Tuesday, October 20, 2015

वाटेत भेटलेला शेर!

वाटेत भेटलेला शेर!


ही शेरांबद्दलची (शायरीतला!) माझी एक आठवण आहे!

सहा-सात वर्षांपूर्वी एकदा माणगावातून हिंजवडीकडे जायला निघालो होतो. रस्त्यात गाडी पंक्चर झाली. ढकलत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. निघालो!
रस्त्यात एक गॅरेज लागले. अगदी मल्टिपर्पज/मल्टिसर्व्हिसेस टाईप होते. गाडी गॅरेजवाल्याच्या हवाली करून बाजूला एका स्टुलावर बसलो. तिथेच दोन पेंटर ट्रकवरती जागोजागी ऑईल पेंटने चित्र काढत होते. एकजण ट्रकच्या पाठीमागे शेर लिहित होता. उत्सुकता म्हणून एकेक शब्द पेंट होताच मोठ्याने वाचत होतो. पेंटरजवळ ट्रक डायव्हर उभा राहून नीट लक्ष देऊन काढून घेत होता. तो शेर असा होता,

"परिंदे भी नही रहते पराये आसमानो में,
हमारी उम्र गुजर गई किराये के मकानो मे!"

शेराला मी छान म्हटल्याबरोबर त्या ट्रक डायव्हरबरोबर छान गट्टी जमली. मग त्याने ट्रकच्या केबिनमधून त्याची एक जुनीपुरानी वही आणली, ज्यात त्याने त्याच्या आवडीचे शेर लिहिले होते. खरच रसिक वाटला मला तो.
त्या वहीतून दोन - चार शेर त्याने मला वाचून दाखवले. सगळेच चांगले होते, पण माझ्या लक्षात राहिला तो हा...

"ऐ अब्रे मोहब्बत जरा जमके बरस,
मैं रेत का सहरा हू, मेरी प्यास बहुत है!"

मला हा शेर आवडला त्याच्या अर्थामुळे! प्रेमाला एका वेगळ्या भव्य अशा उंचीवर त्यातल्या भावामुळे हा शेर नेऊन ठेवतो. म्हणजे बघा, रेत का सहरा(ही ती भव्यता!) असणारा प्रियकर प्रेमासाठी असा कासावीस आहे की प्रेयसीला जी आता अब्र-ए-मोहब्बत (हीसुद्धा भव्यताच!) होऊन बरसणार आहे तिच्या लक्षात आणून देतो की नुसतं रिमझिम बरसून ओल पसरवून काम नाही चालणार तर तुला कोसळाव लागेल अफाट आणि सार चिंब करून टाकावं लागणार!
हा परिणाम साधण्यासाठी त्यात काव्यात्मकताही तेवढ्याच समप्रमाणात ठासून भरली आहे. म्हणजे कधी काही शेर असेच सरळ चालत आल्यासारखे येतात अन् काही असे हळुवार तरंगत-लहरत येतात!
दुर्दैवाने हा शेर कुणी लिहिला आहे ते मला माहित नाही पण असा बढीया, तबीयतदार शेर लिहून ठेवल्याने त्या अनाम शायरास माझा सलाम आहे! ____/\____

- संदीप चांदणे!

No comments:

Post a Comment

नाकाम मुहब्बत का इनाम हो तुम

किसी नाकारा दुवा की इंतेहा हो तुम कयामत है के अभी तक जिंदा हो तुम सामने आती हो तो यकी नही आता लगता है खुली आंखो का सपना हो तुम अंजाम मुफ्लीस...