुशार आहेस म्हणून. माझे बाबा पण ना मला विचारल्याशिवाय कुठले काम करत नाहीत. माझे दोन्ही काका पण ना, म्हणजे, त्यांच्या स्वत:च्या मुलांचा लाड करत नाही एवढा माझा लाड करतात. माझ्या २ नंबरच्या काकांच गोल आळीत बरोबर मध्ये कपड्याच मोठं दुकान आहे, तर ते कामानिमित्त म्हणजे नवीन माल वगैरे आणायला बाहेर जातात ना. म्हणजे मैसूरला वगैरे, तर न चुकता दरवेळी तिथून मला पाक आणतात. तो फेमस आहे खूप, मैसूरपाक म्हणतात त्याला! मला खूप म्हणजे खूपच आवडतो मैसूरपाक! इतका आवडतो ना की तुम्ही दुसरं काही जरी दिलंत ना मला मिठाई म्हणून खायला तर मी खाणारच नाही!" "कसा मिळतो हा मैसूरपाक?" प्रशांतला तिच्या बोलण्याच्यामध्ये ही जराशी जागा मिळाली खरी, पण असला पाचकळ प्रश्न विचारून तिला थांब म्हणायची दुर्मिळ संधी त्याने दवडली होती. दिवसभर टिच्चून फलंदाजी करणाऱ्या बॅट्समनचा स्लीपमध्ये कॅच सोडल्यावर स्वत: कॅच सोडणाऱ्याला आणि इतर टीम सहकाऱ्यांना जे काही वाटत असेल तसच त्यालाही वाटून गेल! आजूबाजूच्यांचे डोळे आणि देहबोली तेच सुचवत होती. एकदोन लांबचे ओठ 'हार्ड लक!' असे पुटपुटल्यासारखेही त्याला भासले.
" ऑं! कसा मिळतो म्हणजे? पॅक करून!" अंतराने भोळेपणात सुलोचना चव्हाण यांनाही इथे मागे टाकले! "अग तसं नाही, म्हणजे कुठल्या दराने, काय किलो असतात ते? असं?" अरेरे हे म्हणजे बॅट्समन त्रिफळाचीत व्हावा आणि नो बॉल निघावा असे झाल्याचे क्षणातच प्रशांतला जाणवले! आजूबाजूला काही हताश हातांच्या घड्या आणि पराकोटीच्या निराशेने केसातून घाईघाईने फिरलेले हात प्रशांतला अस्वस्थ करून गेले आणि या महापूर आलेल्या नदीवर नेमके कुठे आणि कसे धरण बांधायचे हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला.
" ते काय मला माहित नाही, पण मैसूरला स्वस्त मिळतो म्हणतात. आणि तिथलाच चांगला असतो. मी इकडचा दुसरा कुठला खात पण नाही! मी जेवण पण ठराविक प्रकारचं आणि ठराविक ठिकाणीच घेते. म्हणजे, मला पहिल्यापासूनच तशी सवय आहे, आमच्या घरच्यांनीच (गाडीने परत वेग घेतल्याचे पाहून प्रशांतही आता शांत झाला व शून्यात पाहू लागला! त्याच्या हातात कागदी कप होता चहाचा, तो आता गोळामोळा होऊन खोडरबराएवढा झाला होता.) अशी चांगली सवय मला लावली आहे. तशा माझ्या सगळ्याच सवयी चांगल्या आहेत! माझ्या रूममेट्स पण म्हणतात की, 'अग तू आहेस म्हणूनच इथे आम्हाला छान वाटत नाहीतर आमच काय झाल असत? ('मी आहे की' अस म्हणायला प्रशांत तयारच होता पण सगळे सिग्नलचे दिवे हिरवे करून अंतराची एक्सप्रेस सुसाट चालली होती!) तीन रूममेट्स आहेत मला. आम्ही खूप मज्जा करतो! (एरवी त्यांच्या मज्जा ऐकायला किंवा पाहायला प्रशांतला प्रचंड आवडले असते. पण आज.... आत्ता...) आम्ही तिघी वेगवेगळ्या फील्ड मधल्या आहोत. सर तुम्हाला 'बोर' तर नाही होत ना?" "अं...नाही, बोल की!" त्या अनपेक्षित प्रश्नाच्या गुगलीने प्रशांतची विकेट उडालीच आणि आजूबाजूला त्याचे निषेधात्मक पडसाद लगेच उमटलेही. कुठे स्टेपलर टेबलावर आदळला गेला, कुणी कागद भिरकावले, कुठे लोखंडी मोजपट्टी फरशीवर ठण्णकन् आदळली!
पण असल्या आवाजाने फरक पडेल ती अंतरा कसली! परत सुरू झाली, "सगळे म्हणतात की तू खूप बोलते म्हणून. पण मी काय करू ना! आता, आहे मला सवय! तशी प्रत्येकालाच कसलीतरी सवय असतेच ना! मग माझी सवय निदान वाईट तरी नाहिये ना. उलट मला फायदाच होतो. माहितीये का? (श्या! आपल्याला काहीच माहिती नाय राव! असे प्रशांतला वाटून गेले) शाळेत आणि कॉलेजमध्ये नेहमी वक्तृत्वस्पर्धेत माझाच नंबर यायचा! मी भाषणातही पुढेच असायचे. आमचे सर नेहमी कुठल्याही कार्यक्रमाला मला बोलायला सांगायचे. आणि मी पण कसलीही तयारी नसताना बोलायचेच! (त्याच प्रात्यक्षिक प्रशांतसोबत सगळं ऑफिस पहातच होत) मला म्हणजे खूप आवडत बोलायला!" इथे अचानक सगळे दिवे बंद पडून ऑफिसमध्ये अंधार झाला. ऑफिसच्या बिल्डींगमध्ये सकाळपासून जनरेटरच्या मेंटेनेन्सचे काम सुरू असल्याने अधून मधून वीज जात होती. दोन मिनीटांनंतर वीज पुन्हा आली आणि अंतरा परत बोलायला सुरूवात करते तोच तिला, आत्ता समोर असलेला प्रशांत दिसत नव्हता. जराशी हिरमुसल्यासारखी होऊन ती तिच्या जागेवर जाऊन बसली. शेजारच्या नमीताकडे वळून ती काही बोलणार तेवढ्यात नमीताला हिंदीत 'काटो तो खून नही' आणि मराठीत 'पळता भुई थोडी' झाली! खुर्चीवरून धडपडून उठत ती कशीबशी बाहेर रिशेप्शनकडे धावली!
इकडे कॅफेटेरियात प्रशांत अजून एक मोठ्ठा कप चहाचा घेऊन बसला, त्यात लिंबू पिळून प्यावे की काय असे त्याला वाटू लागले. आपल्या बाजूला येऊन उभा राहिलेल्या अमितकडे त्याच लक्षही नव्हतं. शेवटी अमितनेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा तो भानावर आला. त्याने अमितकडे पाहिले, दोघेही कसनुसं हसले. प्रशांतने हातानेच अमितला बसण्याची खूण केली. तो बसत असतानाच प्रशांतच्या मनात आलं, च्याआयला, ह्याच पण नाव 'अ' वरूनच आहे! अमित प्रशांतला म्हणाला, "जाम बोलते यार ती! तुला माहित नव्हत ना?" "हो ना राव, कान शेकून निघाले! बहुतेक माझा प्रश्न चुकला, दुसर काहीतरी विचारायला पाहिजे होत का रे?" प्रशांतने विचारले. तसा झटक्यात अमित बोलला, "अरे नाही रे, तू तिला अगदी सहजच नुसत, 'काय, मजेत? निवांत का?' एवढ जरी म्हटला असतास तरी उत्तराची सुनामी आलीच असती." त्याच्या या बोलण्यावर दोघे परत बळेच हसले आणि चहा संपवून दोघेही ऑफिजात जायला निघाले तर समोरून अंतरा घाईघाईने त्यांच्याकडेच येताना दिसली. अमितने मनात 'मारूती स्त्रोत्र' म्हणत कॅफेटेरियाच्या काऊंटरची वाट धरली तर प्रशांत अंगाला लकवा मारल्यासारखा जागीच थिजून उभा राहिला. दहशत का काय म्हणतात ती हीच का? असे प्रशांत मनातून स्वतःलाच विचारू लागला!
"सर, मघाचं बोलण अर्धवटच राहून गेलं ना... बरं झाल तुम्ही इथे भेटलात...."
- संदीप चांदणे (२०/३/१६)

Sunday, March 20, 2016

माझ्या कवितेत!

जगून घेतो शब्द न् शब्द, जे नसते शक्य इथे प्रत्यक्षात
जेव्हा मी, माझ्यात बांधला गेलेला, सुटतो आणि शिरतो, माझ्या कवितेत!

जगतोय हे आभासी जग आहे की काय असले प्रश्न जेव्हा पडतात
तेव्हा वास्तवतेच्या चिमट्यांनी मी थेट जागा होतो, माझ्या कवितेत!

ह्यांची वाचून, त्यांची ऐकून, जेव्हा सगळ्यांच्या पाहून संपतात
मी मलाच, डोळे मिचकावत बसलेला असतो, माझ्या कवितेत!

कधी तर खोल अर्थ, गहन प्रश्न, छन्द-ताल, वृत्त हे कोणीही तिथे नसतात
मी जसा असतो रोजच, अगदी तसाच असतो नेहमी, माझ्या कवितेत!

शाईचे प्रमाण वा कागदाच्या कुठल्याही तिला सीमा नसतात
कारण माझे मन..
                   मनाचा कागद
                   मनाचा पेन....
                   ....मन शोधते
                   .... मनाला!
                          ...... हेच असतं नेहमी मनात अन् माझ्या कवितेत!

या इथे, घटकाभर बसा, माझे शब्द खुणावतात, प्रेमाने बोलावतात
बसून बघा, वाटले तर हसा, बघून तर जा, आहे काय, माझ्या कवितेत!

माझ्यासारखाच 'मी', तिच्यासारखीच 'ती', तुमच्यासारखेच 'तुम्ही', त्यांच्यासारखेच 'ते' इथे दिसतात
अहो, हे आणि असेच नसेल तर उरणार तरी काय? माझ्या कवितेत!

- संदीप चांदणे (२०/३/२०१६)

Thursday, March 10, 2016

येशील येशील येशील दोस्ता

येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील या सुरेल मराठी गीताचे हे विडंबन आहे!
मूळ कवी, संगीतकार,गायक-गायिका ज्यांनी या गाण्याला चिरतरूण सौंदर्य बहाल केलेलं आहे त्या सर्वांची माफी मागून हे विडंबन रसिकांपुढे ठेवीत आहे!
(मूळ गीताचे शब्द, जालावर सापडलेले वेगळे आणि गाण्यात वेगळेच असे दिसल्याने गाण्याची ही युट्यूबची लिंक देत आहे. मूळ गाणे आधी ऐकून आल्यास विडंबनाची खुमारी आधिकच वाढेल असे सुचवतो. किंवा कदाचित विडंबनाचा पचकाही होऊ शकतो. पण तो धोका पत्करण्यास मी तयार आहे, कारण, शेवटी वर्जिनल ते वर्जिनलच!)


येशील येशील येशील दोस्ता
पहाटे पहाटे येशील
माझिया पिण्याचे झालेले ते बिल
लगेच येऊन देशील!

होऊनी मी धीट, घेतली 'निट'
आणि हसे झाले भाऊ
तुझ्या खांद्यावर जरा टेकता
नको ना रागाने पाहू
(घरी)चल वजन पेलत-रस्त्याने झुलत
जरी तू विटून जाशील!

धुंद व्हिस्कीचा आणि स्कॉचचा
लाभला सुगंधी पेला
झाला तू कावरा, कारे बावरा?
धरलास वर तो अबोला?
उठण्यात-'बसण्यात', खाण्यात-'पिण्यात'
सदैव कंपनी देशील!

म्यानेजराचे तांडव, तूही जरा सांडव
तुझ्या खिशातल्या नोटे
तूच रे उदार, तुझाच आधार
तुझ्यात 'भरत' भेटे
सुरेच्या पुरात, नशील्या सुरात
तू माझा 'किशोर'(कुमार) होशील!

- संदीप चांदणे (१०/३/२०१६)



रोशनदान

कभी हुआ करता था जो एक शानदार मेहराबदार रोशनदान आज उसकी शान-ओ-शौकत एक पान की दुकान नोचती हैं उस ठेलेपर तो जमघट लगताही होगा बेकदरदान जमाने का ...