मेल्यावर मी तिच्या डोळ्यातून
एक तरी थेंब सांडेल? शंकाच आहे!
मी मेलोय हे तरी
निदान तिला कळेल? शंकाच आहे!
एक दिवस ठरवून
तिच्यासमोर मन ओतले
बोललो सारे-सारे
तिनेही ऐकून घेतले
पण तिला कळाले? शंकाच आहे!
गेली वा-याच्या झुळुकीसारखी
वादळ मागे ठेउन
झुंजतो मी त्याच्यासवे
रोज तिला आठवून
गेली तशीच परतेल? शंकाच आहे!
धडपडलो नाही तिला
विसरून जाण्यासाठी
ना फार प्रयत्नात आहे
तिला लक्षात ठेवण्यासाठी
तिच्या मनाच्या कोप-यात मी...? शंकाच आहे!
आता रडतो कधी
कधी तर हसतोही
उदासवाणा बसतो कधी
तिच्या आठवणीत गुरफटतोही
तिच्याकडे हे घडेल? शंकाच आहे!
विसरली माझ्याकडे ती
रुमाल मलमली तिचा
बोचतो हाती घेताच
आठवातला स्पर्श तिचा
माझे तिच्याकडे काही असेल? शंकाच आहे!
डाव मोडला मांडण्याआधी
मनोरा ढासळला रचण्याआधी
नवीन डाव मांडू?
नवीन मनोरा रचू?
मांडला जाईल? रचला जाईल? शंकाच आहे!
- संदीप चांदणे (1/6/14)
No comments:
Post a Comment