Tuesday, May 11, 2021

मखमली तम

मखमली तम सांडले
ओंजळीत आभाळाने 
आणि शोभा आणली
अतिशीत चांदव्याने

छेडी राग प्रणयाचा
धीट चांदणी नभात
आळविते तेच पुन्हा
कापऱ्या मऊ स्वरात

रानामध्ये पानाआड
कधी अवचित कोकिळ
जाणे कुठे नीज ठेवून
गातो विरहगीत मंजुळ

वाटा रस्ते निपचित
कोणी बोलेनासे झाले
अंधाराच्या डोहामध्ये
एकेक घर बुडून गेले

- संदीप चांदणे (रविवार, ९ मार्च २०२१)

No comments:

Post a Comment

रोशनदान

कभी हुआ करता था जो एक शानदार मेहराबदार रोशनदान आज उसकी शान-ओ-शौकत एक पान की दुकान नोचती हैं उस ठेलेपर तो जमघट लगताही होगा बेकदरदान जमाने का ...