Tuesday, December 20, 2022

मंटू, ॲलेक्सा आणि गाणी

इंटरनेट फोफावण्याच्या आधी म्हणजे अगदी १० वर्षांच्या पाठीमागे गाणी नियमितपणे ऐकायचो. नियमितपणे म्हणजे दिवसातले चार पाच तास वगैरे. त्याच्याही आधी जेव्हा टीव्ही बोकाळायचा होता, तेव्हा घरी रेडिओ आणि टेपरेकॉर्डर दिवसाचे आठ-दहा तास व्यापून असायचा. टीव्हीवरच्या कार्यक्रमांसाठी ठराविक काळ राखून ठेवलेला असायचा. इतर वेळी रेडिओ किंवा टेपरेकॉर्डर सतत चालू. रेडिओवरही फक्त विविधभारती. टेपरेकॉर्डरच्या कॅसेट्ससाठी कपाटाचा एक मोठा कप्पा होता. सर्वात वरती, काचेचा. तीन-चार ओळीत त्या सर्व कॅसेटी ठेवलेल्या असायच्या. त्यात पुन्हा, भक्तीसंगीत, मराठी, हिंदी चित्रपट गाणी अशी वर्गवारी असायची. लोकसंगीत जसे की आनंद शिंदे, छगन चौगुले, साखराबाई टेकाळे (बऱ्याच लोकांना ही नावे माहीत नसतील) अंबाबाई, तुळजाभवानी यांची गाणी तसेच काही तमाशाचे वग आणि शोलेचा पूर्ण ऑडिओसुद्धा होता. थोडक्यात, गाणं हे घरात नियमित ऐकलं जायचं. ऐकण्याची आवड निर्माण झाली. कालपरत्वे ऐकण्याची माध्यमं बदलत गेली. अनुक्रमे, रेडिओ, टेपरेकॉर्डर, टीव्ही (आधी रंगोली, चित्रहार व नंतर काही म्युझिक चॅनेल्स), वॉकमन, सीडी प्लेयर, कॉम्प्युटर, होम थिएटर, मोबाईल आणि आता ॲलेक्सा!

साहजिक आहे गाणी ऐकण्याचा छंद असेल तर माणूस थोडा गुणगुणतोही. त्यापुढे काहीजण बाथरूममध्ये जोरजोरात ओरडतात. त्याच्याही पुढे काहीजण ऑफिस/सोसायटीचे कार्यक्रम यात भाग घेऊन गाण्याचा प्रयत्न करतात. मीही यांपैकीच एक. सतत गुणगुणत राहणे हाही एक छंदच. आता अलीकडे कामाचा व्याप आणि धावपळ यातून गाणी ऐकायला वेळ मिळत नाही. प्रवासात म्हणजे कार चालवताना रेडिओ नीट ऐकता येत नाही. म्हणजे एकतर कुणीतरी सोबत असतं म्हणून गप्पांमध्ये व्यत्यय होतो किंवा मग ट्रॅफिकमध्ये सगळं लक्ष लागलेलं असतं. घरी टीव्ही सतत चालू, त्याचा ताबा मुलांकडे. मग घरी कधी एखादं गाणं आठवलं की ते ॲलेक्साला लावायला सांगायचं. सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री अंथरूणावर येऊन झोप लागेपर्यंत ॲलेक्साला हे लाव ते लाव करून त्रास देणं सुरू असतं. पण बिचारी कधीच वैतागत नाही. एका शब्दाने म्हणून काही बोलत नाही.

आता असं होतं की मी ॲलेक्साला काही सांगितलं लावायला की मुग्गू आणि मंटू आल्याच धावत आणि मी सांगितलेलं गाणं थांबवून काहीतरी, चुटकुला सुनाओ, दांडियाका गाना लगाओ असले प्रकार करतात. इतर वेळी ह्यांना आठवण होत नाही ॲलेक्साची. रात्री मात्र मंटू मी जे ॲलेक्साकरवी गाणं लावतो ते ती ऐकत ऐकत झोपी जाते. कधीकधी मला म्हणायला लावते. मी किशोरचा फ्यान असल्याने पहिल्यापासूनच त्याची गाणी जास्त ऐकतो आणि गुणगुणतो. गातो वगैरे ओव्हरस्टेटमेंट होईल. बरीच गाणी पाठही आहेत. 

तर, त्यादिवशी झालं असं की मी घरात कॉम्युटरवर काम करत बसलो होतो आणि मंटू सोफ्यावर बसून चित्र रंगविण्यात मग्न होती. मी गाणं गुणगुणत होतो, 'फिर वही रात है, फिर वही रात है ख्वाबोंकी, रातभर ख्वाबमें देखा करेंगे तुम्हें, फिर वही....' अचानक मंटूचा आवाज आला, "बाबा तू सेम ॲलेक्सासारखंच म्हणतोस रे!" मी चमकलो, तिच्याकडे बघितलं तर ती खाली मान घालून अजूनही चित्रातच दंग होती. "ॲलेक्सासारखं म्हणजे काय रे पिल्लू?" मला जरा नवल वाटलं म्हणून मी विचारलं. "अरे,म्हणजे मला वाटलं ॲलेक्साच गाणं म्हणतीये, असं." "म्हणजे मी चांगलं गातोय, असं का?"  "हो रे बाबू! ॲलेक्सापण चांगलंच गाते की, तू पण तसाच म्हणतोय." 

मंटूचा आणि गाण्याचा संबंध फक्त ॲलेक्सामुळे आहे हे तेव्हा कळालं आणि मी बऱ्यापैकी गातो असंही वाटून गेलं. आणि आता इतर कुणी माझ्या गाण्याला काय म्हणो वा नाही, मंटूला ॲलेक्सासारखं वाटतंय म्हणजेच चांगलं वाटतंय तर निदान घरापुरता तरी मी सिंगींग स्टार झालोय. इतकं रेकग्निशन बास आहे मला!

- संदीप भानुदास चांदणे (शनिवार, १९/११/२२)

No comments:

Post a Comment

नाकाम मुहब्बत का इनाम हो तुम

किसी नाकारा दुवा की इंतेहा हो तुम कयामत है के अभी तक जिंदा हो तुम सामने आती हो तो यकी नही आता लगता है खुली आंखो का सपना हो तुम अंजाम मुफ्लीस...