Wednesday, October 21, 2015

अकबर बिरबल (मोत्यांची शेती)

अकबर बिरबल (मोत्यांची शेती)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

[दृश्य: अकबराच्या लाडक्या बेगमच्या महालातील सुंदर शयनकक्ष. अकबर पलंगावर असलेल्या लोड आणि तक्क्यांवर रेलून पाय लांब करून निवांतपणे बेगमबरोबर जी समोरच पलंगावर दोन्ही पाय एका बाजूला दुमडून बसली आहे, बुद्धीबळ खेळत आहे. पलंगाच्या बाजूला एका मेजावर फळफळावांचे सजलेले ताट आहे व त्याच्या बाजूला अकबराच्या पायाजवळ एका आरामखुर्चीत बिरबलही त्यांचा खेळ पाहत निवांत बसला आहे.]

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्थळ: बेगमचा शयनकक्ष.
काळ: निवांतपणे घालवण्याचा.
वेळ: लवकरच कुणावर तरी येईल अस वाटणारी!

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पात्रे:
१) अकबर
२) बेगम
३) बिरबल
४) शिपाई नंबर १
५) शिपाई नंबर २
६) प्रधान

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(अकबर आणि बेगम यांच्यात बुद्धीबळाचा डाव सुरू आहे. पण अकबर आणि बेगम दोघंही खेळाला कंटाळल्यासारखी दिसत आहे. आणि बिरबल आपलं विनाकारण दोघांनाही प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे)

बेगम: मी काय म्हण्ते, बास करायचा का आपण खेल. मांजा हात, खेलून खेलून दुकाया लागलाय.
अकबर: हां... आवरे, असा बी मांज्याकरं येक घोरा, येक हती आन दोनच प्यादे आन तुज्याकर तर नुसतेच तीन प्यादे राह्यलेत.
बेगम: हां, राजा आन वजीर मेल्यावर काय मजा नाय ह्या खेलात! काय बोलतो बोल बिरबल?
बिरबल: आवरराक्का (अकबर आणि बेगम दोघेही दचकल्याचे बघून बिरबल लगेच सावरतो) स्वारी... बेगमसर्कार तुम्हाना बोर झालाय का? मंग आस करा, तुमी नी बादशा एका बाजूसनी खेला आन मी एकटा दुस-या बाजूसनी खेलतो, बोला चालतय का?
अकबर: (नकारार्थी मान हालवीत) नक्को! तू जल्ला केवरा हुशार हायेस! दोन मिंटात आम्हाना हरवशील.
बिरबल: बादशानु, तुम्ही म्हण्ताव त जरा वेलाने हरवतो. आवर काय तेच्यात?
बेगम: ठीके...पण तू डाव-या हातान खेलाच काय चाब-या! आम्ही दोघ उजव्या हातानीच खेलणार!
बिरबल: मना चालेल! (तेवढ्यात बेगमला वारा सरतो).
अकबर: ( अकबर एकदम कावराबावरा होतो व सगळा डाव उधळून लावत बेगमकडे रागाने पाहत म्हणतो) जल्ला, आवरे तुना आवरी छोटी गोष्ट आवरता येत नाय. चारचौघात सारखी विज्जत घालवते माजी.
बिरबल: (प्रसंग ओळखून घाईघाईने बोलतो) बादशानु व्हतय आस कंदीमंदी लय भेलपुरी, पाणीपुरी, सकाल दुपारी खाल्ल्याव!
अकबर: (उठून उभा राहत) बिरबल, तुना माहीत नाय. हिचा बापूस येक नंबरचा पादरा हाये. जल्ला दिवसभर किराण्याच्या दुकानात एका बाजूस तराजूत वजंनं टाकतयं आन दुसरे बाजूस भोंगा वाजवतय. सारा गाव त त्याला 'पादरा पावशा' म्हणतय बोल! (बिरबल आणि बेगम चिडीचूप खाली मान घालून उभे राहतात) त्ये काय नाय बिरबल. हिला आता कायमची माहेरालाच धारून देतो. (टाळी वाजवत) जल्ला, कोण हाये काय तिकरं. लवकर ये हिकरं!
शिपाई नं १: बादशहानु मी हाये. बनकर... सुरेश बनकर!
अकबर: सुरेश, तू नया हय काय? बादशहाचा इजय कोण म्हणणार र खोकरा?
शिपाई नंबर १: बादशाचा इजय दिनानाथ चव्हाण असो.
अकबर: (खूश होऊन) ह्यो नवा हाये का? मंग ठिके. एक काम करं (बेगमकडे बोट दाखवत) ह्या आवरीला घेऊन फाट्याव जा. आन टमटममधी बसवून ये. बिना हार्नाच्या. ही वाजवतीय सगरीकरं! (एवढ बोलून तो तडक कक्षातून बाहेर निघून जातो)
शिपाई नंबर १: बेगमसाईबा, पिशवी घेऊन बाहेर या मी तवंर त रिक्षा आणतो. ('फाट्याव जायला उशीर झायला, बगतोय रिक्षावाला न वाट हिची बगतोय रिक्षावाला' अस काहीस गाण बेगमकडे पाहत आचरटपणे म्हणत म्हणत बाहेर जातो!)
बेगम: (शिपाई नंबर १ बाहेर गेल्यावर एकदम धाडकन पलंगावर कोसळते आणि फुंदुन रडू लागते) बिरबल, सांग, काय चुकल मांज? माणसाला चुकून एखादे वेली सरतो वारा. म्हणून काय आसा घालून-पारून बोलायचा.
बिरबल: आवराक्का (परत जीभ चावतो बेगमला दचकलेलं पाहून) स्वारी...बेगमसर्कार, कंदीमंदी सणावाराला... आपल ते, आसच एखादे वेली चालल अस्त वो. पण, मांज्या समोरच चौतीस येला झालय आन तो आपला परधान, 'कदमाचा नान्या' मना सांगत व्ह्ता, तुमच्या महालाक सारका सारका येऊन त्याचा अगरबत्तीचा खर्च लय व्हारलाय म्हणूनं.
बेगम: मंग... तूच सांग बिरबल मी काय करू. मना तर रोज हात दुकूस्तोवर बुद्धीबल खेलाय पायजे. मंग माहेर्ला गेल्याव कुणासंग खेलू?
बिरबल: (थोडा विचार करून) आवरे...(आता बेगमने चप्पल काढलेली बघून तोंडासमोर हात धरून मार चुकवण्याच्या पोजमध्ये उभा राहून पटपट बोलतो) बेगमसर्कार… मी कायतरी युक्ती लरवतो. तुम्ही एकदम निवांत जावा माहेर्ला. बादशाच तुम्हांना घेया येतीन. (एवढ बोलून मार चुकवत तिथून पळून जातो आणि पडदा पडतो)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(दृश्य दुसरे: पडदा उघडतो तेव्हा अकबर ऑफ मूडमध्ये दरबारात बसलेला आहे. समोर प्रधान आणि दरबारातली इतर मंडळी बसली आहेत)

बिरबल: (अकबराला मुजरा करत दरबारात प्रवेश करतो) बादशहाचा ईजय कदम असो! बादशानु मना जरा पर्सनल काम आसल्याने जर्रा आज हाप डे पायजेल व्हता.
अकबर: (वैतागून) बिरबल, जल्ला तुजा काय चालून राहिलाय आजकाल मना करना झालायं? मांगच्या एक महिन्यात तू २९ दिस हाप डे घीतलाय!
बिरबल: बादशानु, मी जरा शेतीकामात बिजी हाये.
अकबर: (विस्मयाने) शेतीकाम! बिरबल पगार तुना पुरत नाय काय? जल्ला शेतीकामाची तुना गरज काय हाय?
बिरबल: बादशानु, साधीसुधी शेती नाय करत आपण. मोत्यांची शेती करतय मी आता.
अकबर: मोती तर समिंदरात मिलतात ना रे पण? जल्ला मना काय येरा समजला का काय?
बिरबल: ही येगरी शेती हाये बादशानु... माझ्या म्हाता-याच्या म्हाता-यानी मना शिकवलीय. जर्रा  जादूबिदू करावं लागते ह्येच्यात! तुम्हांना खोट वाटत आसल त परतेक्ष येवूनच बगा!
अकबर: (विचार करत) ठीके बिरबल. मना पण बगायचीच हाये मोत्यांची शेती. तवा मांजा पण आज हाप डे!
बिरबल: (घाईघाईने) बादशानु आज नका यिवू! आज तुम्हांना कायबी नाय दिसायाचा! उद्या सकाळी सारेसहाला टच व्हा मांज्या शेतात. मंगच दिसतेन तुम्हांना मोती लागल्याले.
(मुजरा करतो आणि जातो. इथेच पडदा पडतो.)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(दृश्य तिसरे: पडदा उघडतो तेव्हा अकबर आणि त्याच्याबरोबर प्रधान, शिपाई नंबर १ आणि २ आणि बिरबल असा लवाजमा आहे. सगळेजण बिरबलाच्या शेताकडे चालत येत आहेत. जसजसे जवळ येत आहेत तसतसे अकबरचे डोळे आश्चर्याने उजळून निघत आहेत! खर म्हणजे बिरबलाने त्याच्या शेतात फक्त अळूच अळू लावला आहे आणि त्यांवर पडलेल्या दवाच्या थेंबाने सकाळच्या कोवळ्या किरणाबरोबर मिळून अशी काही जादू केली आहे की दुरून अळवांच्या प्रत्येक पानावर बरेचसे टपोरे मोती लगडल्यासारखे दिसत आहेत.)


अकबर: (शेताकडे पाहत) बा…बा…बा बिरबल! काय र ह्ये? आवरे मोती! आता तू पण पुण्यात मोत्यांच् दुसर दुकान टाकणार का काय? मना आत्ता लगेच दोन-चार मोठाले मोती पायजेल, घेऊ का बोल?
बिरबल: बादशानु काय इचारताव गरिबाला? मांज जे हाये ते सगर तुमचंच हाये!
अकबर: (प्रचंड खूष होऊन मोत्यांकडे सरसावतो. पण जसा अळवाच्या पानाला त्याचा स्पर्श होतो, ते मोती भासणारे दव ओघळून खाली पडतात) अरे...रे..रे..रे बिरबल, आस का होतंय र? ह्यांच तर जल्ला पानीच व्हाया लागलंय!
बिरबल: म्हंजे बादशानु (आश्चर्याने तोंडाचा 'आ' वासून अकबराकडे पाहतो) तुम्ही पन??
अकबर: जल्ला, काय तू  पन?? आस कोरयात बोलू नको. सरल बोल काय ता!
बिरबल: बादशानु मांजा आज्जा मना बोल्ला होता, (आता चाचरत) ज्यो कधीच आयुक्शात पादला नसंल त्यालाच हे मोती मिलतेन!
अकबर: (चेह-यावर खिन्नता आणीत) आलाय बिरबल, मांज्या ध्यानात आलाय तुना काय म्हणायच ता! मांज चुकलंच! मी आवरीला लय बोल्लो, आता काय करू बिरबल? आवरी मना माफ करन का र? कोन्च्या तोंडानं तिच्याक जाऊ र?
बिरबल: (टाळी वाजवतो तशी दुस-या शेताच्या कडेला असलेल्या झाडामागून बेगम समोर येते) बादशानु, मी पयलेच आवरीला (जीभ चावत!) आपलं ते बेगमसर्कारांना थांबवून ठिवलं व्हत. मना माहिती व्हता तुम्ही रागात कायबाय बोलून टाकताव पण जरा इचार कराया लावल्यावन बराबर करताव काय ता!
अकबर: (बेगमच्या जवळ जाउन लाडाने तिला जवळ घेतो) आवरे! मना माफ कर! आता मी तुना कायबी बोलणार नाय. तू कितीबी भेलपुरी, पाणीपुरी, सकाल दुपारी खाल्ली तरीबी!
(अकबर आणि बेगम एकमेकांच्या डोळ्यात पाहून हसतात आणि पडदा पडतो!)


(छायाचित्र, 'मेघनाद' यांच्या मिसळपाव.कॉम वरील "सफर आडवळणावरील खेड्यांची ….!" या लेखातून साभार!)

माझी शाळा : मोठेपणीचा निबंध!

काय भुर्र्कन गेले ते दिवस! शाळेचे! कळालसुद्धा नाही!

कॉलेजात जायच्या आणि पुढे काहीतरी बनायच्या ध्येयापुढे आपल्या बालपणाच्या सोनेरी पानाला आपण अगदी सहज, उडत्या पांढ-या म्हातारीला तिच्या बीमधून काढून एकेक करून वा-यावर भिरकवून द्याव तस भूतकाळाच्या अंगणात नेमाने रतीब घालत टाकून आलो. आता ते बालपणाच सोनेरी पान दुरून फक्त पाहता येत. परत मिळवता येत नाही, इतकच कशाला, त्याला स्पर्शही करता येत नाही! मुकलो त्याला कायमचच!

आज मेंदूला ताण देत वर्गातल्यांची नावे आठवावी लागतात. कोण कुठे बसायच, कोण कस शिकवायच हे इतरांकडून विचारून खात्री करून घ्यावी लागते!

एक मात्र नक्की, भूतकाळात रमताना शाळेच्या आठवणींसारख दुसर काहीच नसत. क्वचित बदललेली शाळा, बदललेले वर्ग, बदललेले बेंच, बदललेले शिक्षक, नवे जुने मित्र! काही जुनेच काही मागून आलेले. काही मध्येच शाळा सोडून गेलेले! शाळेची नवी-जुनी इमारत, शाळेच मैदान, तिथला झेंड्याचा कट्टा! असा फार मोठा आणि वैविध्यपूर्ण पसारा चुंबकाला चिकटलेल्या विविध लोखंडांच्या वस्तूंप्रमाणे झालेला असतो. एकेक क्षण त्या चुंबकापासून खेचून घेऊन नीट न्याहाळीत बसावे वाटते. यासारखा विरंगुळाही नसावा!

शाळेतली पूजा, शाळेचं स्नेहसम्मेलन, शाळेत करून मागितलेले तक्ते! शाळेत वर्ग सजवताना पताक्यांसोबत घातलेला धिंगाणा! सर्वांच्यासोबत खाल्लेला मार! शाळेची सहल! टिंगल टवाळी, अखंड बडबड, मॉनिटरने वहीत नावं लिहूण घेणे मग ती सरांपर्यंत पोचू नये म्हणून धडपडलेलो आपण! कधीतरी वर्गातल्या एखाद्या मुलीने मारलेली हाक सुखद धक्का देऊन गेलेली! अरे, हिला आपलं नाव माहितीये! तीच गोड शिरशिरी आताही नकळत अंगातून उठतेच!

जीवावर आलेल्या त्या घटक चाचण्या, सहामाह्या आणि त्याहून मनाला टोचणारे ते वर्गात पेपर देऊन सरांचे मार्क सांगण्याचे प्रसंग. कधी शाळेत आलेले जादूचे प्रयोग, कागदाची ओरिगामी शिकवणारे कलाकार. त्याची पुस्तके घेऊन शिकण्याचा प्रयत्न करताना फसल्याची जाणीव होणारे आपण. नळावर पाणी प्यायला जणू गोठ्यातून सोडून दिलेली तहानलेली वासर गायांची कास लुचायला धावतात तसे धावणारे आपण. काय सुंदर दिसत हे आता आठवणींतून! धावत्या चित्रांचा पटच जणू कुणी समोर धरून दाखवित आहे!

अजून एक विशेष सांगायच म्हणजे नोकरी धंद्यात जवळपास  प्रत्येक  आजूबाजूवाल्यांशी स्पर्धा करणारे आपण, वर्गमित्रांसोबत अगदी बरोबरीचे होऊन जातो. त्यांच्यात कधीच कोणी मोठा आणि लहान नसतो. हे मित्र कधी भेटले की सख्खे नातलग भेटल्याचा आनंद होतो. कधी एकमेकांची प्रशंसा करताना शब्द कमी पडू लागतात त्याचवेळी एकमेकांची गमतीने उणीदुणी काढताना कसली भीडही ठेवली जात नाही. हे फक्त शाळेतल्या मित्रांसोबत सहजशक्य असतं!

प्रचंड प्रमाणात (पक्षी: पाण्यासारखे!) सोमवार ते शनिवार, आयुष्यातले, शाळेतल्या मित्रांसोबत खर्च केलेले असतात. कधी काही खास रविवारसुद्धा! तेव्हा कळतच नसतं हे क्षण किती खास आहेत आणि आठवणी होऊन पुढे आयुष्यभर आनंद देणार आहेत. तेव्हा घड्याळाच्या अन कॅलेडराच्या मदतीने नियती भराभर आपले वय वाढवित असते. आणि आपण जणू प्रवाहाच्या मधल्या धारेत जखडून जाऊन एका ठराविक गतीत वाहत असतो.

काय एकेक आठवणी
काढाव्या तेवढ्या कमीच!
खोल पहात बसण आणि
खुदकन हसणही उगीच!

रोज त्याच चालीवर शिकवणारे
दोन-चार शिक्षक आठवतात
वर्गातल्यांची नावे आठवताना
एकेक चेहरे डोळ्यांपुढून सरकतात!

पहिल्या दिवसाची प्रार्थनेची रांग अन्
दिवस पहिला बेंचवरचा आठवतो
वर्गशिक्षकांची हजेरी आणि मागचा
फळ्यावरचा सुविचार आताही वाचता येतो!

मोठेपणीच्या या लंचटाईमला
मधल्या सुट्टीतली भूक लागत नाही
डबे काढून बसा एकत्र सगळे
अस सांगणारी घंटा आता वाजत नाही!

तेव्हाचे गृहपाठाला कुरकुरणारे हात
आता लिहिण्यासाठी आसुसतात
वाटत, धावत जाऊन शाळेला विचाराव
सोमवारी येऊ का शाळेच्या गणवेशात?

- संदीप चांदणे (२१/१०/१५)

Tuesday, October 20, 2015

उगीचच काहीबाही!

उगवत्या सोनेरी प्रभेला
मोहक नाजूक कळ्या
फुग-या फसव्या गालांना
हस-या खाचेच्या खळ्या
देता आल्या तर….
….आणखी काय पाहिजे?

-संदीप चांदणे (१७/९/१५)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*

बस एक तुम ही तुम छाये हो तसव्वुरपे..
जरा हटिए कि, और भी खडे है राहोपे!

-संदीप चांदणे (११/१०/१५)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*

वाह! कुछ तो बात है तुममे, की मै हैरान रह जाता हू,
समझमे ना आनेकी अदा बहोत खूब पायी है तुमने!

-संदीप चांदणे (१४/१०/१५)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*

नुमाइशे देख देख बाजारो मे
मैने फिर तुम्हीसे हसी उधार ली

-संदीप चांदणे (२०/१०/१५)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*

कैसे कर लेते हो दोस्त, ये फूलो का बहाना?
उसी एक दिल के जख्म को हरा भरा रखके

-संदीप चांदणे (२५/१०/१५)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*

माझ्या गावाचा मनुष्य
जेव्हा भेटे दूर देशी
दाटे जिव्हाळा मनीचा
पापण्यांच्या कडांपाशी!

-संदीप चांदणे (3०/१०/१५)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*

यूं कोई खयाल जिंदगीका फलसफा ना होता,
अगर तुम ना होते तो ये खयालभी ना होता!

-संदीप चांदणे (०२/१०/१५)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*

धुआ धुआसा बन गया हू मै जमानेमे अब
तुमसा कोई मिले तो महसूस हो लेता हू!

-संदीप चांदणे (०२/१०/१५)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*

माझ्या माहेरचा रस्ता
वाट काढी आमराईतून
जाई घेऊन मला
माझ्या घरी, सासूराहून!

-संदीप चांदणे (०७/०४/१६)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*

कारवां चलता है, चलता जायेगा
वक्त की रेत पे किसके निशां रहे है!

-संदीप चांदणे (०९/०५/१६)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*

वो ख्वाईशेही ही क्या जिन्हे पूरा कर सुकून मिले
जिन्हे जख्मो पे नाज है वो तो शौक से जीते है!

- संदीप चांदणे (१८/११/२०१६)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*

आलम-ए-बेखबरी यूं हो जाये
तेरी नेकी से दर्या भर जाये!

- संदीप चांदणे (२८/१२/२०१६)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*

वो कहते है, "हम गिनने बैठे तो ये दिन कम पडेंगे!"
हम ये सोचते रहे, 'भला दोस्त भी कोई गिनता है!'

- संदीप चांदणे (२/२/२०१७)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*

कुछ इस तरह गजब तहजीब के मायने हो गये है
गाली देने के सलीके अब सुहाने हो गये है


- संदीप चांदणे (१८/०७/२०१८)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*

सळसळलो फांद्यावरती, मी पर्ण होऊनी जगलो

मग धरून फेर वाऱ्याशी, मी अलगद शिशिर झालो

- संदीप चांदणे (५/२/२०१९)

*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*


देर रात गली में कोई खांसता तो सुकून बना रहता, के कोई जग रहा है

आज वही खांसी अपने अंदर डर सा जगाकर रातो की नींद उडा लेती है


- संदीप चांदणे (१९/०७/२०२०)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*

ये वक्त वजा-बेवजां क्या क्या नही सिखाता?
न जाने कितने पन्नो की किताब बन बैठा है

- संदीप चांदणे (१९/०७/२०२०)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*

तुम कहते हो तो किसी हमदम को पुकार लेते हैं, मगर
अब हमे अपनी आवाज की गूंज सुनना इतना नही भांता
- संदीप चांदणे (२०/०७/२०२१)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*
चौसष्ट घरात घालून धुमाकूळ, फक्त डाव होतात रिते
बत्तीस बत्तीस वाटून घ्या, तिथे वेस दोन गावांची वसते 
- संदीप चांदणे (२८/१०/२०२१)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*
आयुष्य उतरणीला लागल्यावर
शरीर साथ देईनासे झाल्यावर
कदाचित अश्रूंतून झरेल गाणे
तुला तशीच पुन्हा आठवल्यावर
- संदीप चांदणे (रविवार २१/११/२०२१)
*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*`*

(अपडेट होत राहील ही पोस्ट!)
- संदीप चांदणे

वाटेत भेटलेला शेर!

वाटेत भेटलेला शेर!


ही शेरांबद्दलची (शायरीतला!) माझी एक आठवण आहे!

सहा-सात वर्षांपूर्वी एकदा माणगावातून हिंजवडीकडे जायला निघालो होतो. रस्त्यात गाडी पंक्चर झाली. ढकलत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. निघालो!
रस्त्यात एक गॅरेज लागले. अगदी मल्टिपर्पज/मल्टिसर्व्हिसेस टाईप होते. गाडी गॅरेजवाल्याच्या हवाली करून बाजूला एका स्टुलावर बसलो. तिथेच दोन पेंटर ट्रकवरती जागोजागी ऑईल पेंटने चित्र काढत होते. एकजण ट्रकच्या पाठीमागे शेर लिहित होता. उत्सुकता म्हणून एकेक शब्द पेंट होताच मोठ्याने वाचत होतो. पेंटरजवळ ट्रक डायव्हर उभा राहून नीट लक्ष देऊन काढून घेत होता. तो शेर असा होता,

"परिंदे भी नही रहते पराये आसमानो में,
हमारी उम्र गुजर गई किराये के मकानो मे!"

शेराला मी छान म्हटल्याबरोबर त्या ट्रक डायव्हरबरोबर छान गट्टी जमली. मग त्याने ट्रकच्या केबिनमधून त्याची एक जुनीपुरानी वही आणली, ज्यात त्याने त्याच्या आवडीचे शेर लिहिले होते. खरच रसिक वाटला मला तो.
त्या वहीतून दोन - चार शेर त्याने मला वाचून दाखवले. सगळेच चांगले होते, पण माझ्या लक्षात राहिला तो हा...

"ऐ अब्रे मोहब्बत जरा जमके बरस,
मैं रेत का सहरा हू, मेरी प्यास बहुत है!"

मला हा शेर आवडला त्याच्या अर्थामुळे! प्रेमाला एका वेगळ्या भव्य अशा उंचीवर त्यातल्या भावामुळे हा शेर नेऊन ठेवतो. म्हणजे बघा, रेत का सहरा(ही ती भव्यता!) असणारा प्रियकर प्रेमासाठी असा कासावीस आहे की प्रेयसीला जी आता अब्र-ए-मोहब्बत (हीसुद्धा भव्यताच!) होऊन बरसणार आहे तिच्या लक्षात आणून देतो की नुसतं रिमझिम बरसून ओल पसरवून काम नाही चालणार तर तुला कोसळाव लागेल अफाट आणि सार चिंब करून टाकावं लागणार!
हा परिणाम साधण्यासाठी त्यात काव्यात्मकताही तेवढ्याच समप्रमाणात ठासून भरली आहे. म्हणजे कधी काही शेर असेच सरळ चालत आल्यासारखे येतात अन् काही असे हळुवार तरंगत-लहरत येतात!
दुर्दैवाने हा शेर कुणी लिहिला आहे ते मला माहित नाही पण असा बढीया, तबीयतदार शेर लिहून ठेवल्याने त्या अनाम शायरास माझा सलाम आहे! ____/\____

- संदीप चांदणे!

Tuesday, September 29, 2015

मटणाचं कालवण! (शतशब्द्कथा)

मटणाचं कालवण! (शतशब्द्कथा)

फाट्यावरच्या ट्रकमधून गर्दी सांडून ओघळ फुटल्यासारखी गाव आणि वस्त्यांकड निघालेली.
कलंडलेल्या उन्हातनं तिघी वस्तीकडं निघाल्या. गर्दीत मिसळू न देण्यासाठी सासूने त्या दोघींचे हात धरलेले!

भयानक दुष्काळ पडलेला! दुष्काळी कामावरूनच तिघी परतत होत्या. स्वयंपाकासाठी काय करायचं हा नेहमीचा प्रश्नही सोबत चालत होता. पण कुणीच काही बोलत नव्हत. मुक्याच जणू!

नेहमीच्या वळणावर तिघी थांबल्या. थोरली सून रस्ता उतरली, ढासळलेल्या पवळंवरून पलिकडं गेली. कंबरेच्या विळ्याने 'विचका' स्वयंपाकासाठी काढू लागली. अचानक पलिकडे एक बैल मरून पडलेला दिसला तसं दचकून तिनं मागं पाहिलं!

"कवर इचका खायचा?" सासूच्या शब्दांनी तिचा थरकाप उडाला!

तिला मख्ख बघून धाकलीच्या पाठीत गुद्दा बसला आणि दुसरा विळा मटणाच्या कालवणाकडे धडपडत निघाला!


(सत्यघटनेवर आधारित!)


- संदीप चांदणे

Saturday, September 26, 2015

घर माझे

घराला माझ्या
सुरेख अंगण
सुखाने नित्य
होई शिंपण

आहे जागता 
खंबीर उंबरा
मर्यादा लांघण्या
ना देई थारा

घराची माझ्या
ओसरी खुणावे
थकल्या पायांना
देई ती विसावे

करते स्वागत
येताना हसून
निरोपाही सज्ज
दाराचे तोरण

ओटा न्यारा
सांजेस बहरतो
गप्पांत साऱ्यांच्या
हळूच निजतो

माजघर खोल
मनाच्या सारखे
हक्काची जागा
सुख-दु:खा देते

देवघर पवित्र
शांती आणते
देवाला हात
धरून बसविते

घर माझे
सुरेख देखणे
काळोख्या रातीचे
नक्षत्रलेणे

- संदीप चांदणे (१७/९/२०१५)

Wednesday, September 23, 2015

कुछ अनमोल लोगोसे रिश्ता रखता हू

हरिवंशराय बच्चन यांच्या "कुछ अनमोल लोगोसे रिश्ता रखता हू" या कवितेचा मी मराठीत केलेला भावानुवाद.

मूळ कविता:

बैठ जाता हूं मिट्टी पे अक्सर क्योंकि मुझे अपनी औकात अच्छी लगती है..
मैंने समंदर से सीखा है जीने का सलीक़ा, चुपचाप से बहना और अपनी मौज में रहना ।।
ऐसा नहीं है कि मुझमें कोई ऐब नहीं है पर सच कहता हूँ मुझमे कोई फरेब नहीं है
जल जाते हैं मेरे अंदाज़ से मेरे दुश्मन क्यूंकि एक मुद्दत से मैंने न मोहब्बत बदली और न दोस्त बदले .!!.
एक घड़ी ख़रीदकर हाथ मे क्या बाँध ली.. वक़्त पीछे ही पड़ गया मेरे..!!
सोचा था घर बना कर बैठुंगा सुकून से. . पर घर की ज़रूरतों ने मुसाफ़िर बना डाला !!!
सुकून की बात मत कर ऐ ग़ालिब….बचपन वाला ‘इतवार’ अब नहीं आता |
शौक तो माँ-बाप के पैसो से पूरे होते हैं, अपने पैसो से तो बस ज़रूरतें ही पूरी हो पाती हैं..
जीवन की भाग-दौड़ में – क्यूँ वक़्त के साथ रंगत खो जाती है? हँसती-खेलती ज़िन्दगी भी आम हो जाती है..
एक सवेरा था जब हँस कर उठते थे हम, और आज कई बार बिना मुस्कुराये ही शाम हो जाती है..
कितने दूर निकल गए, रिश्तो को निभाते निभाते.. खुद को खो दिया हमने, अपनों को पाते पाते..
लोग कहते है हम मुस्कुराते बहोत है, और हम थक गए दर्द छुपाते छुपाते..
“खुश हूँ और सबको खुश रखता हूँ, लापरवाह हूँ फिर भी सबकी परवाह करता हूँ..
मालूम हे कोई मोल नहीं मेरा, फिर भी, कुछ अनमोल लोगो से रिश्ता रखता हूँ…

भावानुवाद:

असाच बसतो मातीत नेहमीच कारण,
भावत मला अस या मातीत मिसळणं!


ढब ही अशी समुद्राची, भिनवलीय अंगात,
उंच उसळून कधी किना-याशी लोळत पडणं!


माझ्यातही अवगुण दडून बसलेत काही,
पण खर सांगतो जमलच नाही, कुणा फसवणं!


दिसतात त्यांची आता जळकी स्मितं कारण,
ना दूर लोटल प्रेमाला ना थांबवल मी मित्र जमवणं!


हातात घड्याळ बांधताना दिसलच नाही,
ते वेळेच मला, अस कायमच चिकटणं!


वाटलं होत बांधीन पावसाळ्याआधी घर
पण नशिबी कसं हे उन्हाळ्यात वणवण फिरणं!

नको सांगू मित्रा ऐशोआरामाची नाव,
जमतय का सांग फिरून लहान होणं?


खाऊ आईवडिलच आणायचे बाजारातन,
आपणतर शिकतोय फक्त बाजार करणं!


कधी सुटला रे हात त्या निवांत आयुष्याचा?
फावल्या वेळेचही कुठ हरवलं असेल निवांतपणं!


खिदळत येणारी ती सकाळही दिसत नाही,
मावळलेल हसू नाहीच का जमणार फुलवणं?


ह्याच्या त्याच्याशी नाती जोडण्यात बहुधा,
दिसतय मला इथे, विरून जाणारं मीपणं!


लोकांना कुठून दिसतोय 'तो' सदरा अंगात माझ्या,
सुखी माणसालाच इथे अजून नाही सुरू केल शोधणं!


पण आत कुठेतरी काहीच नकोय मला,
सुरू आहे तरी, दुस-यांसाठी सोसत जगणं!


टिकवून आहे बघा तुमच्यासारख्यांची सोबत,
माहित जरी आहे मला माझ फाटकं असणं!


- संदीप चांदणे (२२/९/२०१५)

Friday, September 18, 2015

तू इथे असतीस तर...

विविधभारतीच्या 'आपकी फर्माईश' मधली
'काही' गाणी इच्छा नसताना ऐकणे;
त्यात मध्यरात्री हे कुत्र्यांचे भुंकणे;
सर्व बाजूंनी गुणगुणना-या डासांची
'अ'मानवी ठरावी अशीच कत्तल करीत बसणे;
मध्येच, बाहेरच्या रस्त्यावर, एखाद्या गाडीच्या चाकाला
खड्ड्यात डोकावून पाहताना
'ब्रेक' नावाच्या सद्गृहस्थाने हासडलेली शिवी;
अचानक लक्ष वेधून घेत
पायाकडील भिंतीवरून सरसरत, जणू
'बोल्ट'चा १०० मीं चा विक्रम मोडीत
आडोशाला गडप होणारी पाल;
विनाकारण! फक्त त्रास द्यायच्या हेतूनेच,
विचारलेलं नसतानाही,
प्रत्येक सेकंदाला ओरडून वेळ सांगणारं घड्याळ;
काय हिंमत होती या सा-यांची,
मला त्रास द्यायची.....
....तू इथे असतीस तर....!

- संदीप चांदणे

Tuesday, September 8, 2015

वाघ-या

वाघ-या

(ही पूर्णत: काल्पनिक कथा असून या कथेचा अन्यत्र कुठेही कसल्याही प्रकारचा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती)

"कुठला र तू?" दरेकर साहेबाने जेवता जेवता पाण्याचा ग्लास तोंडापाशी धरला आणि इतका वेळ दाराबाहेर हात मागे बांधून उन्हात उभा असलेल्या ठाकराच्या पोराला विचारले.

दुपार तीन-साडेतीनची वेळ होती. दरेकर साहेबांची ब-याच दिवसांनी या पांबरे-माड धरणक्षेत्राला व्हिजीट पडली होती. इकडे येताना मुख्य राज्य महामार्ग सोडल्यानंतर रस्त्याने त्यांना गाडीत एका जागी स्वस्थ बसू दिले नव्हते. त्यामुळे ते वैतागले होते त्यात या धरणावरच्या कर्मचा-यांनी दुपारच्या जेवणाच्या व्यवस्थेत उशीर केला होता. त्यांच्यासारख्या खमक्या सरकारी माणसाला असली कामातली दिरंगाई आजिबात रूचण्यासारखी नव्हती. आणि आता हे कोंबडीचे दोन घास चवीने खातोय न खातोय तोच हा ठाकराचा पोरगा कसलीशी परवानगी मागायला आला होता आणि वर म्हणजे त्या धरण कर्मचारी अतनुरेला बाहेर न जुमानता थेट त्यांच्याकडेच आला होता.

"सायेब मी किशा ठाकर. ह्या माघाल्ल्या डोंग्रापलीकहाडल्या आंबवटपाड्याचा हाये. तेवढ जरा आज रातच्याला हिथ वाघ-या टाकायच्या व्हत्या."  किशा अतिशय अजिजिने बोलला. "आर होय की, पण तुला दिसतय का काय करतोय मी?" आपल्या वैतागलेल्या आवाजात मचाक मचाक मिसळत दरेकर साहेबांनी प्रश्न केला. "व्हय जी, आतनुरे सायेब म्हन्ले, पन यीळ चाललाय. आताच वाघ-या टाकाय पायजे, नाह्यतर पुना काय दिसायच?" "बाहेर थांब, आलोच!" दरेकर साहेबांची अशी अपेक्षित आज्ञा मिळाल्यावर किशा गप बाहेरच्या मोकळ्या जागेतल्या एका खांद्याएवढ्या उंचीच्या, लहानशा पाण्याच्या टाकीजवळच्या नळापाशी येऊन दोन पायावर दातात गवताची काडी धरून बसला. शंकर आप्पा जो त्याच्या बरोबर होता तोही मागे हात बांधून शांत पावले टाकत त्याच्या मागे उभा राहिला. तिकडून लांबवरून धरणाच्या भरावावरून दादया अन परशा येताना दिसले. जरा बर वाटल त्याला.

दरेकर साहेबांनी जणू कुणाला हाकच मारताहेत अशा ढंगात ढेकर दिला आणि दोघांचा नाष्टा झाला असता एवढ्या उष्ट्या राहिलेल्या ताटात हात धुवायला त्यांनी सुरवात केली. तोंडात पाणी घेऊन चूळ भरली आणि खिडकीतून बाहेर पिचकारी मारत असताना त्यांना भरावाच्या दुस-या लांबच्या टोकाला एक गाडी धुरळा उडवित धरणाकडेच येताना दिसली. कपाळावर आठ्या जमून आल्या आणि भुवया बारीक करून ते निरखून पाहू लागले. गाडी पांढ-या रंगाची फोर्ड होती. आता ती खिडकीच्या बाजूने दिसेनाशी होत दरवाज्यातून दिसू लागली. भरावाच्या कच्च्या रस्त्यावरून सावकाश चालत ती धरणाच्या मुख्य भिंतीच्या अलिकडे पाचेक फुटांवर थांबली. तिन तरूण त्या गाडीतून उतरले. तिघेही आजूबाजूला पाहत सावकाशपणे संरक्षक कठड्याजवळ गेले आणि धरण परिसर न्याहाळू लागले. दरेकर साहेबांच्या हालचाली जरा जलद होऊ लागल्या. पहिला प्रश्न त्यांना पडला की 'असे कसे कोणीही येऊन उभा राहतंय धरणावर?!' आणि दुसरा म्हणजे, 'हे लोक आपल्यामागे नेहमीच येत असावेत काय?' असे ते दोन प्रश्न घेऊन दरेकर साहेब दरवाज्याबाहेर असलेल्या पाय-या उतरू लागले.

दरेकर खाली उतरून आले तसे किशाने तोंडातल्या काडीला 'फ्फू' करून उडवून लावले अन उठून उभा राहिला. त्याची हालचाल दिसताच दरेकरांनी हातानेच त्याला जागेवर थांबण्याची खूण केलीं व ते पुढे आलेल्या पोटाला सावरीत त्या तीन तरूणांकडे चालू लागलें. आता किशा आणि मंडळीचे डोळे दरेकरांच्या हालचालीला बांधले गेले.

सूर्य अजून तिरपा होऊन धरणात बुडून जायला तयार झाला होतां. तांबडा-पिवळा रंग ढगांच्या अंगावरून खाली सांडून आभाळभर पसरला होतां. मागे हात बांधलेल्या शंकर आप्पांच्या फे-या एव्हाना थांबल्या होत्या आणि दादया, परशा यांनी एकेक दगड बसायला शोधलां होता. किशा हताशपणे एकटक दरेकर आणि त्या तीन तरूणांकडे बघत होता.

तिघातला एक, जो अंगावर व्हाईट पोलो टी, नवी जीन्स आणि रेबॅन बाळगून होता त्याच्यात आणि दरेकर साहेबांत असे काही हसून आणि खिदळून संभाषण सुरू झाल जस एखाद्या लग्नात आलेले पाहुणे, आपण कशासाठी आलोय हे विसरून दणदणाटी गप्पा हाणत असतात. किशाचा संयम सुटायला लागला होता. त्याच्या मनात वैतागून घरी परत फिरायचेच विचार येत होते, पण बघतो तर काय, त्याच्या पायांची काही हालचाल होण्यापूर्वीच दादया तरातरा दरेकर साहेबांकडे जायला निघाला होता. त्याच्या तोंडातून काही वेडवाकड निघायच ह्या विचाराने वयस्क शंकरआप्पा देखील त्याच्या मागून निघाला.

"सायेब, लावाव का वाघ-या?" दादया, दरेकरांच्या हास्यपूर्ण संभाषणाला मध्येच तोडत विचारता झाला. तोपर्यंत शंकरआप्पाही त्याच्या मागे येऊन उभा राहिलेला. दरेकरांची एक भुवई वर गेली, "हे कोण सायेब हायेत माहित हाये का? सीआयडी इन्स्पेक्टर! काय चोरी-चकाटी केली ना, सरळ कोठडी! काय?" दरेकर तावात बोलले अन रेबॅनचीही जरा हालचाल झाली. दाद्या अन शंकरआप्पाने रेबॅनला हात जोडून नमस्कार केला. शंकरआप्पा म्हणाला, "सायेब, फक्त वाघ-या लावाच्यात, तेबी हापिसांच्या लांब, तिकाडल्या खाल्ल्या आंगाला. हिकड कोण फिराकनार बी नाय." दरेकरांना आता त्यांच्यात विशेष रस राहिला नव्हता म्हणून त्यांना झटकून लावल्यासारखे ते म्हणाले, "हं! जावा पटक्यानी, लावा जाळ्या." दादया नि शंकरआप्पाला एकदम हायसे वाटले.

दरेकरांना नमस्कार करून चटकन ते वळले आणि पावलं दोन पावलं पडली असतील तोवर दरेकरांचा परत मागून आवाज आला, "दोन ससे अतनुरेकड द्या उद्याच्याला, तो पोच करील माझ्या घरी!" शंकरआप्पाचे खोल डोळे गलबलले, कसबसं तो म्हणाला, "सायेब हिथ आधीसारक सस नायती घावत. त्यात अतनुरेसायेबांचा योक ससा दर बारचीला, त्यो पाण्याच्या टाकीपसला किशा हाये का, त्येच्या पोराच्या साळत मास्तरनी पैस भराय नाय म्हणून चार सस आणाय सांगितल्यात. त्याहिच्यात पुना भावकीत बी घावल ती शिकार वाटाय लागती." "बघितल का सर कांगावा! सांगा त्यांना, ह्या परिसरात शिकार करण बेकायदेशीर हाये का नाय? तरी मी परवानगी देतोय. त्या जंगलाच्या खात्यावाल्यांना सगळ कस ढीगानी पोच होत रे? सुक्काळीच्यांनो!" दरेकर आवाजात जरब आणीत बोलला. दोघांचेही डोळे भिरभिर करू लागले अन आवाज दूर मावळतीच्या सूर्यासारखा खोल पाण्यात बुडून गेला. "निघा!" दरेकर अस म्हटल्यावर पुढच काही ऐकायला दोघेही तिथे थांबलेच नाहीत.

शंकरआप्पा नि दादया परत आल्यावर चौघांची जुजबी बातचीत झाली आणि शिकारीच सार सामान उचलून चौघे धरणातून पाणी खाली ज्या बाजूला जात त्या झाडीत गायब झाले.

इकडे दरेकर साहेब रेबॅनला आपल्या फेमस (आजिबात नसलेल्या) सर्व्हिस रेकॉर्डबद्दल आणि इतर खात्यातल्या आपल्या ओळखीन्बद्दल आळवून आळवून सांगत होते. तसेच अधून मधून, 'हे साहेब आहेत काय अजून? ते साहेब म्हणजे तुम्हाला सांगतो….' अशा निरर्थक गप्पांच्या पुडया सोडीत बसले होते. रेबॅन आणि कंपनीला जेव्हा ह्या गप्पा अगदीच असह्य झाल्या तेव्हा त्यांनीही दरेकरांना पाणी लावत त्यांच्यातील 'गाईड' जागा करीत पूर्ण धरण, दरवाजे कसे उघडतात, कसे बंद होतात, पाण्याच्या वेगवेळ्या पातळ्या इत्यांदीची माहिती घेतली. तसेच धरणांच्या दरवाजांसमोर, भरावावर त्यांनी दरेकरांच्यातला फोटोग्राफरही जागा केला.

"त्या कान्डीला नाय र, त्या त्या तरवाडाच्या फांदीला लाव फासा." किशा दादयाला सूचना देत होता. पलीकडे काही अंतरावर शंकरआप्पा नि परशाचंही भराभर खड्डे कर, काही जाळी पसरून ठेव काही झुडूपा-झुडूपातून सहजासहजी दिसणार नाही अशा रीतीने बांध अस काम चालल होत. सुर्य बुडून बराच वेळ झाला होता. किडे-किटकांचा खेळ सुरू झाला होता. रातकिडे आणि बेडकांच्या स्पर्धाही सुरू झाल्या होत्या. अजून काही मिनिटातच सर्व काही अंधारमय होणार आहे याची कल्पना असल्याने चौघांची त्रेधा उडाली होती.

अचानक त्या वातावरणात 'खाडर्र-ढर्डर्र' असा मोठा आवाज झाला आणि पाठीमागून गाडीच्या इंजिनाचा कर्णकर्कश्श आवाज झाला आणि बंद पडला.

कशाचा आवाज झाला हे पाहायला चौघेही त्या दिशेला धावले. धरणाच्या भरावावरून एक कच्चा रस्ता धरणाचे पाणी जिकडे जाते त्या प्रवाहाला समांतर असा नागमोडी वळणे घेत, झाडा-झुडपांना सोबतीला घेत खाली उतरत पुन्हा समोरच्या एका टेकडीच्या बाजूने हळूहळू वर जात होता. त्या कच्च्या रस्त्यावर किशाने वाघरी लावली होती. त्या जाळीने त्या तीन तरूणांची गाडी अडविली होती. गाडी थांबल्याने हेडलाईटच्या दिव्यासमोर झालेली किड्यांची गर्दी लांबूनही दिसत होती.

चौघे पळतच गाडीजवळ पोचले. गाडीची ड्रायव्हरच्या दरवाजाची काच खाली आली. रेबॅनवाला सीआयडी इन्स्पेक्टर गाडी चालवत होता. रेबॅन आता डोळ्यांवरन निघून गळ्याजवळ टीशर्ट मध्ये विसावला होता. चौघांकडे पाहत तो म्हणाला,"काय रे! जाळ लावून गाड्या पकडता की काय?" शंकरआप्पाने हात जोडले. किशाला त्यानेच हळू कानात सांगितले साहेब कोण आहेत ते. किशाचा हात आपसूक कपाळावर गेला सलाम करण्यासाठी! परशा आणी दादयाने तोवर गाडीच्या बोनेट आणि चाकात अडकलेल जाळ फाडून-तोडून काढल होत. ती एकच त्यांची सगळ्यात मोठी आणि मजबूत वाघरी होती! साहेब बहुधा चांगल्या मूडमध्ये होते त्यांनी स्माईल देत विचारले, "कायरे, या धरणात मासे पकडता का?" शंकरआप्पा "होय जी" म्हणाला. "याच परिसरात जरा सुट्टी घालवायला आहे मी अजून आठेक दिवस! तेव्हा, उद्या दुपारनंतर चक्कर टाकतो इकडे परत. जरा ताज्या माशांचा बंदोबस्त करा आणि एखादा ससा!" शंकरआप्पा मानेनेच 'होय' म्हटला आणि साहेबांनी निरोपासाठी हात वर करीत गाडी सुरू केली.

त्या कच्या रस्त्यांच्या खाच खळग्यातून गाडी डुलत-डुलत धरणाच्या भरावावर हळू-हळू चढायला लागली. रस्त्यावर पडलेल्या तुटक्या जाळीकडे पाहत किशाचा सलाम सावकाश खाली आला.


- संदीप चांदणे (८/९/२०१५)

Monday, September 7, 2015

येक रूपाया! (भाग -२)

मिसळपाव डॉट कॉम 'शतशब्दकथा' स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवलेली कथा!

येक रूपाया! (भाग -२)

गावातन प्रभातफेरी झाली, झेंडा फडकला, बिस्कीटपुडा मिळ्ळा, झाल पंधरा ऑगस्ट! पर्धेला नाव दिल्याली थांबली शाळेत, बाकी घरला!

व्हरांड्याच्या खिडकीतन आमच्याच वर्गात बसल्याली पोर दिसली. शिपाय बस्ल्याला खुडचीत, कुणालाबी खवळत नव्हता.

ढेऱ्याचा सच्या सतराबाऱ्या कायतरी काडायचा पुना खुडायचा! मला य म्हन्ला आत. गेलो, त्याज्यापशी बस्लो, म्हन्ला, "संदीप्या चितार काडून दी की लका, तुला रूपाया दिईन."

गावातलच तळ, त्याज्यात बदक, व्हडी नावाडी, शेतं, झाडं आन माळाच्या रस्त्यावर दपतार घितल्याली पोर काडली. रंग दिला. बाई याया लागल्यावर सच्या म्हन्ला, "ब्रूस दी, तू जा."

त्यादिशी शिपायानी फळा धुऊन रन्गखडूनी चांगल्या आक्शरात लेहल, "सचिन ढेरे - जिपप्रा शाळा तुर्केवाडी, जिल्हा परिषद चित्रकला स्पर्धेत तिसरा. हार्दिक अभिनंदन!"

येक रुपाया! (भाग १)

मिसळपाव डॉट कॉम 'शतशब्दकथा' स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवलेली कथा!

येक रुपाया! (भाग १)

नुस्ता गुंधूळ वर्गात. बाई कायतरी लिहीत व्हत्या, तेवढ्यात शिपाय आला नोटीस घिवून. सगळ्यान्ला वाटल उद्या सुट्टी!

बाईंनी वाचल, "सर्वांना कळविणेत येते की, पंधरा ऑगस्टनिमित्त शाळेत चित्रकला स्पर्धा आहे. भाग घ्यायचाय त्यांनी वर्गशिक्षकांकडे फी जमा करणे. नोटीस दिनांक १/८/१९९२."

शाळा सुटल्यावर तीन ढांगात घरी! तायला म्हन्लो, "ताये मला येक रुपाया दी, शाळत चित्रकला पर्धा हाय." धुनं वाळू घालीत म्हन्ली, "त्यान्ला न्हाय काम आन तुला नाय धंदा!"

धा रोज तायच्या म्हाग लाग्लो. रडलोबी. एक दिवस शाळला जाताना तायनी रुपाया दिला.

पुना तीनच ढांगा! हाजरी झाल्याझाल्या बाईन्ला म्हन्लो, "बाई, फी!" बाई म्हन्ल्या, "संदीप, मुलांची यादी कालच जिल्हा परिषदेला दिली."

म्हाग फिरल्यावर बस्करपट्टीबी दिसाना!

संदीप चांदणे (७/८/२०१५)

Friday, September 4, 2015

घर आपल…

घर आपल…
आपल्या स्वप्नातलं… आपल्या स्वप्नांसाठी
आपल्या मनातलं… आपल्या समृद्धीसाठी
आपल्या कष्टातलं… आपल्या कुटुंबासाठी
आपल्या नात्यातलं… आपल्या जिवलगांसाठी

घर आपल…
शांत-प्रसन्न सूर्योदयासाठी… आनंदी समाधानी सांजेसाठी
ओढीने परत येण्यासाठी… स्वस्थ निवांत वास्तव्यासाठी
नात्यांच्या सोहळ्यासाठी… सुखांच्या उत्सवासाठी
आपल्या सुरक्षिततेसाठी… ऊन-सावल्यांच्या खेळासाठी
आपल्या मन:शांतीसाठी… निरोगी दीर्घायुष्यासाठी

घर आपल…
आपल्या स्वप्नातलं… आपल्या स्वप्नांसाठी!
- संदीप चांदणे (६/९/२०१५)

Tuesday, September 1, 2015

ती सकाळ आणि ती!


आभाळातली चांदण्याची आरास पुसट होत चालली होती. रात्रीचा खेळ संपवून माघारी चाललेल्या चांदण्यांमधल्या काही उगाच मागे रेंगाळल्या होत्या. वारा कधी झाडांवरच्या पानांबरोबर तर कधी खाली निवांत पहुडलेल्या पाला-पाचोळ्यांबरोबर खेळत होता. धुकही आता आजूबाजूच्या परिसराला मिठीत घ्यायला लागल होत. बाहेर भिरभिरणारा वारा आता शिरीषच्या बेडरुमच्या अर्धवट उघड्या खिडकीतून आत शिरला व शिरीषच्या तोंडावर झुलणा-या चादरीच्या टोकाला धरून हलवू लागला. एरवी सकाळचे आठ वाजलेले असतानाही कुणी अंगावरच्या चादरीला हात लावला तर वैतागणारा शिरीष आज वा-याच्या मस्तीने जरासा सुखावला व पापण्यांची उघडझाप करीत डोळे उघडून बेडवर बसला. त्याने बाहेर एक नजर टाकली. ना सूर्याचा प्रकाश ना रात्रीच्या खुणा, असे काहीसे धुंद वातावरण बाहेर तयार झाले होते. भिंतीवरच्या घड्याळात बघताच ब-याच दिवसांनी सकाळचे साडेसहा बघतोय हे त्याला जाणवले. स्वत:शीच हसत तो उठला व बाथरूमकडे रेंगाळत चालू लागला.

     तसे पाहता आज घरात त्याला झोपेतून जाग करणार कुणीच नव्हत. आई-बाबा काल रात्रीच नागपूरला त्यांच्या एका मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी गेले होते. त्यांनी बाहेर फिरण्याचा चांगला आठ दिवसांचा कार्यक्रम आखला होता. छोटा भाऊ अभयही कॉलेजच्या सर्व्हे ट्रीपसाठी दक्षिण भारतात चार दिवसांसाठी गेला होता. एकूणच,  कितीही वेळ झोपण्याची आयती संधी मिळालेली असतानाही एव्हाना त्याने निसर्गाच्या हाकेला प्रतिसाद देउन तसेच तोंडाला पाण्याची भेट घडवून द्यायचे काम पार पाडले होते. वेगळीच उर्जा मिळाल्याचे त्याला स्वत:ला वाटत होते. पुन्हा एकदा त्याने खिडकीबाहेर नजर टाकली. रस्ता खर्र-झर्र अशा तालात झाडणारी एक बाई, सायकलला पुढे आणि पाठीमागे पेपरचा गठ्ठा लावून जाणारा मुलगा आणि देवळाच्या समोर उजव्या बाजूला असणा-या हार- फूल वाल्याची सकाळची लगबग पाहून त्याने बाहेर 'वॉकला' जायचे ठरवले. असा एवढ्या सकाळी ब-याच वर्षात क्वचितच तो बाहेर पडला असेल. त्यामुळे 'वॉकचा' त्याला विशेष अनुभव नव्हता. नेमके कुठपर्यंत चालत जावे या विचारात असतानाच त्याला सुचल की, सकाळचा पेपर घरी यायच्या आत आपणच तो नाक्यावरच्या किशोरभाउंकडून कलेक्ट करू आणि घरी चहाची खटपट करायच्या ऐवजी कोप-यावरच्या 'मॉर्निंग कॅफे' नावाच्या छोट्या हॉटेलात बसून पेपर वाचता-वाचता चहा घेऊ. अशी 'वॉक'ची मस्त कल्पना डोक्यात आल्याबद्द्ल तो स्वत:वरच जाम खूष झाला. मग टेबलाच्या खणातून घड्याळ काढून हाताला चिटकवीत, चष्मा डोळ्यावर चढवित आणि पाकीट नाईट पॅंटच्या खिशात टाकीत उत्साहाने तो घराबाहेर पडला.

     फ्लॅटला कुलूप लावत असतानाच शेजारच्या मिसाळकाकूंनी त्याला आवाज दिला, "शिरीष! अरे वंदनाताई बाहेरगावी गेल्यात ना? ये ना मग चहासाठी!" शिरीषला 'मॉर्निंग वॉक' 'मॉर्निंग टॉक' मध्ये बदलत असल्याच चित्र त्याला दिसू लागल! याच कारण म्हणजे मिसाळकाका वनविभागाचे निवृत्त आधिकारी असल्याने त्यांच्याकडे सांगण्यासारख खूप काही असे. पण, मिसाळकाकूंना बोलण्यासाठी कधीच कुठल्या पात्रतेची आवश्यकता वाटलेली नव्हती आणि शिरीष हे पुरेपूर जाणून होता. दोनच सेकंदात भानावर येत शिरीष म्हणाला, "नको काकू, थॅंक्स! सकाळी-सकाळी जरा बाहेर फिरून येतो, बाहेरच वातावरण अगदी मस्त झालय!" "अरे वा! चांगल आहे! सकाळी-सकाळी फिरण हे आरोग्यासाठी केव्हाही चांगल! मी पण आमच्या ह्यांना हेच्च सांगत असते नेहमी. आत्ताच ह्यांना बोलले, बाहेर बघा कश्शी गुलाबी थंडी पडलीये, पण आमचे हे! मुलखाचे आळशी!" आता काकूंनी वेगळाच राग धरलाय हे ओळखून शिरीषने लिफ्टकडे बघितलेही नाही आणि ताबडतोब जिन्याचा रस्ता पकडला व पाठमोराच, "अच्छा काकू, मी निघतो" असे म्हणत सटकला. एक मजला उतरेपर्यंत, "परत आला की ये, मस्त कांदेपोहे बनवून ठेवते!" हे शब्द फेरीवाल्याच्या आरोळीसारखे त्याच्या कानावर आदळले. मिसाळकाकूंनी एवढी विचारपूस करण्यामागे त्यांची ती सांगलीची भाची 'निलाक्षी' आहे हे त्याच्या डोक्यात क्षणभर घोळले, क्षणभरच! कारण, बिल्डींगचा शेवटचा जिना उतरून फाटकापर्यंत चालत येताना, आजूबाजूच्या विरळ होत चाललेल्या धुक्याच्या मोहक गारव्याने त्याला एकदम बरे वाटले व सगळे विचार केसांना कुरवाळीत वा-याबरोबर उडून गेले.

     रस्ता अगदी रिकामा होता. एक-दोन पायी चालणारे आणि दोन-तीन व्यायामासाठी पळणारे आणि पुढच्या गल्लीच्या वळणावर थांबलेला रिक्षा एवढीच गर्दी होती. जाताना डाव्या हाताच बाप्पाच मंदीर, त्याच्यापुढची छोटीशी बाग, बाजूला एक पाणपोई, रस्त्याच्या कडेला फुटपाथवर ठराविक अंतरावर मांडलेले बेंच, त्यांच्यावर त्यांच्यापाठीमागे उभ्या चाफ्याच्या झाडांमुळे सांडलेली पांढरी-पिवळी फुले तसेच जाड मोठ्या आकाराची गर्द हिरवी पाने या सगळ्यांमुळे हा परिसर आपण पहिल्यांदाच असा अनुभवतोय अस त्याला वाटल! एरवी इथूनच रोज सकाळी बाईकवरून ऑफिसला जाताना त्याला,  कसे पटकन या गल्ली-बोळ आणि कोनाड्यातून बाहेर पडून हायवेवर जाऊन पोचतो अस व्हायच! पण आता याक्षणी तर त्याला इथूनच चालताना खूप प्रसन्न वाटत होत. अगदी अंघोळ केलेली नसतानाही त्याला फ्रेश वाटू लागल होत!

     चालता-चालता कधी नाक्यावर पोचला ते त्यालाही कळल नसाव कारण, "काय शिरीषराव! आज सकाळी-सकाळी?" या किशोरभाउंच्या त्याच्याकड न पाहता सराईतपणे पेपरचे गठ्ठे बांधत असताना विचारलेल्या प्रश्नाने त्याची तंद्री भंग पावली. मग भानावर येत, "काही विशेष नाही, आलो जरा, तुम्ही काम व्यवस्थित करता का नाही ते पहायला!" त्याच्या या बोलण्यावर दोघेही हसले. मग किशोरभाउंनी पुन्हा सराईतपणे इकडेतिकडे हात चालवत त्या पेपरांच्या ढीगातून एक सकाळ आणि एक टाईम्स दुमडून त्याच्याकडे न पाहता त्याच्यासमोर धरला.  ती पेपरची गुंडाळी शिरीषने बगलेत मारली आणि तो परत माघारी 'मॉर्निंग कॅफे' कडे वळला.

     कॅफेमध्ये शिरताच काउंटरजवळून जाताना अगरबत्तीच्या सुवासाने त्याचे झकास स्वागत केले. त्या दरवळातून जाताना त्याच्या मनात त्याला 'सायकल अगरबत्ती' असे जाहिरातीतल्या सारखे उद्गार ऐकू आले आणि तो स्वत:शीच हसला. कॅफेचे मालक देवपूजेत व्यस्त होते आणि दोन वेटर टेबल लावण्यात आणि पुसण्यात. बाहेरच्या बैठकीत उजव्या बाजूच्या शेवटच्या रांगेतला रस्त्याच्या बाजूचा कोप-यावरचा टेबल त्याने निवडला. बाहेरची बैठक सर्व बाजूंनी खुली असल्याने त्या सकाळचा तो मस्त गारवा त्याला अजून मनभरून अनुभवता येणार होता. एक प्लेट उतप्पा आणि एक चहा अशी ऑर्डर देउन त्याने पेपर चाळायला सुरूवात केली. बाहेरच्या वर्दळीने अजून जोर धरला नव्हता तेवढ्यात 'मॉर्निंग कॅफे' च्या त्या तीन लाकडी पाय-या टप्ट्प वाजवत एक मुलगी झपाट्याने आत शिरली. शिरीषचे त्या आत येणा-या दरवाजाकडे लक्ष नसले तरी डोळे आपोआप त्या दिशेला वळले.

     पंचविशीतली तरूणी असावी. मोकळे सोडलेले पण व्यवस्थित केस, खांद्यावर रुळणारे. डार्क मरून खूप सारी एम्ब्रोयडरी केलेला top त्यावर ब्लॅक जॅकेट आणि Levi's जीन्स! खांद्यावरची झोळीवजा पर्स टेबलावर आदळत तीही खुर्चीवर जवळजवळ आदळलीच! नेमके आजच पेपरमध्ये विशेष काहीच नाहीये असे शिरीषला मनापासून वाटले! तिच्या या धांदलीमुळे शिरीषला तिला नीट पाहता आले नाही पण याच धांदलीमुळे त्याला तिला पाहण्याची इच्छा मात्र झाली. तिच्या देहबोलीवरून ती वैतावलेली आहे हे कुणीही सांगू शकले असते. पण शिरीषला त्याचे काय! तो आपला भान हरपून त्या सुंदर दृश्याकडे पाहू लागला. काही वेळानंतर आपल्या आजूबाजूला कोणी आहे अस वाटून त्या मुलीचे लक्ष शिरीषकडे गेले. तर शिरीष तिच्याकडे जणू आजूबाजूला कुणीच नाहिये अशा, फक्त ती आणी हा स्वत: एवढेच दोघे आहेत आणी पाठीमागे कुठेतरी मस्त रोमॅटींक म्युजीक वाजतय अशा थाटात तोंडाचा आ तसाच ठेवून तिच्याकडे बघत होता. तिची नजर त्याच्याकडे वळताच मात्र त्याला जणू शॉक बसला आणि गडबडीने त्याने पेपर झटकला व त्यात पाहू लागला. त्याची ती धडपड तिला समजली असावी कारण आधीच त्रासलेल्या तिच्या मुद्रेवर अजून एक त्रासिक रेष उमटली.

     व्यवस्थित बसून झाल्यावर तिने डाव्या बाजूला मान वळवून वेटरला ऑर्डर सोडली, "एक कॉफी, प्लीज!" गव्हाळ वर्ण, मध्यम बांधा, पांढरे-टपोरे काजळावर भिरभिरणारे डोळे, सरळ नाक. अहाहा! एव्हाना एकदोनदा उतप्प्याऐवजी टेबलावर पसरलेला पेपरही खाउन झाला होता शिरीषचा. हे बहुधा तिने पाहिले कारण ती एकदा खुदकन हसलीसुद्धा! तिचे ते लाघवी स्मित पाहून शिरीषला त्याची स्वत:ची कविताच (लिहिलेली) आठवली! 'ती आहे लालपरी....' मनातल्या मनात या ओळी तो घोळवू लागला आणि लगेचच स्वत:वरच वैतागलाही, स्वत:लाच म्हटला, "नाही, ही नाही, ही थोडी सॅड आहे!" या त्याच्या बोलण्याच्या आवाजामुळे तिने त्याच्याकडे पाहिले, तो पुन्हा दचकला आणि पेपरात वाकला. मग दोन चार सेकंदानी पुन्हा नजर तिरपी करत त्याने दुसरी कविता आठवायला सुरूवात केली...'काव्य माझे घडते, अवघडते...', आता यावेळी तो एकदम दचकला, कावराबावराच झाला! 'एवढ्यात कशी गायब झाली ती? आता तर होती ना इथे! अरे यार!' अशा या विचारात असतानाच डावीकडे रस्त्याच्या बाजूला पाहिले असता ती पळत पळत एका टेम्पो ट्रॅव्हलर गाडीच्या दरवाजातून चढत असताना दिसली. शिरीषचा एकदम सॅड स्माईलीसारखा चेहरा झाला. कॅफेच्या काऊंटरवर असलेल्या देवाच्या फोटोकडे पाहत त्याने, "खुश तो बहोत होंगे तुम आज, हांय!"  असा डायलॉगही, बच्चन स्टाईलने मारून टाकला.


     आता नाष्टा संपवून शिरीष उठून काऊंटरवर बिल देण्यासाठी गेला. बिल देऊन मागे वळला तसा मघाच्या 'त्या' टेबलाकडे त्याच लक्ष गेल आणि काय आश्चर्य! त्या तरूणीची ती झोळीवजा पर्स तिथेच पडली होती! शिरीष या योगायोगावर भलताच खूष झाला. या पर्समध्ये नक्कीच तिच नाव, पत्ता असेल! फोन नंबरही असेल. कदाचित फोटोही! मग आपण तिला फोन करून कुठेतरी पर्स घ्यायला बोलवू किंवा पर्स द्यायला जाऊ किंवा कशाला, सरळ पत्त्यावरच जाऊ आणि तिच्या काळजीत पडलेल्या चेह-यावर चकाकी आणू. अशा अनेक गोड शक्यतांच्या भविष्यकाळाने त्याच्या वर्तमानाला गुदगुल्या करायला सुरूवात केली. काऊंटर कडे पाठमोरा राहत त्याने मागच्या कुणालाही शंका येणार नाही अशा सफाईने ती पर्स उचलली आणि झपाट्याने पाय-या उतरून खाली आला. तो त्या पर्सकडेच पाहत होता. खूपच खूष झाला होता तो.

     तसेच पर्सकडे पाहत त्याने घराचा रस्ता पकडला. अचानक त्याला समोर कोणीतरी उभे राहून रस्ता अडवल्यासारखे वाटले. समोर पाहतो तर तीच! मघाची सुंदर तरूणी! त्याला एकदम घामच फुटला. आवंढा गिळत अडखळत तो तिला सांगू लागला "अहो....मी...तिथे तुमची....मी द्यायलाच...." तिने हात पुढे केला. त्याने तिच्या हातावर पर्स ठेवली. आता तिच्या चेह-यावर एकदम हसू फुटले आणि ती म्हणाली, "थॅंक्स हं!" तिच्या हसण्याने शिरीष थोडा नॉर्मल झाला आणि म्हणाला, "ओह! वेलकम!....मी शिरीष....मी इथे जवळच राहतो. इथे येत असतो सारखा… सकाळी सकाळी…" ती पुन्हा हसली व म्हणाली, "थॅंक्स अगेन, मी निघते माझ्या मैत्रीणी वाट पाहतायेत पुढच्या कॉर्नरला." आणि ती झपाट्याने त्याला ओलांडून निघून जाऊ लागली. काहीतरी हातातून निसटून चालल्यासारख वाटल शिरीषला. तो गडबडीत बोलला, "तुमच नाव?" ती चालता चालता पाठीमागे पाहत हसून म्हणाली, "निलाक्षी". 

     याक्षणी, आताच नाष्टा केलेला असतानाही शिरीषला कधी एकदा मिसाळकाकूंकडे जाऊन कांदेपोहे खातोय असे झाले! आता त्याची पावले त्याच्या बिल्डींगच्या दिशेला झपाझप पडत होती. शिरीषला 'ती सकाळ' आणि 'ती' प्रचंड फ्रेश वाटू लागली!

- संदीप चांदणे (३१/८/२०१५)

Tuesday, August 25, 2015

अंबाडा

(८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील काव्यकट्टा या काव्यमंचावर १७/१/२०१६ रोजी सादर केलेली कविता)

अंधाराचा अन पहाटेचा
तो बंध हळवा सोडला
पैलतीरावर त्या घाटावर
कुणी अंबाडा सोडला?

प्रतिमा मोहक ती अर्पण
पाण्याचे त्या होई दर्पण
स्पर्शाविना शिरशिरीचा
कुणी तरंग लहरता सोडला?

दवांसोबत हलके निजेतून
बाग पाहते डोकावून
दहादिशांना बहकवणारा
कुणी गंध नाशिला सोडला?

ना अजून भैरवी निजली
ना अजून भूपाळी उठली
क्षितीजावर सकवार सुरांचा
कुणी राग मारवा सोडला?

अंधाराचा अन पहाटेचा
तो बंध हळवा सोडला
पैलतीरावर त्या घाटावर
कुणी अंबाडा सोडला?

- संदीप चांदणे (२५/८/२०१५)

Friday, May 1, 2015

ऋतू अजून नाहता आहे

उधळ तिच्या वाटेवर जे तिला हवे
येईल ती तुझ्याकडे श्रावण सरींसवे

श्रावण सरला सरी बरसल्या उभा वाटेवर अजून
उधळू काय? दिल्या पुष्पांनीही माना टाकून
ती ना आली, एकटा मी विरहाच्या क्षणांसवे...

कर गोळा पुष्पे दुसरी
रस्ता हा बहरता आहे

वेचता पुष्पे युगे सरली झालो मीच रस्ता
मोजता पांथिक वाटेचे या जीवाला खस्ता
ती ना आली, एकटा मी विरहाच्या क्षणांसवे...

रस्ताच हो असा मग तू
बहराचा जो चाहता आहे

कडेला माझ्या तणपाला फुटेना ना अंकुर
बहर अजून आहे माझ्या फार फार दूर
ती ना आली, एकटा मी विरहाच्या क्षणांसवे

अंकुराला उब मिळू दे
ऋतू अजून नाहता आहे

- संदीप चांदणे (०५/०१/२०१४)

Sunday, January 25, 2015

माझी होशील?

तुला पाहिल आणि कळाल!
सौंदर्य अजून पहायचाच होतो!
मग एकदा खिशातून
ड्रायव्हिंग लायसन्स काढल,
पाहून परत ठेऊन दिल!
परत तुझ्याकड पाहिल
आणि वाटल नाव विचाराव
मग विचार आला, नको
तेही तुझ्याइतकच
सुंदर निघाल तर काय घ्या?
तुझ्याइतक सुंदर आता काही
चालणार नाही मला!
आता तर तुझ्याकडे पहायची सुद्धा
भिती वाटायला लागलीये! कारण,
तुझे ते वा-याबरोबर मस्ती करणारे केस,
माझ्या कल्पनेहून सुंदर निळेशार डोळे,
ओठ तर....बापरे!
ह्यातल कुठलतरी वरचढ ठरायच आणि
मी तिथेच स्वत:ला हरवून बसायचो, मग?
मग, मी तुला सबंध कसा पाहू शकणार?
त्यात पुन्हा समजा, डोळे जास्त आवडले
आणि ओठांकडे आधी लक्ष गेल तर?
माझ मलाच कसतरी वाटेल!
कदाचित अपराधी!
आता तर विचारातही विचारांची
धावाधाव सुरू झालीये!
कस काय तुझ्याकडे लक्ष गेल?
आधी काय पाहिल?
तू आवडलीस हे नक्की
कुठल्या क्षणाला कळाल?
तुझ्याबद्दलचे हे विचार
कधी सुरू झाले? वगैरे...वगैरे...
आता मी वेडा होईन बहुतेक!
पण, वेड नको व्हायला अस वाटतय!
तुलाही वाटत असेल तर...होशील माझी?
सांग ना...माझी होशील?

- संदीप भानुदास चांदणे (25/01/15)

रोशनदान

कभी हुआ करता था जो एक शानदार मेहराबदार रोशनदान आज उसकी शान-ओ-शौकत एक पान की दुकान नोचती हैं उस ठेलेपर तो जमघट लगताही होगा बेकदरदान जमाने का ...