Sunday, July 17, 2022

आज्जी गेलीय सोडून

उशीराने आले ध्यानी
एकटे गर्दीत बसून
मला अनोळख्या देशी
आज्जी गेलीय सोडून

घरातून निघताना
का बोलली ती नाही?
तुला लेकरा घरात
जागा उरलीच नाही

आई बाबा गेल्यावर
आज्जी तूच उरलेली
कुणाकुणा पोसशील
तूही आता थकलेली

माझ्या इवल्या बहिणी
आणि भाऊ लहानगे
तुला आज्जी, म्हणतील
कुठे दादा आमुचा गे?

काय सांगशील त्यांना
मला सांगशील का ग?
आज्जी एवढ्याचसाठी
पुन्हा भेटशील का ग?

- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, २१/१२/२१)

अकबर बिरबल (बँक व्हिजीट)

अकबर बिरबल ( बँक व्हिजीट ) ----------------------------------------------------------------------------------------------------------------...