कल्पनाशक्ती ही कुणाची मक्तेदारी नसते. तशी ती सर्वांकडे असते पण काहीजणच तिला जपतात, फुलवतात. लहानपणी ती सर्वाधिक प्रमाणात स्त्रवते. कारण वास्तवाची तेवढी जाणीव त्यावेळी नसते. मोठेपणीचे ताणतणाव तेव्हा नसतात. या गोष्टींवर अलीकडेच मला नव्याने बोध झाला.
आज रविवार... उशीरा उठायचं असं ठरवूनच रात्री झोपलेलो. पण नेहमीप्रमाणे सकाळीच आई आणि बायको असा दोन्हीकडून गोळीबार सुरू झाल्यावर पर्याय नव्हता. अजून सूर्यही उगवलेला नव्हता. बाल्कनीतून बाहेरचा परिसर शांत आणि आल्हाददायक वाटत होता. (आजकाल बाल्कनीतच झोपतोय मी) त्या क्षणी मनात विचार आला की मी तर राजा आहे, माझे घर हे माझे साम्राज्य आहे. आणि ही आजूबाजूची राज्ये. माझ्या साम्राज्यातून मी कुठेही बघू शकतो. कितीही वेळ. आणि माझ्या साम्राज्यात हवा तसा फिरू शकतो. आणि त्या वेळेला चक्क मायमराठीने पाठ फिरवून इंग्रजी भगिनीला माझ्याकडे धाडले आणि मग इंग्रजीतून ह्या ओळी स्फुरल्या:
I am the king, though, not wearing a crown
ready to take another quiet day of lockdown
birds are chirping and sun is rising as usual
me enjoying, sitting in balcony, being casual
forgotten all the pretty leisures of my life
forgotten drinks, drinking tea, brought by wife
time is passing, though, clocks are shutty
fading the glow and charm from the beauty
this phase shall pass, the mind always says
for the unknown future, present always pays
- संदीप भानुदास चांदणे (१०/०५/२०२०)
कितीतरी वेळा असं होतं. सायंकाळचा वारा मोठमोठ्याने गाणं म्हणायला सांगतो. जसाजसा सूर्य डोंगराआड जाऊन प्रकाश कमी होतो आणि हवेतला गारवा गुलाबी होत जातो तेव्हा तोच वारा सावकाश पण आर्त असे काही गायला लावतो. अंधाराची मात्रा वाढते तसा किती नाही म्हटलं तरी उदासपणा दाटतोच. मग कुठलीशी सल अजून हळुवार गुणगुणायला लावते. अशा वेळी जर जवळ मित्र असेल तर मैफल रंगते. दु:खाचीही गाणी होतात. कुणी जवळ नसल्यावर मात्र तो अंधार आणि ती रात्र खायला उठते.
- संदीप भानुदास चांदणे (१०/०५/२०२०)
लहान मुलांना पाहणं, खेळताना पाहणं हे खूप मजेशीर आणि आनंददायक असतं. त्यांनी खेळताना आपल्या कल्पनाशक्तीने त्यांना हव तसं जग निर्माण केलेलं असतं आणि त्यात ते सारं विसरून समरसून जगत असतात. कधीकधी त्यांच्याही नकळत, निरागसपणे ती असं काही बोलत रहातात की आपल्याला आश्चर्य वाटावं की अरेच्चा हे कुठे ऐकलं किंवा पाहिलं असेल यांनी. त्यांच्यासोबतचे सगळे क्षण म्हणजे जणू आयुष्यातल्या रणरणत्या उन्हात मिळालेली गारेगार सावलीच.
शेजारच्यांची लहान मुलं. जवळच्या नात्यातली लहान मुलं यांनी मला भरभरून आनंद दिलेला आहे. अजूनही देत आहेत. लहान मुलांसोबत खेळायला मी कधीही तयार असतो. आता माझ्या मुलींनी माझ्या आयुष्याचा ताबा घेतलाय.
- संदीप भानुदास चांदणे (१२/०५/२०२०)
पसारा आवरायचा एक दिवस येतोच. कपाट, त्याचं ड्रॉवर, पुस्तके, फाईली किंवा हार्ड डिस्कमध्ये स्टोअर केलेले फोटो. पसारा आवरून तो पुन्हा नीट लावताना तासन् तास कसे निघून जातात ते कळत नाही. हे नेहमीच होतं.
आज हार्डडिस्कमध्ये नवे फोटो टाकून ठेवायचे होते म्हणून हार्डडिस्क लॅपटॉपला जोडली. फोटोंच्या फोल्डर मध्ये गेलो. तिथं मी एक अनसॉर्टेड नावाचं फोल्डर करून ठेवलेलं आहे. ज्यात मी भराभर आधी सारं टाकून घेतो आणि नंतर सावकाश त्या त्या प्रसंगानुसार, कार्यक्रमानुसार, तारखांनुसार पुन्हा त्यांना योग्य जागी लावून ठेवीत असतो. परंतु, बर्याच वर्षांत अनसॉर्टेड मध्ये फक्त भरणाच झाला आहे. सॉर्टिंग असं करताच नाही आलं. त्याच कारण म्हणजे मोबाईलने काढलेले भरमसाठ फोटोज आणि व्हिडिओज.
हे फोटो पाहिले तर एखाद्याला वाटेल की च्यामारी, ह्याला तर आयुष्यात काहीच कष्ट पडले नसतील. आयुष्याचं सोपंसच गणित याच्या वाटेला आलंय. लहानपणासून ते आतापर्यंत चांगलं सुखासीन आयुष्य जगत आलेला आहे हा. अर्थातच ते खूपसं चूक आणि काही अंशी खरंही आहे. पण फोटो तर वेगळीच कहाणी सांगत आहेत. मग विचार केल्यावर लक्षात आलं की आपल्या लक्षात वेगळं राहतं आणि कॅमेर्याच्या वेगळं. पण एक गोष्ट नक्की, खूप काही बघून, फिरून, मजा करूनही झालेली आहे. जितके फोटो, व्हिडिओ आहेत तेवढे आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यात येऊन गेलेलेच आहेत. या वेळी तुकारामबुवांची सुख पाहता जवापाडे, दु़:ख पर्वताएवढे या उक्तीचा नव्याने साक्षात्कार झाला! मनोमन तुकारामबुवांना नमस्कार केला आणि पुन्हा कधीतरी आवरूया म्हणून लॅपटॉप बंद केला.
- संदीप भानुदास चांदणे (१२/०५/२०२०)
तू त्यावेळी बोलत नसली तरी तुझं बोलणं शरीराच्या रोमारोमातून व्यक्त व्हायचं.
तुझे भिरभिर डोळे आणि त्यातली बेचैनी. बाहेर डोकावणार्या थेंबाना पापण्यांच्या कडांवर कितीतरी वेळ अडवून धरणं, त्यांना बाहेर पडू न देणं, हे कसं जमायचं ते तुझं तुलाच ठाऊक पण ते दिसायचं मला. केसांच्या बटा कितीतरी वेळा कानाच्या मागे खोचायचीस पण त्याही सारख्या निसटून वार्यावर उडत, कधी डोळ्यांवर तर कधी गालावरून हनुवटीच्या खालीपर्यंत वेढा टाकून बसायच्या. पायाचा अंगठाही मातीशी अविश्रांत बोलत रहायचा.
मावळतीकडे, डोंगरांच्या आड सूर्य गेल्यावर सभोवताली मंद संधिप्रकाश पसरून वार्याला जेव्हा शब्द फुटायचे तेव्हा ते गुंग होऊन ऐकत असतानाच अचानक तुझी निघायची सूचक हालचाल जाणवली की काळजात धस्स व्हायचे. झंकारणार्या वीणेची तार अचानक तुटल्यावर होते तसेच. तो कंप नकोसा वाटतो.
आजही तुझ्या नि माझ्या त्या अबोल भेटीचे गाणे एखाद्या सायंकाळी आठवते आणि मी ते गुणगुणत बसतो.
- संदीप भानुदास चांदणे (१७/०५/२०२०)
असं म्हणतात रात्रीच्या अंधारात चोर, लुटारू घराबाहेर पडतात.
पण इथे, दिवसाढवळ्या, जर कोणी अतीव सुंदर डोळ्यांच्या भुलीत पाडून लुटत असेल तर...
...तर आम्ही सर्वस्व लुटायला तयार आहोत!
- संदीप भानुदास चांदणे (२३/०५/२०२०)
शांतपणे किनाऱ्यावर बसून लाटा बघणे हा एक नितांतसुंदर अनुभव असतो. काही लाटा सरावल्याप्रमाणे येत राहतात एकामागून एक आणि मध्येच एखादी असते जिला इतरांपेक्षा स्वतःला वेगळं दाखवायचं असतं. आपल्या क्षणभंगुर आयुष्याला उंच उठून वाकुल्या दाखवत किनाऱ्याच्या आणखी जरा जवळ येऊन ती आपलं वेगळेपण सिद्ध करते आणि पुन्हा विरून जाते. आपल्या आयुष्यात येणारी काही माणसंही अशीच लाटांसारखी असतात. काही सरधोपट तर काही उंच उठून वेगळं आयुष्य जगणारी.
- संदीप भानुदास चांदणे (२४/०५/२०२०)
उन्हीं पुराने दोस्तो के साथ
फुर्सत से गप्पे लडाने है
और उनके सुस्त पडे
ठहाके जगाने है
आसमां को सुनाने के लिए
चाय की सुर्कीया
उसी दूरके ठेलेपे जाके
लेनी है
फिर चाहे,
झुलसा देनेवाली
दोपहरकी धूप हो,
या हो,
शाम के रंगीन फव्वारे
क्रिकेट भी खेलना है
जहाँ जगह मिले वहाँ
बच्चोंको घुमाना है
बहन-भांजे सबसे
मिल आना है
जिंदगी फिर एक बार
और बेहतर तरीके से जिने की
कोशीश करनी है
बस ये,
साफ फर्श पर अचानक
हाथो से चाय की प्याली गिरी हो
और उसमे रख्खी हुई
सारी चाय फैल रही हो
तितर बितर होकर
जरासी भी ढलान मिले
उस ओर
उसी तरह से,
बढता हुआ ये
सुहाने जिंदगीपर
भद्दा दाग लग रहा लॉकडाऊन
पूरी तरह से
साफ हो जाने के बाद!
- संदीप भानुदास चांदणे (३१/०५/२०२०)
निवांत वेळ असताना अमुक गोष्ट करू असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यातल्या फार कमी लोकांना ते जमतं. खूप लोकांना ते नाही जमत. त्या खूप मधलाच मीही. निवांत वेळ असताना, मित्रांना फोन करू, एखादे चित्र काढायला घेऊ, काहीतरी नवीन लिहायला घेऊ, वाचायला घेऊ, बघायला घेऊ, वाजवायला शिकू, नवीन भाषा शिकू, पाहुण्यांपैकी कुणाकडे जाऊ, लांब कुठेतरी फिरायला जाऊ, अशी बरीच यादी माझ्याकडची मोठी आहे. प्रत्यक्षात निवांत वेळी कंटाळा आणि आळसच अंगात ठाण मांडून बसतात. काही सुचत नाही नेमकं काय करावं. आणि अशा वेळी विनाकारण काहीतरी करायला घेऊन नसते उद्योग केल्याची जाणीवच जास्त होते. त्यापेक्षा नकोच तो निवांत वेळ!
- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, २०/१२/२०२२)
संध्याकाळ होते म्हणजे नेमकं काय होतं तर, पृथ्वी दूर पश्चिमेकडे उद्या परत येण्यासाठी निघालेल्या भास्कराला तिरप्या डोळ्यांनी बघते. साहजिकच, तो जेव्हा पृथ्वीला असं करताना बघतो तेव्हा त्याच्या मनात गुदगुल्या होतात व त्यावेळी त्याचे ते प्रखर तेज लोण्यासारखे वितळून जाते आणि मग त्याच्यामधून स्त्रवतो तो प्रेमाचा उबदार किरणवर्षाव!
- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, ०५/०३/२०२४)
तुझे हसू कोणत्याही किमतीत घेऊन टाकीन मी. रक्ताचे पाणी, घामाच्या धारा काय फक्त बोलण्या-ऐकण्यासाठीच नसतात हे दाखवून देईन. तुझा तो हसरा चेहरा पाहिला की अगदी जग जिंकल्यासारखं वाटतं. नव्हे, जगात दुसरं कोणीच नाहीये फक्त तू आणि मी आहोत आणि मी तुला पाहतोय भान हरपून असं वाटतं. खरंच भान हरपून जातं. तुझ्याशिवाय बघण्यासारखं काय आहे नाहीतरी ह्या जगात? तुला सोडून दुसरं काय बघावं तर कशातच अर्थ वाटत नाही. तुलाही माझी ही व्याकूळता कधीतरी कळो असं आत, खूप आत वाटत राहत.
- संदीप भानुदास चांदणे (शुक्रवार, ३/४/२०२६)
कितीतरी प्रसंग रंगवले मी आपल्या भेटीचे. किती काय काय सांगून झालंय माझं तुला त्या सगळ्या वेळेला. पुन्हा तुला आठवले कि मागच्या वेळी काय बोलणं झालेलं ते टाळून नवीन काहीतरी तुला सांगायचा मी प्रयत्न करतो. नेहमीच असं होतं असंही नाही. कितीतरी वेळा मी आधी सांगितलेलंच पुन्हा सांगत बसतो. पुन्हा ते उमजून मनात जरासा खट्टूही होतो. पण माझ्या त्या दिवास्वप्नांत तू मात्र मला इतकी समजून घेतेस कि माझाच मला राग यायला लागतो, सतत वेंधळेपणा करत राहिल्याबद्दल. आजही आता तुला आठवताना तू जवळ बसली आहेस आणि मी नुसता काहीबाही बडबडतो आहे असं वाटतंय. तू तेही शांतपणे ऐकूनच घेतीये असंही वाटतंय. कसं जमतं ग तुला माझ्या स्वप्नात येऊन इतकं शहाण्यासारखं वागायला? खऱ्या आयुष्यात कधी येशील आणि सांगशील का मला हे गुपित? मी वाट बघतोय आणि बघतच राहीन.
- संदीप भानुदास चांदणे (शुक्रवार, ३/४/२०२६)
No comments:
Post a Comment