Saturday, May 3, 2025

माणूस आणि पुस्तक

माणूस हळूहळू माणूस होत होता
आधी एकटा, पुढे कळप होत होता

मग बोलायला शिकला, चाक बनवले
गुहा सोडून घरात आला, गाव बनवले

नंतर संवादासाठी भाषा विकसीत झाली
त्याच्याही पुढे जाऊन लेखनकला आली

हुशार माणसाने आधी लिहून काढला देव
त्यातून माणसालाच म्हणाला डोकं इथे ठेव

माणसाला डोकं म्हणजे मेंदूच वाटला
डोकं नि मेंदूत जरा गल्लत करून बसला

माणसाने माणसाला काही प्रश्न विचारले
माणसाने पुस्तकाकडे सरळ बोट दाखवले

माणसाने माणसाकडे दयेची भीक मागितली
माणसाने पुस्तकात कुठे सापडते का बघितली

माणसाने सगळं सोडून जगण्याचा प्रयत्न केला 
माणसाला हा पुस्तकाचा घोर अपमान वाटला

उठता-बसता, खाता-पिता, जागेपणी-झोपता
पुस्तकातून माणसाचा माणसावर पहारा जागता

पुस्तकापुढे ठेवलेला मेंदू परत मिळेल का?
माणसातला माणूस माणसाला दिसेल का?

- संदीप भानुदास चांदणे (शनिवार, ०३/०५/२०२५)

No comments:

Post a Comment

तानाजी आन नाथाजी

भोळा व्हता तान्या. निकं मालकाचं आयकायच आनं तानभूक इसरून राबायचं. तरीबी, रानात सरळसोट पाळ्या न्हाय घातल्या, आठ दिसांत जोंधळ्यात बैलजोडी ...