Wednesday, December 17, 2025

अकबर बिरबल (बँक व्हिजीट)

अकबर बिरबल (बँक व्हिजीट)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

[दृश्य: अकबर आणि बिरबल दोघे बँकेच्या समोर गाडी पार्क करून उतरून बँकेच्या आत चालत जात आहेत. बँकेत नेहमी असते तितकीच गर्दी आहे आणि तिथे काम करणाऱ्या सिनियर व्यक्तीला जी एक महिला आहे तिला सर्दी आहे.]

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्थळ: बँकेची गजबजलेली शाखा.
काळ: चालून आलेला.
वेळ: साधारण वामकुक्षीची पण सध्या अकबराची आर्थिकदृष्टया अतिशय खराब!

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पात्रे:
१) अकबर
२) बिरबल
३) बँक कर्मचारी
४) बँक कर्मचारी
५) बँकेच्या दरवाजातला सिक्युरिटी कम ऑफिसबॉय
६) बँकेत आलेले काही लोक

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(बँकेत जायचं आणि काम करवून घ्यायचं हे काम तितकं सोपं नाही जितकं कोंबडी अंड देते. उदाहरण बरंच चुकलेलं आहे पण ते असो, मुद्दा तुम्हाला कळला, नाही का? तर अशाच एका मंगळवारी अकबराच्या पत्रिकेत मंगळ आल्यामुळे त्याचा बँकयोग जुळून आला. काम जरा जरुरीचे असल्यामुळे आणि बँकेच्या शाखेत फोन करून त्यांच्याकडून काम करवून घ्यायचा आधीचा अनुभव अकबर बिरबलच्या गोष्टीतल्या खिचडीसारखा असल्यामुळे, उदाहरण पुन्हा बरंचसं चुकलं पण तुम्हाला मुद्दा कळलाच त्यामुळे तेही एक असोच. अकबर बिरबलाला सोबत घेऊन बँकेत आलेला आहे.)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सिक्युरिटी कम ऑफिसबॉय: (अकबराकडे संशयित नजरेने पाहत) काय काम आहे?

अकबर: (आधीच वैतागलेला त्यात सिक्युरिटीने असे दरवाजातच अडवून टोकले त्यामुळे अजून त्रस्त होऊन बिरबलकडे बघतो.) बिरबल. सांग यांना आम्ही का आलोय स्वतः इथे.

बिरबल: (लगबगीने अकबराच्या पुढे येत) मालकांच्या अकाउंटला लीन पडलंय, त्याची चौकशी करायला आलोय.

सि...: (हाताने आतमधल्या एका टेबलाकडे इशारा करीत) तीन नंबरला जाऊन भेटा.

(अकबर बिरबल पुढे जाऊन त्या नंबर तीन टेबलापलीकडे कॉम्युटरच्या मॉनिटरमध्ये मान खुपसून बसलेल्या महिला कर्मचाऱ्यासमोर जाऊन उभे राहतात.)

बँक कर्मचारी १: (दोघांकडे आजिबात पाहता तार आणि बँकेच्या चिरपरिचित स्वरात) बोलिए, क्या काम है?

बिरबल: (इथे अचानक बिरबलाचा महाराष्ट्र बाणा जागा झाला आणि तो मराठीत तिला विचारता झाला.) मॅडम, हे आमचे मालक अकबर. यांच्या अकाउंटला लीन पडलं आहे.

बँ. . १: (आता एक क्षण अकबराकडे पाहून, कीव आल्याचा हावभाव करून पुन्हा मॉनिटरात डोकं खुपसते.) कधी पडलंय लीन ?

बिरबल: जुलै 2023 मध्ये.

बँ. . १: (आता पुन्हा एक क्षण बिरबलाकडे पाहून, बाई! काय वैताग आहे! असा हावभाव करून पुन्हा मॉनिटरात डोकं खुपसते.) मग इतक्या उशिरा आलात तुम्ही? अकाउंट वापरात नाही का?

बिरबल: नाही ना. त्यामुळेच लक्षात नाही आलं.

बँ. . १: (अतिशय थकलेल्या स्वरात) बसा, सर्व्हरला चेक करून सांगते.

(पुढचा सुमारे अर्धा तास बसून एका कुल्यावरून दुसऱ्या कुल्ल्यावर भार देऊन अकबराने पोज बदलली. अकबराची अस्वस्थता पाहून बिरबलाने हिंमत करून मॅडमला विचारले)

बिरबल: मॅडम, दिसलं का सर्व्रात काही?

बँ. . १: (बिरबलाकडे बघता बँकेच्या अजून आतल्या भागात असलेल्या दुसऱ्या महिला कर्मचारी जी पाठमोरी दिसते आहे तिच्याकडे बघत) अरुधंती मॅम! यांच्या अकाऊंटला लीन पडलंय. सर्व्हरला ऍक्सेस नाही मिळत मला. प्लिज चेक करून सांगता का? (पुढे त्या मॅडमच्या उत्तराची वाट बघता.) त्यांच्याकडे जा, त्या सांगतीलतुम्हाला.

(अकबराने घड्याळात बघितले, अर्ध्याहून अधिक तास तोंडात मूग धरून बसलेली ही बाई आता दुसरीकडे जायला सांगते म्हटल्यावर तिच्याकडे खाऊ का गिळू नजरेने बघत चटदिशी उठला आणि आतल्या त्या मॅडमच्या टेबलाकडे चालू लागला. सोबत बिरबलही लगबगीने चालू लागला.)

बिरबल: (नवीन मॅडमला पुन्हा ओळख करून देत) मॅडम हे आमचे मालक अकबर. यांचं इथे करंट अकाउंट आहे. अकाऊंटला बॅलन्स नऊशे रुपये आहे त्याच्यावर साडेसातशे रुपयाचं लीन पडलं आहे. जरा बघता का. पैसे नसल्यामुळे मालकांची तंगी चालू आहे.

बँक कर्मचारी २: (सुमारे पावणेतीन मिनिटे मौन पाळून) बसा. चेक करते.

(तिथे एकच खुर्ची असते. अकबर बिरबल दोघेही बसायला सरसावतात पण बिरबल पटकन बसून घेतो. पुन्हा अकबराचे डोळे मोठे झाल्यावर पटकन उठून बाजूला होतो मग अकबर बसतो. मग बिरबल बाजूची एक खुर्ची जी जड असल्यामुळे उचलली जात नाही, मग तो ती खुर्ची ओढत आणू लागतो तर लोखंड फरशीवर घासल्याचा कर्कश्श आवाज होतो. बँकेतले सगळे बिरबरलकडे बघू लागतात. समोरच्या मॅडम मात्र ढिम्म हलता, तोंडावरची माशीही हलू देता आधीसारखेच आपले काम चालू ठेवत घरचा राग कीबोर्डवर काढत असतात.)

बिरबल: (बराच वेळ इथेही बसून झाल्यावर, मॅडम, दिसतंय का काही?

बँ. . २: दोन वर्षांपूर्वीच्या इंट्रीज आहेत त्या. जरा वेळ लागतो ऍक्सेस व्हायला. दोन वर्ष थांबलात आता अजून थोडं थांबा की. असंही तुम्ही ते अकाउंट बघत नव्हता.

बिरबल: बरोबर आहे मॅडम तुमचं. पण मालकांचे नवीन लोन झालेत पाच, आधीचे तीन. सगळे एमआय मिळून बाकीचे अकाउंट साफ झालेत. हेच अकाउंट राहिलंय म्हणून त्यातून पैसे काढायचे आहेत पण लीन पडल्यामुळे उरलेल्या दीडशे रुपयांत मालकांनी महिना कसा काढायचा?

बँ. . २: (अतिशय कीव केल्याचा अविर्भाव करून) हे आधीचे धंदे अर्धवट राहिलेत. म्हणजे, आधीच्या धंद्यात काही टॅक्स भरायचा राहिलाय सरकारला. त्यामुळे सरकारने बँकेला सांगून ते लीन टाकलंय.

बिरबल: कसला धंदा? कसला टॅक्स मॅडम? लॉकडाऊन पासून मालकांचा धंदा डाऊन आहे. मालक आता स्वतः सुपरवायजर आहेत वाशिंग सेंटरवर. फक्त प्रीमियम कॅटेगरीतल्या गाड्याच बघतात बरं का मालक? आणि शॅम्पू लावून झाल्याशिवाय जागेवरून उठत नाहीत. पाईप धरतात फक्त पाणी मारायचा. चालू बंद करायला ज्युनियर एम्प्लॉयीला सांगतात. रुबाब अजूनही टिकून आहे मालकांचा. (एवढं सगळं बिरबल सांगत असताना अकबर डोळे मिटून मान तिरपी करून थाटात डोलवत असतो.)

बँ. . २: हे बघा. तुमच्या धंद्याचं तुम्हाला आणि सरकारला माहीत. बँकेला जेवढं सांगितलं आणि मला जेवढं दिसलं ते मी सांगितलं.

बिरबल: पण नक्की कुणाकडे जायचं ते तरी सांगा.

बँ. . २: (पटकन अंगावर पडलेली पाल झटकावी तशा घाईने मॅडम बोलल्या) हे बघा, टॅक्सचं ऑफिस जिथे कुठे असेल तिथे जा. बाकीचं आम्हाला काय माहीत नाही.

(साधारण दोन तास बँकेच्या खुर्चीवर बसून अकबर बिरबल उठले आणि बाहेर चालू लागले. एव्हाना बँकेच्या कामकाजाची वेळ संपल्यामुळे बँकेच्या सिक्युरिटीने शटर खाली टाकलेलं होतं त्यामुळे शटरजवळ जाऊन अकबर आणि बिरबल दोघे एकमेकांकडे शटर कोण उचलणार ह्या प्रश्नार्थक चेहऱ्याने बघू लागतात. शेवटी अकबराचे हात कंबरेकडे जाताच बिरबल घाईघाईने खाली वाकून शटर उघडतो आणि दोघे बाहेर पडून चालू लागतात.)


- संदीप भानुदास चांदणे (बुधवार, 17/12/2025)

No comments:

Post a Comment

अकबर बिरबल (बँक व्हिजीट)

अकबर बिरबल ( बँक व्हिजीट ) ----------------------------------------------------------------------------------------------------------------...