Monday, February 18, 2013

लालपरी

ती आहे लालपरी, खरीखुरी
मी जमिनीवर, ती अंबरी
मी शोधतो तिला एकांतात
पापण्यांच्या आत, खोल स्वप्नात
तिथेही ती येत नाही
मी अंथरले जरी हृदय माझे
ती त्यावरही उतरत नाही

ऐकू येतात फिरून
ह्या उंच क्षितिजावरून
मी फेकलेले सूर
जातात जरी दूर
ती कधीच ऐकत नाही
मी देऊ पाहतो गीत
ती स्वत: मागत नाही

मी पाहतो वर, होऊनी मोर
कधी चांदण्यांचा चकोर
वर्षाव संपून जातो
मी तसाच कोरडा राहतो
प्रतीक्षा संपत नाही
मी तुडविली युगे किती
ती कुठेच सापडत नाही

हे कुणी मला सांगावे
मी आणि काय करावे?
जो देतो बांधूनी गाठ
कशी व्हावी त्याच्याशी भेट?
हे गूढ उकलत नाही
मी पाहिले किती पुसून
ती रेषाच ललाटी नाही

मी कशी सोडू अर्ध्यावर?
प्रीत माझी वाऱ्यावर
मी पीन हलाहल प्याला
जीवन नाव ज्याला
मग कंठदाह रोखाया
ती निघेल धरेवर याया
मी तिला ये म्हणणार नाही
झाला जरी उशीर किती
मी तोवर मरणार नाही!

- संदीप चांदणे

No comments:

Post a Comment

नाकाम मुहब्बत का इनाम हो तुम

किसी नाकारा दुवा की इंतेहा हो तुम कयामत है के अभी तक जिंदा हो तुम सामने आती हो तो यकी नही आता लगता है खुली आंखो का सपना हो तुम अंजाम मुफ्लीस...