आज तू सोबत नसताना
कसली मौज चालण्याला?
श्वासांमागून श्वास देतो
कोरे मिंधेपण, जगण्याला
आता कळते बघताना
शून्यालाही येते भोवळ
चौफेर बोचऱ्या प्रश्नांना
उत्तरांचे हुंकार पोकळ
किती इमले भविष्यातले
नियतीने सहज पाडले
माझ्या भागल्या हातांनी
सावरण्याचे प्रयत्न फसले
तुझा नुसता आठव जणू
थेंब लख्ख मृगजळाचा
तहानल्या शुष्क मनाला
हवा झरा ओल्या स्पर्शाचा
आता उरली ओढ एकच
पैलतीरावर भेट घडावी
हर्षभरल्या जाणीवांनी
आयुष्याची अखेर व्हावी
- संदीप चांदणे (मंगळवार, २३/११/२०२१)
No comments:
Post a Comment