Wednesday, April 13, 2016

शब्दांच्या, रानातल्या गप्पा!

"दादा, तुमची ही कविता जरा समजून सांगाल का. म्हणजे, हे निसर्गचित्रण आहे का यात काही रूपकात्मक शृंगार दडला आहे जो मला नेमका दिसत नाहीये." आणि मग त्यांनी पुढे जे काही त्या कवितेतल्या चित्रणाबद्दल सांगीतले ते ऐकून/समजून माझ्या लक्षात आले की, आपण अजून कविता खुर्दलाही जाऊन पोचलो नाहिये, कविता बुद्रूक हे गाव तर लांबच!

कविता होती, "जाळीवरती वाळत लुगडे, उभा हसे जरतारी काठ...." आणि कवि अर्थातच, महाराष्ट्राचे 'शेतकवी', कवि ना. धो. महानोर!

रविवार दि. १०/४/२०१६ रोजी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे अजिंठ्याच्या जवळ पळसखेड्याला त्यांना भेटायचा सुवर्णयोग आला होता.

भेटतील का नाही? भेटतील तर कुठे? कसे? बोलतील का? किती वेळ देतील? वगैरे प्रश्न घेऊन मी आणि माझा सख्खा मित्र, जळगाव - औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या वाकोद गावावरून आत शिरलो. साधं गाव, साधी माणस आणि गावात मुख्य गावापासून तीनेक किलोमीटर अंतरावर मळ्यातलं साधंच घर!

दुपारच्या रणरणत्या उन्हात आम्ही बिनअकली पोरं त्यांची झोपमोड करायला गेलेलो. त्यांच्या माणसाने आम्हाला बसवून घेतले व त्यांना उठवण्यासाठी गेला. आधीच भेटायचे निश्चीत केल्यामुळेच जरा हिंमत करून बसून राहिलो. दुसऱ्याच मिनीटाला महानोर दादा त्यांच्या खोलीतून अर्धवट झोपेने जड झालेले डोळे आणि अंग, पायांवर सावरीत आमच्याकडे आले. त्यांच्या चालण्यात थकवा जाणवत होता पण त्याचवेळी आम्हांला पाहून आम्हांला भेटण्याचा, आमच्याशी बोलण्याचा उत्साहही दिसत होता.

पुढचे दोन तास आम्ही कविता, गाणी, राजकारण, समाजकारण, शेती, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर स्वैर झुलत राहिलो. सुरूवातीचा औपचारिकपणा काही क्षणातच कुठल्या कुठे पळून गेला होता. पुढे, "अरे मग काय सांगतोय तुला!" "यातच खरी गंमत आहे रे" अशा त्यांच्या वाक्यांनी जणू जुन्या सलोख्याचा ओलावा तिथे निर्माण केला. त्यांच्या आठवणींचा, अनुभवांचा आणि विचारांचा खजिना त्यांनी माझ्यासमोर ओतला. त्यातून काय आणि किती वेचू असं मला झालं होतं! आज मी आधीपेक्षा आणखी श्रीमंत झालोय हे उघडपणे, ताठ मानेन सांगू शकतो! अर्थात, ही श्रीमंती पैशांची खचितच नव्हे!

माझ्या कविता नीट वाचताना त्यांना न्याहाळत असताना मला जाणवलं की दादांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला आहे. मध्येच एक भुवई जराशी वर जाऊन कुठल्यातरी शब्दाला दाद देत होती. ओठांचे हलके स्मित मला सुखावून जात होते. कविता वाचून त्यांनी अभिप्राय दिला की, "संदीप, उत्तम लिहिले आहेस! कुठेही उणीव काढायला तू जागा ठेवली नाहीस. आवडले! नाहीतर, आणखीही येतात, कवितांच भेंडोळ घेऊन. पण ते उलगडतानाच सांडून जात आणि केरसुणीनेच झाडून सुपल्यातून बाहेर टाकून द्यावं लागतं!" यावर ते मनमोकळे हसले, मीही रोखून धरलेला श्वास सोडत थोडा निवांत होऊन हसलो. माझ्या कवितांमध्ये अनुभवाची व्याप्ती वाढविण्याचा अमोल सल्ला त्यांनी मला दिला. त्याचबरोबर, लोकांसमोर येण्यासाठीच मार्गदर्शनही केलं.

दादांना वयापरत्वे एका डोळ्याने नीट दिसत नाही. पण, विचारातली सकारात्मकता पहा, अगदी दुर्मिळ! ते म्हणतात, "चला, एक डोळा ना आहे ना अजून टिकून, त्यावर चाल्लंय ना काम, मग तेवढं पुरे! बिचाऱ्याने(डोळा) दिलीच ना इतकी वर्ष साथ." इतक्या सहजपणे सांगत होते ते हे की जणू एखाद्या मुलाचा पेन हरवलाय आणि तो म्हणतोय चला पेन्सिल तर आहे ना अभ्यासापुरती, तिच्यावरच भागवूया! परिस्थितीने गांजलेली, निरूपाय, हताश झालेली अनेक माणसं आजूबाजूला आहेत. त्यातले बहुतांश धैर्य गमावून रडत असतात पण दादांसारखी माणसं त्यांच्या विचारातली सकारात्मक उर्जा मुक्तहस्त आपल्यालाही वाटत असतात.

दादांचा पहिला काव्यसंग्रह "रानतल्या कविता", त्याच्याबद्दल ते पहिल्या प्रेमासारखं बोलले. पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाल्यावरही आपले पाय जमिनीवरच ठेवून नेटाने त्यांनी अतिशय साधारण परिस्थिती असतानाही कवितेची साधना सुरूच ठेवली. पुरस्कार मिळाला तरी एका दिवसांत जादूची कांडी फिरल्याप्रमाणे त्यांच्या जीवनात साऱ्या सुख-समृद्धीने उडी नाही मारली. त्यासाठी त्यांनी शेतीतले परिश्रम आणि कविता ह्या दोन्ही गोष्टी अविरत चालू ठेवल्या. आणि दोन्हीकडे यशस्वी मळा फुलवला. एकीकडे 'पिकांचा' आणि दुसरीकडे 'शब्दांचा!'

समृद्ध जीवनाबद्दलची दादांची व्याख्या साधी-सरळ सोपी आहे. जे आवडत-जमत ते करावं, कोण काय म्हणत याची पर्वा केल्याशिवाय, चालत रहाव-चालत रहाव न थांबता. मग लोकं सोबत येत राहतात. भेटत राहतात, ऋणानुबंध निर्माण करतात आणि ह्या सगळ्या प्रवासाच्या गोल चक्रातून समृद्ध जीवनाचे सुंदर मातीचे मडके आकार घेत राहते. मातीचे यासाठी की, त्याला निरंतर जपावेही लागते. तुम्ही कुठेही दुर्लक्ष करून, गाफील राहून चालत नाही. नाहीतर त्या सुंदरतेला गालबोट लावणारे एखादे छिद्र त्या मडक्याला पडू शकते. अशा त्यांच्या समृद्ध जीवनाच्या विचारांतून त्यांनी मलाही समृद्ध केले.

दादांनी, त्यांच्या जीवनाचे अनेक पट त्यांनी उलगडून माझ्यासमोर ठेवले. त्यांना भेटलेले पुरस्कार त्यांनी आम्हांला स्वत: सोबत येत दाखवले. पद्मश्री पुरस्कार नेमका दिसतो कसा हे मी नीट पाहून घेतले. (कधी मिळालाच तर फसलो जाऊ नये म्हणून कदाचित!)अनेक जुने फोटो, जुनी माणस आणि मराठी मनाला अभिमान वाटेल असे क्षण छायाचित्रातून पाहताना विलक्षण गहिवरून येत होतं. पुलंचा दुर्मिळ फोटो पाहताना तर मला वेड लागेल का काय असंच वाटत होत. त्यांना न विचारता नको म्हणून आणि पहिल्याच भेटीत उतू जाईल इतका अतिउत्साह नको म्हणून त्या अनमोल ठेव्यांचे फोटो मी माझ्या कॅमेरात घेतले नाहीत. पण परत जाईन तेव्हा नक्की त्यांना विचारून घेईन.

पाय निघत नव्हता पण पुण्याचा परतीचा प्रवास लांबचा होता आणि मला ड्रायव्हिंग करायचे होते म्हणून नाईलाजाने आम्हीच भेट आटोपती घेत दादांचा आशीर्वाद घेत त्यांचा निरोप घेतला. "पुन्हा परत या!" अशा आपुलकीच्या शब्दांनी परतीच्या प्रवासासाठी जणू शिदोरीच मिळाली. पुढे औरंगाबादला आल्यावर प्रा. डॉ. दिलीप बिरूटे सरांना फोन लावला तर त्यांच्या सुदैवाने ते औरंगाबादेत नव्हते. ;) त्यांना त्रास देण्याची नामी संधी हुकली! ;)

"चला, साहित्यक्षेत्रातून कार्यक्षेत्रात परत जाऊया" ह्या मित्राच्या वास्तववादी बोलण्याने भानावर येत आमच्या गाडीने पुण्याच्या दिशेने वेग घेतला.


पुराव्यादाखल हा फोटो! ;)


दुर्दैवाने अजिंठ्याला थांबलो नाही पण तिथेच काढलेले हे काही फोटो!



अजिंठ्याकडे जाणारा रस्ता


अजिंठा पर्यटक केंद्र

घाटरस्ता


झाडामागून हळूच सटकणारा सूर्य ;)



औरंगाबादपुरता तरी, माझे नाव सर्वदूर पसरविण्याचा प्रश्न मिटलेला आहे! ;) (खरं, ज्यांच्या नावाने हा चौक आहे, त्या "सावित्रीबाई चांदणे" यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहित असू नये हे वाटून मला प्रचंड खेदही झाला!)


- संदीप चांदणे (१३/०४/२०१६)

No comments:

Post a Comment

नाकाम मुहब्बत का इनाम हो तुम

किसी नाकारा दुवा की इंतेहा हो तुम कयामत है के अभी तक जिंदा हो तुम सामने आती हो तो यकी नही आता लगता है खुली आंखो का सपना हो तुम अंजाम मुफ्लीस...