कागद आणि लेखणी
बसलो आहे...
एक कागद घेऊन
आणि लेखणी...
पाहू या...
काय उमट्तय!
हळुवार गंधीत प्रेमकविता... की?
नुसताच आठवणींचा पसारा...
जो आवरता आवरता मीच त्या
पसा-याचा भाग होऊन
हरवून जाईन!
का उमटेल कुठली
व्यथा, वेदना,
आक्रोश...
ऐकू येणारा, समजणारा
पण...
कुठून येतोय हे
नक्की न कळणारा!
का या जाचक, मुखवटाधारी
समाजावर, रूढींवर
आग ओकतील शब्द
त्यांचं नाकर्तेपण...
दुट्प्पीपणा...
पैसा, प्रसिद्धीमागे
पळण्याची अंगी भिनलेली सहजव्रुत्ती...
...यांवर लिहीता लिहीता
शब्दांशब्दांत, अक्षराअक्षरांत
अचानक डोळ्यांत खुपणारा
डोळे मिटायला लावणारा...
आरसा... ... किंवा
त्याचे असंख्य तुकडे
दिसतील, बहुधा...!(नकोच मग ते!)
एखादे छान, छोटेसे
चित्रही चालेल
रेखाचित्र, वस्तु-स्थिरचित्र
प्रतीमांचा, प्रतीकांचा
गूढ पण आनंद देणारा
वावर... ... वापर...
कुणी डोळे विस्फारावे
कुणी फेंदरे नाक मोडावे
कुणी ह्रदयाशी धरावे!
का, मलाही बुचकळ्यात
टाकणारं...
स्वत:चा स्वत:वर
विश्वास न बसू देणारं
मनाच्या कुठल्याच
कोप-यात नसलेलं
पण, अरेच्चा...!
हे आधी का नाही
सुचलं...??!!
असं म्हणायला लावणारं!
खरंच सांगतो...
हा कागद आणि लेखणी
अक्षरश: कामाला लावतात मला
आणि खोदून काढतात...
मलाच...!
- संदीप चांदणे
(15/09/13)
No comments:
Post a Comment