Saturday, December 29, 2012

अबोला!

तुझे शब्द ना माझ्या कानावर
ना माझे शब्द तुझ्या कानावर
होतील अशाने भावना अनावर
राहील कुणी कसे मग भानावर?

शब्द तुझ्याजवळ नाहीत
शब्द माझेही संपले
नव्या ओळी रचण्याची
सांग जबाबदारी कोणावर?

पूर्वी अनोळखी होत्या
वाटा ज्या जुळाल्या
अजूनही रस्ता पुढेच आहे
नजर खिळली का फाट्यावर?

कागदाचे काही कपटे 
मर्मबंधाची ठेव होतील
मग, उलगडून वाचताना,
शब्द ओघळतील गालावर

चांदण्या रात्री आकाश पाहताना
जाणवेल भेसूर नीरवता
नकोसा वाटेल मग चंद्रही उगवता
आणि घड्याळाचे पडतील ठोके-ठोक्यावर!

सोन्याचा शर्ट

कसा घालू मी
सोन्याचा शर्ट अंगात
तीन दहाच्या आणि एक वीसची
फाटकी नोट पाकिटात!

Thursday, December 27, 2012

मित्र

वाजले रणवाद्य हे
सुरू झाली रणधुमाळी
निसटला चिलखताचा माझ्या
बंद कसा ऎनवेळी

सू~~ सू~~ करीत बाण एक
जिरेटोप घेऊन उडाला
माझ्या भात्यात बाणांचा
अवघा साठा संपला

दोन-चार घावानंतर
तलवारही झाली बोथट
पाच-सहांशी करता हातघाई
दिसू लागला ढालीचा शेवट

मोजले अगणित गनीम
जांबिया-कट्यारिने
ओलाचिंब झाला देह
भळभळ्त्या रक्ताने

ध्वज-पताका जमीनदोस्त
नौबतीही थंडावल्या
अस्ताव्यस्त शरीरांवर
गिधाडांच्या सावल्या

गरगरली एका पळी
सभोवतालची सारी सृष्टी
भिरभिरली एकवार
थरथरती, विझती माझी दृष्टी

अचानक कसा झाला
शत्रुसैन्यी हाहाकार
आले धावून मदती
माझेच ते मित्र चार

मूठ परत आवळली
घोड्यालाही दिली टाच
सैरावैरा झाले पाय आणि
रणभूमीत उरले वीर पाच!

काव्यसुमन

मनातले आभाळ
मनातच रंगले
प्रत्यक्षात मळले
धुळीतच पाय

ओढत ज्यांना
ओठावर आणले
डोळ्यातून सांडले
शब्द सारे

पुन्हा आठवून
शब्द विणले
सूर गुंफले
कातरवेळी!

मिटल्या डोळ्यात
तिलाच पाहिले
तिलाच वाहिले
काव्यसुमन हे!
 

Wednesday, December 26, 2012

सागर....

मंद वारा, धुंद तरुणाई
मनीच्या निळसर चांदव्याचे आगर
सागर....

उसळत्या लाटा, घोंघावते तूफान
भयंकर उग्र, रौद्र...
समुद्र....

मायाळू, दयाळू, प्रेमळ
कोल्यांचा हा इष्ट कृपाकर
समिंदर....

अहो, मनुष्यच काय!
देवांनीही, ज्याचे चाचपले उदर
रत्नाकर....

चल, अविचल, रत निरंतर
सतत कार्यरत ज्याची भार्या
दर्या....

असीम, अथांग, प्रचंड
शांत, निवांत, निपचित अजगर
महासागर....!

Monday, December 24, 2012

मी अश्व!!

वेग अफाट
शक्ती अचाट

अंगी डौल
मोल अमोल

निष्ठा घोर
इतिहास थोर

करारी बाणा
सखा महाराणा

बनता दळ
सैन्या बळ

आजीचे कथन
पऱ्यांचे वाहन

नीज गहाण
वया परिमाण

लौकिकी मती
प्राणी जगती

अडीच पावली
चौसष्ठ आलयी

पौरुष नामांकन
दिव्य आभूषण

मिळता सात
तिमिरा मात

ऋणी विश्व
मी अश्व!!

       - संदीप चांदणे
 

दुवा और फरियाद

दुवा और फरियाद
अक्सर जुडी हुई होती है
"निगाहे करम हो यार का"
इसमे से जो निकलती है
वो तो बस खुदा ही जानता है


                      - संदीप चांदणे

Sunday, December 23, 2012

झोप

पऱ्यांच्या राज्यातले कोणी
पापण्यांवर लावी इवले रोप
होता बहरूनी गर्द विशाल
या वृक्षाला म्हणती झोप

लहान असो वा थोर
असो खास आणिक आम
जहागीरदारही असो कुठचा
या झोपेचे सारे गुलाम

धरता अडवून डोळयापाशी
जांभईची येते हाक
म्हणते सुस्कारीत पापण्यांना
दिवे सारे मालवून टाक

जेव्हा नाकातले ते पहारेकरी
लोटून देती वायुद्वार
चढतो मग घोरण्याला
कसा बहकता-नशीला खुमार

पहुडणे, लोळणे, लवंडणे
हे झोपेचे नातेवाईक
आळसवाण्या दिवसांना
यांच्याशिवाय नसे  गिर्ऱ्हाईक

मनोभावे करता उपासना
मिळते खास पारितोषिक
या झोपेचे आराध्य दैवत
कुंभकर्णाचे लाभते आशिष

डुलक्यांच्या खेळात हरणारा
दचकून उठतो मग सावरतो
जिंकणारा मात्र अगदी मजेत
निवांतपणे झोपी जातो

                    - संदीप चांदणे


Saturday, December 22, 2012

पाठवण

येते तिची आठवण
केली आठवणींची साठवण
साठवूनी आठवण
केली तिची पाठवण

बाला

मध्यान्न समयी
तळपत्या उन्हात
कोण ही बाला
अंधाऱ्या वस्त्रांत

काय कारण
त्यागूनी सदन
खिजवूनी भास्करा
चालली तोऱ्यात
कोण ही बाला
अंधाऱ्या वस्त्रांत

चकाकती कांती
नाजूक बांधा
प्रकाशपर्जन्यी
भिजली नखशिखान्त
कोण ही बाला
अंधाऱ्या वस्त्रांत

भाग्यवान मी जगती
दुसरे नसे कोणी
प्रतिमा धरून नयनी
गहिवरलो मनात
कोण ही बाला
अंधाऱ्या वस्त्रांत

- संदीप चांदणे.....

झुळूक


  

उजाड रानोमाळ सारा
फूल नाही पाती नाही
रण रण माथ्यावर
अंगाची लाही लाही

दिसेना दूरवर कोणी
कुठे जायचे कळेना
जड झाले मन
आणि पायही उचलेना

कुठवर चालू मी?
कळेना वेळ, काळ, दिशा
दिनी दीन बंदीवान मी
अंधारकोठडी दावी निशा

कसा पडलो या जगी
माथी घेऊन निराशा
स्वतः पाडाव्या लागती
तळहातावर रेषा

नित भिजते धरती
आठवांच्या आसवांनी
हाका विरल्या हवेत
परतुनी नाही कोणी

झुळूक एक शीत
तिच्या गंधासवे आली                                               
शुष्क, कोरडी माझी सृष्टी 
चिंब पावसात न्हाली 
 
बहरला हा माळ
फूल पाती बहरली 
माथ्यावर तोच सूर्य 
धरी मायेची सावली 
 
 
               संदीप चांदणे...     

 

नाकाम मुहब्बत का इनाम हो तुम

किसी नाकारा दुवा की इंतेहा हो तुम कयामत है के अभी तक जिंदा हो तुम सामने आती हो तो यकी नही आता लगता है खुली आंखो का सपना हो तुम अंजाम मुफ्लीस...