पायांना स्पर्शून आले
ते हात मळाले होते
लख्ख उमगले तेव्हा
ते पाय मातीचे होते
मी केवळ पाहत होतो
पायांच्या खालची धूळ
ती ललाटास लावावी
हे एकच माथी खूळ
मी इथवर पाहून आलो
पाऊलखुणा विरणाऱ्या
आधी खुणावत, मागून
कपटी विकट हसणाऱ्या
आता, पुन्हा चालावे
पुढे, की परत फिरावे?
सोस ना-लायक पायांचे
पुसून अवघे टाकावे?
प्रेमळ शब्दांची ओल
मनात झिरपत नाही
व्हावे नतमस्तक ऐसे
पायही दिसत नाही
ते सारेच निघून गेले
जे पाय धरावे सुचले
मातीचे पाय मातकट
मागे माझ्यासह उरले
- संदीप भानुदास चांदणे ( रविवार, २५/०६/२०२३)