Saturday, June 3, 2017

खड्डा

उकरून-टोकरून काढली बघ कुणी
पुन्हा प्रेमाची पुरलेली आठवण
जी नीट पुरलीच गेली नव्हती
अर्धवट बुजवलेल्या खड्ड्यातून
सतत उघडी पडत होती
तो काळजातला खड्डा
ओलांडून जाताना
हे नेहमीच लक्षात यायचं
पुन्हा वाटायचं...
घाई काय आहे?
आयुष्य पडलंय की सारं
तुला विसरायला!
खड्डा भरायला...
नाही तरी असं काय लागतंय?
एक लग्न, दोन मुलं
जिवलग मित्र, नातलग
सण-समारंभ वगैरे, किंवा,
किंवा, काही वर्षे!
तरी खड्डा भरला जात नाहीये
ही वस्तुस्थिती आहे
मूठभर माती घातली की,
हातभर उकरणारेच जास्त
मीही बोलत नाही अशांना
कारण, भिती वाटते
पुन्हा हा खड्डा उकरायला
कुणीच आलं नाही तर?
आणि मग पुढे...
तुला विसरणं शक्य झालं तर?
छे! कल्पनाही करवत नाही ग!
आयुष्यातले छक्के-पंजे कळाले नाहीत
ना कळतीलही कधी
प्रेम कशाशी खातात
हेही नव्हतं ठाऊक, प्रेम करताना...
एवढं मात्र पक्क ठाऊक आहे,
तुला विसरेन तेव्हा या जगात नसेन!
तो खड्डा मात्र तिथेच खड्डा होऊन
पडलेला असेन...असू दे...
तेवढंच तुलाही काम... बुजवण्याचं!

- संदीप चांदणे (३/६/२०१७)

No comments:

Post a Comment

बाकावरचे सरकणे

नको नको रे साजणा असा दूर दूर जाऊ तुझ्या बावऱ्या डोळ्यांनी नको बावरून पाहू कुठवर जाशील रे  दूरवर सरकून? घसरून पडशील बाक जाईल संपून  नको असता ...