Tuesday, September 8, 2015

वाघ-या

वाघ-या

(ही पूर्णत: काल्पनिक कथा असून या कथेचा अन्यत्र कुठेही कसल्याही प्रकारचा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती)

"कुठला र तू?" दरेकर साहेबाने जेवता जेवता पाण्याचा ग्लास तोंडापाशी धरला आणि इतका वेळ दाराबाहेर हात मागे बांधून उन्हात उभा असलेल्या ठाकराच्या पोराला विचारले.

दुपार तीन-साडेतीनची वेळ होती. दरेकर साहेबांची ब-याच दिवसांनी या पांबरे-माड धरणक्षेत्राला व्हिजीट पडली होती. इकडे येताना मुख्य राज्य महामार्ग सोडल्यानंतर रस्त्याने त्यांना गाडीत एका जागी स्वस्थ बसू दिले नव्हते. त्यामुळे ते वैतागले होते त्यात या धरणावरच्या कर्मचा-यांनी दुपारच्या जेवणाच्या व्यवस्थेत उशीर केला होता. त्यांच्यासारख्या खमक्या सरकारी माणसाला असली कामातली दिरंगाई आजिबात रूचण्यासारखी नव्हती. आणि आता हे कोंबडीचे दोन घास चवीने खातोय न खातोय तोच हा ठाकराचा पोरगा कसलीशी परवानगी मागायला आला होता आणि वर म्हणजे त्या धरण कर्मचारी अतनुरेला बाहेर न जुमानता थेट त्यांच्याकडेच आला होता.

"सायेब मी किशा ठाकर. ह्या माघाल्ल्या डोंग्रापलीकहाडल्या आंबवटपाड्याचा हाये. तेवढ जरा आज रातच्याला हिथ वाघ-या टाकायच्या व्हत्या."  किशा अतिशय अजिजिने बोलला. "आर होय की, पण तुला दिसतय का काय करतोय मी?" आपल्या वैतागलेल्या आवाजात मचाक मचाक मिसळत दरेकर साहेबांनी प्रश्न केला. "व्हय जी, आतनुरे सायेब म्हन्ले, पन यीळ चाललाय. आताच वाघ-या टाकाय पायजे, नाह्यतर पुना काय दिसायच?" "बाहेर थांब, आलोच!" दरेकर साहेबांची अशी अपेक्षित आज्ञा मिळाल्यावर किशा गप बाहेरच्या मोकळ्या जागेतल्या एका खांद्याएवढ्या उंचीच्या, लहानशा पाण्याच्या टाकीजवळच्या नळापाशी येऊन दोन पायावर दातात गवताची काडी धरून बसला. शंकर आप्पा जो त्याच्या बरोबर होता तोही मागे हात बांधून शांत पावले टाकत त्याच्या मागे उभा राहिला. तिकडून लांबवरून धरणाच्या भरावावरून दादया अन परशा येताना दिसले. जरा बर वाटल त्याला.

दरेकर साहेबांनी जणू कुणाला हाकच मारताहेत अशा ढंगात ढेकर दिला आणि दोघांचा नाष्टा झाला असता एवढ्या उष्ट्या राहिलेल्या ताटात हात धुवायला त्यांनी सुरवात केली. तोंडात पाणी घेऊन चूळ भरली आणि खिडकीतून बाहेर पिचकारी मारत असताना त्यांना भरावाच्या दुस-या लांबच्या टोकाला एक गाडी धुरळा उडवित धरणाकडेच येताना दिसली. कपाळावर आठ्या जमून आल्या आणि भुवया बारीक करून ते निरखून पाहू लागले. गाडी पांढ-या रंगाची फोर्ड होती. आता ती खिडकीच्या बाजूने दिसेनाशी होत दरवाज्यातून दिसू लागली. भरावाच्या कच्च्या रस्त्यावरून सावकाश चालत ती धरणाच्या मुख्य भिंतीच्या अलिकडे पाचेक फुटांवर थांबली. तिन तरूण त्या गाडीतून उतरले. तिघेही आजूबाजूला पाहत सावकाशपणे संरक्षक कठड्याजवळ गेले आणि धरण परिसर न्याहाळू लागले. दरेकर साहेबांच्या हालचाली जरा जलद होऊ लागल्या. पहिला प्रश्न त्यांना पडला की 'असे कसे कोणीही येऊन उभा राहतंय धरणावर?!' आणि दुसरा म्हणजे, 'हे लोक आपल्यामागे नेहमीच येत असावेत काय?' असे ते दोन प्रश्न घेऊन दरेकर साहेब दरवाज्याबाहेर असलेल्या पाय-या उतरू लागले.

दरेकर खाली उतरून आले तसे किशाने तोंडातल्या काडीला 'फ्फू' करून उडवून लावले अन उठून उभा राहिला. त्याची हालचाल दिसताच दरेकरांनी हातानेच त्याला जागेवर थांबण्याची खूण केलीं व ते पुढे आलेल्या पोटाला सावरीत त्या तीन तरूणांकडे चालू लागलें. आता किशा आणि मंडळीचे डोळे दरेकरांच्या हालचालीला बांधले गेले.

सूर्य अजून तिरपा होऊन धरणात बुडून जायला तयार झाला होतां. तांबडा-पिवळा रंग ढगांच्या अंगावरून खाली सांडून आभाळभर पसरला होतां. मागे हात बांधलेल्या शंकर आप्पांच्या फे-या एव्हाना थांबल्या होत्या आणि दादया, परशा यांनी एकेक दगड बसायला शोधलां होता. किशा हताशपणे एकटक दरेकर आणि त्या तीन तरूणांकडे बघत होता.

तिघातला एक, जो अंगावर व्हाईट पोलो टी, नवी जीन्स आणि रेबॅन बाळगून होता त्याच्यात आणि दरेकर साहेबांत असे काही हसून आणि खिदळून संभाषण सुरू झाल जस एखाद्या लग्नात आलेले पाहुणे, आपण कशासाठी आलोय हे विसरून दणदणाटी गप्पा हाणत असतात. किशाचा संयम सुटायला लागला होता. त्याच्या मनात वैतागून घरी परत फिरायचेच विचार येत होते, पण बघतो तर काय, त्याच्या पायांची काही हालचाल होण्यापूर्वीच दादया तरातरा दरेकर साहेबांकडे जायला निघाला होता. त्याच्या तोंडातून काही वेडवाकड निघायच ह्या विचाराने वयस्क शंकरआप्पा देखील त्याच्या मागून निघाला.

"सायेब, लावाव का वाघ-या?" दादया, दरेकरांच्या हास्यपूर्ण संभाषणाला मध्येच तोडत विचारता झाला. तोपर्यंत शंकरआप्पाही त्याच्या मागे येऊन उभा राहिलेला. दरेकरांची एक भुवई वर गेली, "हे कोण सायेब हायेत माहित हाये का? सीआयडी इन्स्पेक्टर! काय चोरी-चकाटी केली ना, सरळ कोठडी! काय?" दरेकर तावात बोलले अन रेबॅनचीही जरा हालचाल झाली. दाद्या अन शंकरआप्पाने रेबॅनला हात जोडून नमस्कार केला. शंकरआप्पा म्हणाला, "सायेब, फक्त वाघ-या लावाच्यात, तेबी हापिसांच्या लांब, तिकाडल्या खाल्ल्या आंगाला. हिकड कोण फिराकनार बी नाय." दरेकरांना आता त्यांच्यात विशेष रस राहिला नव्हता म्हणून त्यांना झटकून लावल्यासारखे ते म्हणाले, "हं! जावा पटक्यानी, लावा जाळ्या." दादया नि शंकरआप्पाला एकदम हायसे वाटले.

दरेकरांना नमस्कार करून चटकन ते वळले आणि पावलं दोन पावलं पडली असतील तोवर दरेकरांचा परत मागून आवाज आला, "दोन ससे अतनुरेकड द्या उद्याच्याला, तो पोच करील माझ्या घरी!" शंकरआप्पाचे खोल डोळे गलबलले, कसबसं तो म्हणाला, "सायेब हिथ आधीसारक सस नायती घावत. त्यात अतनुरेसायेबांचा योक ससा दर बारचीला, त्यो पाण्याच्या टाकीपसला किशा हाये का, त्येच्या पोराच्या साळत मास्तरनी पैस भराय नाय म्हणून चार सस आणाय सांगितल्यात. त्याहिच्यात पुना भावकीत बी घावल ती शिकार वाटाय लागती." "बघितल का सर कांगावा! सांगा त्यांना, ह्या परिसरात शिकार करण बेकायदेशीर हाये का नाय? तरी मी परवानगी देतोय. त्या जंगलाच्या खात्यावाल्यांना सगळ कस ढीगानी पोच होत रे? सुक्काळीच्यांनो!" दरेकर आवाजात जरब आणीत बोलला. दोघांचेही डोळे भिरभिर करू लागले अन आवाज दूर मावळतीच्या सूर्यासारखा खोल पाण्यात बुडून गेला. "निघा!" दरेकर अस म्हटल्यावर पुढच काही ऐकायला दोघेही तिथे थांबलेच नाहीत.

शंकरआप्पा नि दादया परत आल्यावर चौघांची जुजबी बातचीत झाली आणि शिकारीच सार सामान उचलून चौघे धरणातून पाणी खाली ज्या बाजूला जात त्या झाडीत गायब झाले.

इकडे दरेकर साहेब रेबॅनला आपल्या फेमस (आजिबात नसलेल्या) सर्व्हिस रेकॉर्डबद्दल आणि इतर खात्यातल्या आपल्या ओळखीन्बद्दल आळवून आळवून सांगत होते. तसेच अधून मधून, 'हे साहेब आहेत काय अजून? ते साहेब म्हणजे तुम्हाला सांगतो….' अशा निरर्थक गप्पांच्या पुडया सोडीत बसले होते. रेबॅन आणि कंपनीला जेव्हा ह्या गप्पा अगदीच असह्य झाल्या तेव्हा त्यांनीही दरेकरांना पाणी लावत त्यांच्यातील 'गाईड' जागा करीत पूर्ण धरण, दरवाजे कसे उघडतात, कसे बंद होतात, पाण्याच्या वेगवेळ्या पातळ्या इत्यांदीची माहिती घेतली. तसेच धरणांच्या दरवाजांसमोर, भरावावर त्यांनी दरेकरांच्यातला फोटोग्राफरही जागा केला.

"त्या कान्डीला नाय र, त्या त्या तरवाडाच्या फांदीला लाव फासा." किशा दादयाला सूचना देत होता. पलीकडे काही अंतरावर शंकरआप्पा नि परशाचंही भराभर खड्डे कर, काही जाळी पसरून ठेव काही झुडूपा-झुडूपातून सहजासहजी दिसणार नाही अशा रीतीने बांध अस काम चालल होत. सुर्य बुडून बराच वेळ झाला होता. किडे-किटकांचा खेळ सुरू झाला होता. रातकिडे आणि बेडकांच्या स्पर्धाही सुरू झाल्या होत्या. अजून काही मिनिटातच सर्व काही अंधारमय होणार आहे याची कल्पना असल्याने चौघांची त्रेधा उडाली होती.

अचानक त्या वातावरणात 'खाडर्र-ढर्डर्र' असा मोठा आवाज झाला आणि पाठीमागून गाडीच्या इंजिनाचा कर्णकर्कश्श आवाज झाला आणि बंद पडला.

कशाचा आवाज झाला हे पाहायला चौघेही त्या दिशेला धावले. धरणाच्या भरावावरून एक कच्चा रस्ता धरणाचे पाणी जिकडे जाते त्या प्रवाहाला समांतर असा नागमोडी वळणे घेत, झाडा-झुडपांना सोबतीला घेत खाली उतरत पुन्हा समोरच्या एका टेकडीच्या बाजूने हळूहळू वर जात होता. त्या कच्च्या रस्त्यावर किशाने वाघरी लावली होती. त्या जाळीने त्या तीन तरूणांची गाडी अडविली होती. गाडी थांबल्याने हेडलाईटच्या दिव्यासमोर झालेली किड्यांची गर्दी लांबूनही दिसत होती.

चौघे पळतच गाडीजवळ पोचले. गाडीची ड्रायव्हरच्या दरवाजाची काच खाली आली. रेबॅनवाला सीआयडी इन्स्पेक्टर गाडी चालवत होता. रेबॅन आता डोळ्यांवरन निघून गळ्याजवळ टीशर्ट मध्ये विसावला होता. चौघांकडे पाहत तो म्हणाला,"काय रे! जाळ लावून गाड्या पकडता की काय?" शंकरआप्पाने हात जोडले. किशाला त्यानेच हळू कानात सांगितले साहेब कोण आहेत ते. किशाचा हात आपसूक कपाळावर गेला सलाम करण्यासाठी! परशा आणी दादयाने तोवर गाडीच्या बोनेट आणि चाकात अडकलेल जाळ फाडून-तोडून काढल होत. ती एकच त्यांची सगळ्यात मोठी आणि मजबूत वाघरी होती! साहेब बहुधा चांगल्या मूडमध्ये होते त्यांनी स्माईल देत विचारले, "कायरे, या धरणात मासे पकडता का?" शंकरआप्पा "होय जी" म्हणाला. "याच परिसरात जरा सुट्टी घालवायला आहे मी अजून आठेक दिवस! तेव्हा, उद्या दुपारनंतर चक्कर टाकतो इकडे परत. जरा ताज्या माशांचा बंदोबस्त करा आणि एखादा ससा!" शंकरआप्पा मानेनेच 'होय' म्हटला आणि साहेबांनी निरोपासाठी हात वर करीत गाडी सुरू केली.

त्या कच्या रस्त्यांच्या खाच खळग्यातून गाडी डुलत-डुलत धरणाच्या भरावावर हळू-हळू चढायला लागली. रस्त्यावर पडलेल्या तुटक्या जाळीकडे पाहत किशाचा सलाम सावकाश खाली आला.


- संदीप चांदणे (८/९/२०१५)

No comments:

Post a Comment

नाकाम मुहब्बत का इनाम हो तुम

किसी नाकारा दुवा की इंतेहा हो तुम कयामत है के अभी तक जिंदा हो तुम सामने आती हो तो यकी नही आता लगता है खुली आंखो का सपना हो तुम अंजाम मुफ्लीस...