Friday, January 17, 2020

गर्दी

टीचभर देवाळ
खंडीभर दुकानं
ऐकाव कुणाचं
गर्दीत देवानं?

मुंग्यावनी माणसं
झाल्यात हुशार
साखर सांडताच
येत्यात रांगेनं!

दानपेट्या भरती
कुणी श्रद्धेनं
हौशे न गवशे
फिरत्यात जत्रेनं!

पाप-पुण्याची
भीती व कुणाला?
हाताला घट्ट
पैशाला मोजून!

एकाचं कीर्तन
दुसऱ्याचं गाऱ्हाणं
गुऱ्हाळ भक्तीच
चाललंय जोमानं!

अमुक अभिषेक
तमुक दक्षिणा
भाबड्या गर्दीला
तारलं नवसानं!

- संदीप चांदणे (२८/९/२०१७)

सावळ्या विठ्ठला

सावळ्या विठ्ठला
सावळ्या विठ्ठला
ऐकून घे आता
पेटलो हट्टाला

मांदियाळी झाली
खेळ मांडियेला
भोंगळ कलकलाट
तिथेच माजला

भक्ताविण सारे
रांगेत पुढती
वचने संताची
लाखोलीत वाहती

निर्बुद्ध, हतबल
अजाण जनता
बेफिकीर, मुजोरी
मनमानी सत्ता

शहाणे सारे
मान वळविती
सुखाने जगत
डोळे झाकती

आपुलेच दात
आपुलाच चावा
आपुल्याच ओठांनी
पुकारती धावा

कोणी कुणाला
काय सांगावे
कुणा न कळे
आपुले पाहावे

कसे कुठवर
चालावे वारीत?
दान सुखाचे
दे ओंजळीत

- संदीप चांदणे (२३/०७/२०१८)

पाकोळी

पाकोळी

निळ्या-जांभळ्या
आभाळाखाली,
हिरव्यागार कुरणाच्या
लुसलुशीत गवतावर
निवांतपणे
पहुडलेला असताना,
पलीकडच्या,
ताटव्यातल्या फुलांवरून
एक नाजूकशी पाकोळी
उडतउडत
माझ्याकडे आली
आणि मला म्हणाली…
"बाबा, तू आज आपिशला ज्यावू नको,
आपण गार्डनमध्ये खेळायला ज्यावू"


- संदीप चांदणे (१०/०९/२०१८)

बाकावरचे सरकणे

नको नको रे साजणा असा दूर दूर जाऊ तुझ्या बावऱ्या डोळ्यांनी नको बावरून पाहू कुठवर जाशील रे  दूरवर सरकून? घसरून पडशील बाक जाईल संपून  नको असता ...