Thursday, September 7, 2023

कोणी कुणाला किती आवडावे

कोणी कुणाला किती आवडावे
काही तुला अन् मलाही न ठावे

करून बहाणे, दोघे धडपडतो
कशाही निमित्ताने बोलू बघतो
दिवसा मोरपिशी मौजा लुटाव्या
रात्रीने पुन्हा विरह घेऊन यावे

घराच्या बाहेर दारापुढे जराशी
तुझ्या उतावीळ येरझारा मघाशी
पाहून, हलके हाक देशील, वाटे
पुन्हा तू नेहमीचे संकोचून जावे

मग कधी तू व्यस्त होऊन जाते
इथे अवघे माझे अवसान गळते
व्याकूळ नजरेस आस दिसण्याची
तू दिसताक्षणी मी मोहरून उठावे

सखे सोबती अन् कुणी साद देते
त्यात चित्त कसले जराही न जाते
व्याप काही, काही उद्योग पाठी
सारे सोडून तुझ्या समीप असावे

ती लाजरी हवीशी तिरपी नजर
आणि तुझ्या उरीचे स्पंदनस्वर
तुझ्याच ओंजळीत भरण्यासाठी
मी, सांग कसे, कुठे साठवावे?

उभय डोळ्यांत मौनाची गाणी
न स्पर्शता हाता गुंफू पहाती
पुरे अनामिक थरथरते दडपण
मिठीतून पुढले हितगूज व्हावे

- संदीप भानुदास चांदणे (गुरूवार, ७/९/२०२३)

रोशनदान

कभी हुआ करता था जो एक शानदार मेहराबदार रोशनदान आज उसकी शान-ओ-शौकत एक पान की दुकान नोचती हैं उस ठेलेपर तो जमघट लगताही होगा बेकदरदान जमाने का ...