Friday, December 12, 2025

काही सुटलेले हव्यास

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला कशाचा ना कशाचा हव्यास असतोच. आयुष्याची सालपटं एकेक करून निघू लागतात तसतसा त्या प्रत्येकाची आस, मेणबत्ती विझत जाताना प्रकाश क्षीण होत जातो तशी हळूहळू बारीक होऊन संपते. पण, लहानपणी असणारे सर्व हव्यास मजेशीर असतात. मोठे झाल्यावर आपलेच आपल्याला हसू येते. 

मला माझ्या काही आता हास्यास्पद वाटणाऱ्या स्वतःसंबंधीच्या काही स्वभावखुणा आठवतात. प्रामुख्याने खेळ, खाणे आणि टीव्ही पाहणे यांचा लहानपणी असणारा हव्यास आता नाहीये पण ते सर्व आठवून आता खूप हसायला येतं. 

#खेळ:
शाळेत असताना खूप खेळायला मिळावे यासाठी शाळा बुडवण्याच्या कितीतरी क्लृप्त्या केलेल्या आहेत. त्यायोगे त्या-त्यावेळेला गाल, पाठ आणि पृष्ठभाग लाल करून घेतलेले आहेत. आमच्या आईचा आम्हांला इतका धाक होता की त्या काळात मला दिवसाआड माईल्ड हार्ट ॲटॅक येऊन गेले असतील. त्यामुळे, आई बाहेर गेली म्हणजे मला इंग्रज गेल्यावर भारतीयांना जसे झाले असेल तसेच व्हायचे. काय खेळू अन किती खेळू असंच व्हायचं. घरी मुलं जमवू नको हा आईचा धोशा मी आई घराबाहेर पडताच गजनीसारखा शॉर्ट टर्म मेमरी लॉस होऊन साफ विसरून जात असे. आणि आई परतायच्या वेळेला ते आठवून घामाघूम होत असे. बऱ्याचदा असंही व्हायचं की आई, वेळेआधी यायची आणि मग माझ्यासोबत माझ्या मित्रांची खरडपट्टी निघायची. मला त्यावेळेला मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे. असं वाटायचं की लगेच धरणीमाता दुभंगून जावी व मला तिने सीतेसारखं पोटात गडप करावं. किमान काही काळापुरता का होईना ठार बहिरेपणा यावा असंही वाटायचं. नंतर एक-दोन दिवस मित्रांच्या नजरेला नजर मिळवताना लाज वाटायची. एवढं होऊनसुद्धा सुधारणा नाहीच! खेळण्याची आसक्तीच इतकी होती की त्यासाठी त्यावेळेला जान की बाझी लावायची तयारी होती. खेळण्यासाठी मार अशा अशा ठिकाणी आणि अशा अशा व्यक्तिविशेषांपुढे खाल्ला आहे की सांगायची खोटी! दरवेळेला, याच्यापेक्षा काळ्या पाण्याची शिक्षासुध्दा आरामाची असेल, असं वाटायचं. शाळा, अभ्यास हे फक्त परीक्षा आल्यावरच सिरीयसली घ्यायचे असतात ही एक ठाम समजूत माझी आणि माझ्या मित्रांची होती. परीक्षा दोन दिवसावर आल्याशिवाय खेळणे बंद व्हायचे नाही. आणि तेही बंद व्हायचे परंपरेनुसार साग्रसंगीत, आईच्या धोपटण्याने. धोपटणे हा फारच सोज्वळ शब्द आहे. आई अक्षरशः कुटायची. वर ओरडून माझा, वडिलांचा आणि समस्त कुळाचा उद्धार तर असा करायची जसा घाईघाईत रस्त्यावरून ठणाणा करत जाणारा आगीचा बंब.

#खाणे
लहान असतानाच चमचमीत खाण्याची एक प्रबळ इच्छा असे. आणि त्याकाळातली महत्वाकांक्षा एकच, खूप पैसे कमवीन आणि खूप भजी खाईन किंवा शेव-चिवडा खाईन. इतर सर्वसामान्य मुलांसारखे मला गोडाचे वेड नव्हते त्यामुळे माझ्या यादीत अर्थात त्यावेळेसच्या ज्ञानानुसार आणि चवीनुसार फक्त भजी, शेव, वडापाव, समोसा आणि क्वचित भेळ. माझं गणितातलं बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार यांचं जे काही ज्ञान आहे ते वडापावमुळेच हे सांगताना आज मला कसलाही कमीपणा वाटत नाही. हो, कारण पटापट बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार हे घरी आलेल्या पाहुण्यांनी जाताना खाऊसाठी दिलेल्या पैशाचे किती वडापाव येतील. ते घरात इतरांसोबत किती वाटून घ्यावे लागतील हे सर्व वडापावच्या अस्तीत्वामुळेच समजले. वडापाव नसता तर! आज कल्पनाही करवत नाही. मला अजून आठवतंय, कुठूनही जराशी जरी पैसे मिळण्याची शक्यता दिसली तर त्याचं रूपातंर लगेचच, याचे किती वडापाव येतील यात व्हायची. वडिलांबरोबर कधी बाहेर गेलोच तर त्यांना खायला मागून वैताग द्यायचो आणि त्यावेळेला जसं दिवाळीला बोनस मिळाल्यावर मध्यमवर्गीय नेहमीपेक्षा वेगळी आणि जास्त खरेदी करतात तसा माझ्या खायला मागायची लायकी वाढायची आणि वडील कितीही हे नको, ते नको म्हटले तरी तेच घेऊन अर्धवट खाऊन त्यांनाच उष्टे खायला लावायचे हा माझा जन्मसिद्ध हक्क मी चोख बजावत असे. घरी आणलेला खाऊ गोड असेल तर तो इतरांसोबत वाटून खाताना मला गोड वाटायचं पण माझ्या वरच्या यादीतलं काही चमचमीत जर वाटून घ्यायची वेळ आली तर मला जणू काही इस्टेटीतला वाटा देत असल्यासारखं वाटायचं. आणि ज्याला मी ते द्यायचो त्याला मनोमन जन्माचा वैरी ठरवून मोकळा व्हायचो. त्यावेळेला कुणी जर मला अलीबाबा आणि चाळीस चोरांच्या गोष्टीतला त्या चाळीस चोरांकडचा सगळा खजिना आणून दिला असता तरी दोन वडापाव आणि एका भजीप्लेटसमोर तो मी दूर लोटला असता. अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा जर का मला मिळाला असता तर त्या दिव्यातल्या जिन्नाला मी आचारी करून टाकला असता आणि अहोरात्र माझ्यासाठी वडे-भजी-शेव तळायला लावली असती.

#टीव्ही पाहणे
खेळणे आणि खाणे यासोबतच टिव्ही पाहण्यासाठी मी लहानपणी कायम हपापलेलाच होतो. खेळणे शक्य नसल्यास टीव्हीशिवाय दुसरा समर्थ पर्याय त्यावेळेला नव्हताच. मला आठवतंय त्याप्रमाणे आमच्या घरी गावाकडे टीव्ही नव्हता तेव्हा दुसऱ्यांच्या घरी शनिवारचा मराठी पिक्चर आणि रविवारचे महाभारत हे चुकले तर सबंध आठवडा दुखवट्यासारखा जायचा. कारण न बघता आलेल्या पिक्चरची किंवा महाभारताच्या एपिसोडची श्टोरी दुसऱ्याकडून ऐकायची म्हणजे एकप्रकारची शिक्षाच जणू. वरून ते ऐकताना मनाला जणू कोणी तापलेल्या सळयांचे डाग देत आहे असं वाटायचं. यथावकाश पुण्याला राहायला आल्यावर घरी टीव्ही आला. ब्लॅक ॲन्ड व्हाईटच होता पण दुसऱ्यांच्या घरातल्या कलरटीव्हीपेक्षा तो बघण्याचा आनंद जास्त होता. मग तिथून सुरू झाले टीव्ही बघण्याचे व्यसन. सुरूवातीचे काही वर्ष सकाळी उठल्याबरोबर टीव्ही सुरू झालाच पाहिजे हा अलिखित नियम आमच्या घरात लागू झाला. टीव्हीवर जे काही लागलंय ते भक्तिभावाने बघण्याची सवय अल्पावधीतच लागली. रात्र रात्र तारवटलेल्या डोळ्यांनी जागून शेवटचा कार्यक्रम किंवा पिक्चर संपून टीव्हीला मुंग्या येईपर्यंत मी तो बघितलेला आहे. जागण्याची कॅपॅसिटी म्हणा वा एकुलता एक मुलगा असल्यामुळे म्हणा टीव्ही रात्री बंद करायची जबाबदारी माझ्याकडेच असायची. मग परत कित्येकदा असं व्हायला लागलं की मी टीव्ही बघता बघता झोपून गेलोय आणि स्क्रीनवर मुंग्याना खेळवत टीव्ही रात्रभर जागा राहिलाय. मग सकाळी आमचा आगीचा बंब ठणाणा करायला लागला की जीव मुठीत घेऊन मी जागा व्हायचो आणि तो टीव्ही बंद करायला धावायचो. तरीही त्या बिचाऱ्याला पाचेक मिनीटांचीच विश्रांती मिळायची. शाळेसाठी निघेपर्यंत डोळे टीव्हीलाच चिकटलेले असायचे. शाळेतून घरी आलं की आधी टीव्ही चालू करून घ्यायचो अथवा चालूच असला तर शाळेचे दप्तर काढणे, बूट सॉक्स काढणे, शाळेचे कपडे काढणे या क्रिया स्लो मोशनमध्ये व्हायच्या.  टीव्हीला बघून कित्येक वर्षांची ताटातूट होऊन पुनर्भेट होत आहे असं वाटायचं. टीव्ही जर कधी बिघडलाच तर मला सुतक लागल्यासारखं व्हायचं. टीव्ही रिपेअर वाले एक मेकॅनिक काका मला कोणत्याही पाहुण्यांपेक्षा जास्त आवडायचे. फक्त ते जेव्हा मला टीव्ही उचलून त्यांच्यासोबत चालायला लावायचे तेव्हा मात्र ते दुष्ट राक्षसांसारखे वाटायचे. राक्षसांवरून आठवलं, रामायण, महाभारत हे वाचून समजण्याआधी बघून तोंडपाठ होते. हिंदू पुराणांचा अभ्यास असाच न वाचता झाला. नारदमुनी तर नातेवाईकातला एक व्यक्ति वाटायला लागला होता. टीव्ही बघूनच कोणता देव जास्त शक्तिशाली आहे आणि अडचणीत सापडल्यावर कुणाला बोलवायचं हे मी तेव्हा मनात पक्क केलं होतं. आपली माती आपली माणसं आणि सामाजिक वनीकरण यांसारखे सरकार पुरस्कृत कार्यक्रमसुद्धा मी आपल्यावर टाकलेली जबाबदारीच आहे अशा भावनेने बघत होतो. काही काळाने घरात कलरटीव्ही आणि त्याला केबल कनेक्शन आले. चोविस तास मनोरंजनाचे चक्र गरगरू लागले. तसे माझेही बघण्याचे तास वाढले. दूरदर्शनव्यतिरिक्त इतर टीव्ही चॅनेल्सवरच्या उपलब्ध ढीगभर कार्यक्रमांमुळे ते निवडण्यात चोखंदळपणा आला. पण याबरोबरच घरात इतरांबरोबर ते बघण्यासाठी सतत लढाया करायची वेळही आली. पुढे पुढे तर दुसरा बघतोय म्हणून मी पण बघणारच अशा हट्टाने रात्री जागून टीव्ही बघणे झाले. घरातून एखाद्या कामासाठी टीव्ही सोडून जावे लागत असले तर एखाद्या लग्न होऊन माहेर सोडून चाललेल्या मुलीसारखी माझी अवस्था व्हायची. कमालीचे दु:ख व्हायचे. परीक्षा काळात बिचाऱ्या टीव्हीवरच काळ यायचा. कधी एकदा परीक्षा संपून टीव्ही सुरू करून बघतोय असं व्हायचं. लाईट गेल्यावर बंद टीव्हीकडे बघून कसनुसं व्हायचं. तेव्हाच्या मूलभूत गरजांमध्ये टीव्ही पहिल्या नंबरला होता. मोबाईल हातात पडेपर्यंत तो इडियट बॉक्स हा कित्येक इडियट मित्रांपेक्षा जवळचा होता.

अजून काही आहेत. काही सुटले काही नवीन सुरू झाले
 काही संपून नव्याने पुन्हा सुरू झाले.

- संदीप चांदणे (रविवार, २३/०५/२०२१)

No comments:

Post a Comment

अकबर बिरबल (बँक व्हिजीट)

अकबर बिरबल ( बँक व्हिजीट ) ----------------------------------------------------------------------------------------------------------------...