महाराष्ट्र माझा!
जमले ना अजूनी इतके
शब्द पुरे कोशात
परिचय देण्या महाराष्ट्राचा
लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।
पाय धुतो अरब सागर
पाठी द्ख्खनचे पठार
वरून पाहते कळसूबाई
गड-किल्ल्यांचा पसारा फार
भूमी पावन शिवप्रभूंची
स्फूर्ती भरते उरात ।।१।।
परिचय देण्या महाराष्ट्राचा
लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।
घोर गर्जे खडा सह्याद्री
थाप डफावर शाहिरांच्या
देखणी लावणी इथली
कणाकणात खुणा संस्कृतीच्या
पूर्वेला तांबडे फुटते
वासुदेवाचे गाणे गात ।।२।।
परिचय देण्या महाराष्ट्राचा
लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।
अष्टविनायक ठाणी कुणी
अशी दुसरी न पाहीली
शिवशंभो ठायी वसला
आदिशक्ती इथेच रमली
गजर विठूनामाचा करीत
वारी येते पंढरपुरात ।।३।।
परिचय देण्या महाराष्ट्राचा
लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।
वर्णन पुराणात सापडे
इतिहास इथे नत झाला
पर्णकुटी ती रामाची
वनवास पांडवांचा पाहिला
शांतीचे सांगुन मोल
पहुडला सिद्धार्थ लेण्यात ।।४।।
परिचय देण्या महाराष्ट्राचा
लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।
अमृताते पैज जिंकली
ज्ञानेशाच्या ओवीसंगे
झाला श्रोतावर्ग वेडा
नाथाच्या भारूडामागे
जिवंतपणीच इथला तुका
गेला गरुडावरून वैकुंठात ।।५।।
परिचय देण्या महाराष्ट्राचा
लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।
पठ्ठे बापूरावांच्या शाहीरीत
गदिमांच्या गीत-रामायणात
केशवसुत, कुसुमाग्रज आणि
अत्रे, पुलंच्या लेखनात
हरवला हर एक जीव
बहिणाबाईच्या अहिराणीत ।।६।।
परिचय देण्या महाराष्ट्राचा
लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।
औरंगजेब पुरा हैराण
सारी हयात नाही पुरली
ज्योत क्रांतीची धगधगली
धडकी इंग्रजांना भरली
टिळ्कयुग पाहिले साऱ्यांनी
गुरू गांधीचा या भूमीत ।।७।।
परिचय देण्या महाराष्ट्राचा
लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।
सीमेवर खडा पहारा
देई फौजी जिल्हा सातारा
देशाचे पाऊल पहिले
पडते शहरी नागपुरा
देऊन गेली एक उल्का
लवण सरोवर बुलढाण्यात ।।८।।
परिचय देण्या महाराष्ट्राचा
लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।
देव खेळला इथे येऊन
गायली साक्षात सरस्वती
अवलिया इथलाच एक
गेला पेटवून दृकचित्रज्योति
गणती महापुरुषांना नाही
अशी भारतरत्ने या राज्यात ।।९।।
परिचय देण्या महाराष्ट्राचा
लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।
- संदीप भानुदास चांदणे
No comments:
Post a Comment